कला, वास्तुशास्त्र, ऐतिहासिक वारसा या संबंधी लेखन करणाऱ्या सुप्रसिध्द श्रीमती शारदा द्विवेदी व सुप्रसिध्द वास्तुशास्त्रज्ञ राहुल मेहरोत्रा यांनी लिहिलेल्या Fort Walks या पुस्तकाचा ‘फोर्टमध्ये फिरताना’ या नावाने भालचंद्र हर्डीकर यांनी अनुवाद केला आहे. रहस्यकथेपेक्षाही उत्कंठावर्धक असे हे पुस्तक नुसतेच वाचनीय नव्हे तर संग्रहात असावे असे आहे.
कला, वास्तुशास्त्र, ऐतिहासिक वारसा या संबंधी लेखन करणाऱ्या सुप्रसिध्द श्रीमती शारदा द्विवेदी व सुप्रसिध्द वास्तुशास्त्रज्ञ राहुल मेहरोत्रा यांनी लिहिलेल्या Fort Walks या पुस्तकाचा ‘फोर्टमध्ये फिरताना’ या नावाने भालचंद्र हर्डीकर यांनी अनुवाद केला आहे. रहस्यकथेपेक्षाही उत्कंठावर्धक असे हे पुस्तक नुसतेच वाचनीय नव्हे तर संग्रहात असावे असे आहे.
पुस्तकाचे दहा भाग आहेत व यात साधारण धोबीतलाव ते कुलाबापर्यंतचा परिसर येतो. सुरुवातीलाच आपण ज्या भागाला फोर्ट म्हणून ओळखतो व जो आज दिसत नाही, तो कोठे होता, त्याची व्याप्ती कशी होती हे आराखडयासहित दाखवले आहे. 1668 साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने किल्ला उभारण्यास सुरुवात केली व 1716 साली बांधून पूर्ण केला. याला तीन मजबूत सुरक्षित दरवाजे होते. पूर्वेकडील दरवाजा अपोलो गेट, लायन गेटजवळ होता. पश्चिमेकडील दरवाजा चर्चगेट या नावाने ओळखला जाऊ लागला. आज जेथे फ्लोरा फाऊंटन आहे तेथे हे गेट होते व तिसरे गेट उत्तरेस बझार गेट येथे म्हणजे आज ज्या ठिकाणी जी.पी.ओ. आहे त्यासमोर बझार गेट पोलीस स्टेशन आहे तेथे होते. या गडकोटाच्या आतमध्ये मजबूत गढी (castle) उभारण्यात आली. 1743 मध्ये नागरिकांकडून वर्गणी गोळा करून या गढीभोवती खंदक तयार करण्यात आला व गढीच्या पश्चिमेला मोकळे सपाट मैदान तयार करण्यात आले. त्याचा हेतू गलबते जहाजे इत्यादींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा होता. त्याला त्यांनी एस्प्लनेड (समुद्रकिनाऱ्यालगतचे) मैदान अशी संज्ञा दिली. 1860 मध्ये हा गढकोट पाडण्यांत आला. तरीपण हा भाग आजही फोर्ट किंवा कोट म्हणून ओळखला जातो.
पहिल्या भागात टाऊन हॉल ते फाऊंटन या परिसराची माहिती आहे. टाऊन हॉलविषयी माहिती देतांना हा टाऊन हॉल ‘दोरिक’ या जुन्या ग्रीक शैलीत बांधला असून त्याला 30 पायऱ्या आहेत. आतमध्ये सभागारात मुंबईचे गव्हर्नर माऊंट स्टयुअर्ट एलफिन्स्टन यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. गोलाकार जिन्याच्या पायथ्याशी मुंबईचे दानशूर शिक्षणप्रेमी जगन्नाथ शंकरशेट यांचा आसनस्थ पुतळा व पहिले बॅरोनेट सर जमशेटजी जिजीभाई यांचा आसनस्थ पुतळा व त्याच बरोबर सुप्रसिध्द संस्कृत पंडित भारतरत्न पां.वा. काणे यांचा ब्राँझमध्ये घडवलेला अर्धपुतळा आहे. हा 1833 मध्ये बांधून तयार झाला. पहिल्या पायरीजवळ एक चौकोनी शिला बसवली आहे व त्यावर शून्य कोरलेले आहे. ही खूण म्हणजे मुंबई शहराची शून्य पातळी (zero level) आहे. याला डेटम किंवा बेंचमार्क म्हणतात. मुंबईत एकूण असे 52 बेंच माक्र्स आहेत. त्यानंतर हॉर्निमन सर्कल, ज्याला पूर्वी एलफिन्स्टन सर्कल म्हणत, त्याची व्याप्ती 12081 चौ. यार्ड असून ते 1872 मध्ये बांधून तयार झाले असा उल्लेख आहे. त्यानंतर फ्लोरा फाऊंटन, मुंबई समाचार इमारत, सेंट थॉमस कॅथीड्रल, दादाभाई नवरोजी पुतळा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जुने गव्हर्नमेंट हाऊस, स्टेट बँक या वास्तूंचा परिचय आहे.
दुसऱ्या भागात डॉकयार्ड परिसर, रायटर्स बिल्डिंग, ग्रेट वेस्टर्न बिल्डिंग, के. आर कामा इन्स्टिटयूट यांचा परिचय आहे.
तिसऱ्या भागात गेटवे परिसर, अणुऊर्जा आयोग कार्यालय, याट क्लब, ताजमहाल हॉटेल, खुसरो बाग, वेसलीयन चर्च व रिगल सिनेमा यांचा परिचय आहे. गेटवेसंबंधी माहिती म्हणजे भारतीभूमीवर पाय ठेवणारे पहिले सिंहासनस्थ इंग्रज सम्राट पंचम जॉर्ज यांच्या 1911 सालच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ उभारलेले शिल्प जार्ज विटेट यांनी डिझाईन करून पायाभरणी 1913 मध्ये झाली व मे 1920 मध्ये पूर्ण झाले. कळसाचा घुमट 48 फूट व्यासाचा व टोकाला 82 फूट उंच आहे. ताजमहाल हॉटेल 1903 मध्ये पूर्ण झाले. जमशेटजी टाटा यांनी रावसाहेब सीताराम खंडेराव वैद्य यांच्या सहकार्याने डिझाईन केले. जुन्या ताजच्या डिझाईनवर रावसाहेब वैद्य व श्री डी मिर्झा यांच्या सह्या आहेत. नंतर अपोलो बंदर, कुलाबा कॉजवे, इलेक्टि्रक हाऊस, वेसलियन चर्च यांची माहिती आहे.
चौथ्या भागात वेलिंग्टन कारंजे (शामाप्रसाद मुखर्जीचौक), महाराष्ट्र पोलीस कार्यालय, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, डेव्हिड ससून लायब्ररी वगैरे वास्तू आहेत. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचा पायाभरणी समारंभ 1905 साली प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते झाला व 1923 साली लेडी लॉईड गव्हर्नर या गव्हर्नरांच्या पत्नीच्या हस्ते उद्घाटन झाले. हिची बांधणी इंडो सारसेनिक शैलीची आहे.
पाचव्या भागात बॅलार्ड इस्टेट परिसर, यांत मिन्ट (टाकसाळ), पोर्ट ट्रस्ट कार्यालय, कस्टम हाऊस, वॉर मेमोरिअल वगैरे बारा वास्तूंचा परिचय आहे. या भागांत एकंदर 43 इमारती असून आर्किटेक्ट विटेट यांनी बहुतांश इमारती रिनेसाँन्स या युरोपिअन शैलीनुसार बांधलेल्या आहेत.
सहाव्या भागात नगर चौक परिसर, यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी.पी.ओ., नगर चौक, व्ही.टी. स्टेशन, महानगरपालिका मुख्यालय वगैरे 11 वास्तूंचा परिचय आहे. मुख्य म्हणजे जी.पी.ओ. ही इमारत इंडो सारसेनिक शैलीची असून 1911 साली बांधून पूर्ण झाली. या इमारतीवरील घुमटाची रचना विजापूरच्या गोल घुमटासारखी आहे. यांचे आर्किटेक्टदेखील विटेट. बोरीबंदर (व्ही.टी.) इमारतीचे काम 1878 मध्ये सुरू झाले व 10 वर्षांनी पूर्ण झाले. इमारत बांधणीस 16 लाख तीस हजार तर दहा लाख स्टेशनच्या उभारणीस लागले. फ्रेडरिक स्टिव्हन्स यांनी डिझाईन केलेल्या इमारतीच्या कामात सीताराम खंडेराव वैद्य यांची मदत घेतल्याचा उल्लेख आहे. व्हिक्टोरिया टर्मिनस हे जगातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्टेशन समजले जाते. (लंडनचे व्हिक्टोरिया स्टेशन व्ही.टी.च्या तुलनेत अतिसामान्य वाटते.) महानगरपालिका कार्यालय पायाभरणी समारंभ 6 डिसेंबर 1884 साली लॉर्ड रिपन व्हाईसरॉय यांच्या हस्ते झाला व 1893 मध्ये ही वास्तू पूर्ण झाली. या इमारतीच्या मनोऱ्याची उंची जमिनीपासून 235 फूट आहे. या इमारतीसमोरच सर फिरोझशाह मेहता यांचा ब्राँझमधे घडवलेला भव्य पुतळा आहे.
सातव्या भागात कॅपिटल सिनेमा, नगर चौक, डे. पोलीस कमिशनर्स ऑफिस, स्ट्रॅन्ड बुक शॉप, लक्ष्मी बिल्डिंग वगैरेचा उल्लेख आहे.
आठव्या भागात कॅपिटल सिनेमा, एस्प्लनेड पोलीस कोर्ट, कामा हॉस्पिटल, एलफिन्स्टन टेक्निकल स्कूल, मेट्रो, टाईम्स ऑफ इंडिया यांचा परिचय आहे. क्रॉफर्ड मार्केट 72000 स्क्वेअर यार्ड जागेवर वसले आहे. इमारतीचे डिझाइन विल्यम इमरसन यांचे असून 1869 मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. घुमटाला घडयाळ असलेला जमिनीपासून मनोरा 128 फूट उंच आहे. दारापाशी रुडयार्ड किपलिंग यांचे वडील जे. लॉकवूड किपलिंग यांनी घडवलेल्या सुबक शिल्पाकृती बासरीलीफ शैलीत बसवल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडिया गोथिक व सारसेनिक शैलीत बांधले आहे व या वृत्तपत्राला विनोदाने द ओल्ड लेडी ऑफ बोरीबंदर असे संबोधण्यात येते असा उल्लेख आहे.
नवव्या भागातील दादाभाई नवरोजी रोड परिसरामधे कॅपिटल सिनेमा, टाटा पॅलेस, अलेक्झांड्रा स्कूल, जे. एन. पेटीट लायब्ररी वगैरे 23 वास्तूंचा परिचय आहे.
दहावे प्रकरण गोथिक व डेको परिसर नावाने आहे. त्यांत फ्लोरा फाउंटन, वेस्टर्न रेल्वे मुख्यालय, हायकोर्ट बिल्डिंग, मुंबई युनिव्हर्सिटी संकुल, जुने सचिवालय वगैरे 18 वास्तूंचा परिचय आहे. उल्लेखनीय म्हणजे P.W.D. बिल्डिंगव्हेनेशियन गोथिक शैलीत असून कर्नल एच. सेन्ट. विल्किन्स यांनी या इमारतीचे डिझाईन केले आहे व ही इमारत 1872 मध्ये पूर्ण झाली. हायकोर्ट डिझाईन जे. ए. फुल्लर यांनी केले असून ते ऱ्हाईन नदीच्या काठावर पाहिलेल्या एका राजेशाही गढीवरून (castle वरून) आखलेले आहे. या इमारतीला 16.5 लाख खर्च झाला व सात वर्षांनतर 1878 मध्ये ही इमारत बांधून झाली.
पुस्तक हातात घेतल्यानंतर ते वाचूनच पूर्ण करावे असे वाटते. शिवाय सगळया शिल्पांची छायाचित्रे फारच सुंदर व मनोवेधक आहेत. सुरुवातीला फोर्ट विभागाचा नकाशा आहे.
लेखिका शारदा द्विवेदी या श्री जोशी या आय.सी.एस. ऑफिसरांची कन्या. त्यांनी मुंबई विद्यापीठाची लायब्ररी सायन्स पदवी संपादन करून संदर्भशास्त्र या विषयातील खास प्रशिक्षण पॅरिस येथे घेतले. भगवान द्विवेदी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अलीकडेच फेब्रुवारीच्या सुरुवातीस मेंदूच्या विकाराने शारदा द्विवेदी यांचे दु:खद निधन झाले. त्या मुंबईच्या हेरिटेज कंझर्व्हेशन कमिटीच्या सभासदही होत्या.
त्यांनी लिहिलेली पुस्तके इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी व वाचनीय आहेत. हे पुस्तक अतिशय छान शैलीत माहितीपूर्ण असून सर्वांनी संग्रहात ठेवावे असे आहे.
— वसंत गद्रे
022-28728226
# मुंबापुरीचा रंजक इतिहास
Leave a Reply