नवीन लेखन...

पुण्यातील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’चा स्थापना दिवस

पुण्यातील अत्यंत गजबलेला आणि तरुणाईने फुललेला रस्ता अशी ओळख असलेल्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’हा बोर्ड दिसतो. आत गेल्यावर प्रशस्त दगडी बांधकाम डोळ्यात भरतं. याच इमारतीत कधी काळी गांधीजी वास्तव्यास होते. गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरू. इतिहासाच्या पाऊलखुणा या आवारात आजही जाणवतात. अर्थशास्त्र विषयक अध्यापन आणि संशोधनांमध्ये दबदबा असणारी संस्था म्हणून पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचा, अर्थातच गोखले इन्स्टिटय़ूटचा विचार केला जातो. तेथील धनंजयराव गाडगीळ ग्रंथालय. दोन लाख ८० हजार पुस्तकांचा खजिना असलेले ग्रंथालय. ग्रंथालयाची स्थापना १९०५ साली सार्वजनिक ग्रंथालयाच्या रूपात गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. भारत सेवक समाज व गोपाळ कृष्ण गोखले यांनी ६ जून १९३० रोजी ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’ची स्थापना केली.

ही संस्था अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये सखोल संशोधन करणारी देशातील सर्वात जुनी संस्था म्हणूनही ओळखली जाते. या संस्थेच्या स्थापनेपासूनच अर्थशास्त्रविषयक संशोधनांवर भर देण्याचे धोरण अवलंबिण्यात आले होते. भारतीय समाजकारण आणि अर्थकारणाशी संबंधित संशोधनाच्या क्षेत्रामध्ये या संस्थेने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय अर्थकारणापासून ते आपल्याकडील ग्रामविकास आणि सहकाराशी संबंधित मुद्दय़ांपर्यंत आणि शेतीविषयक अर्थकारणापासून ते लोकसंख्याशास्त्रापर्यंतच्या विविध विषयांवरील संशोधनांमध्ये या संस्थेने आपली छाप पाडली आहे. अशा सर्वच बाबींसाठी आवश्यक ठरणारे प्रशिक्षण आणि त्यासाठी पूरक ठरणाऱ्या अभ्यासक्रमांची उपलब्धता ही संस्था सातत्याने करून देत आहे. अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील नानाविध विषयांना वाहिलेली गुणात्मक संशोधने पुढे आणणाऱ्या या संस्थेच्या कार्याचे महत्त्व विचारात घेत १९९३ साली या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला.

संस्थेमध्ये सुरुवातीच्या काळात एम.ए., एम. फिल आणि पीएच.डी.चे अभ्यासक्रम चालविले जात होते. सुरुवातीला मुंबई विद्यापीठ, त्यानंतर तत्कालीन पुणे विद्यापीठांतर्गत चालणारे एक संशोधन आणि अध्यापन केंद्र म्हणून, तर १९९३ पासून एक स्वतंत्र अभिमत विद्यापीठ म्हणून या संस्थेची प्रगती होत गेली. सध्या या संस्थेमध्ये अर्थशास्त्राच्या मूलभूत मुद्दय़ांचा सखोल आढावा घेऊ शकणारे पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याअंतर्गत इकॉनॉमिक्स, फायनान्शिअल इकॉनॉमिक्स, ॲ‍आग्रीबिझनेस इकॉनॉमिक्स आणि इंटरनॅशनल बिझनेस या चार विषयांमध्ये विद्यार्थ्यांना एम. एस्सीचे शिक्षण पूर्ण करता येते. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अशा अर्थशास्त्रविषयक बाबींशी निगडित मूलभूत व्यवहार, सद्धांतिक संकल्पना आणि त्यांचा प्रत्यक्ष व्यवहारातील वापर, विविध धोरणांच्या निर्मितीसाठीच्या प्रक्रिया, त्यासाठीचा सांख्यिकीय अभ्यास करणे शक्य होत आहे. मायक्रोइकॉनॉमिक थिअरी, मॅक्रो- इकॉनॉमिक थिअरी, इकोनोमेट्रिक्स या मुख्य विषयांच्या जोडीने विद्यार्थ्यांना या विषयांना पूरक ठरू शकणारे अनेक वैकल्पिक विषयही पदवीच्या काळात अभ्यासता येतात. फायनान्शिअल इकॉनॉमिक्स विषयाच्या संद्धांतिक अभ्यासाला तितक्याच व्यापक प्रात्यक्षिकांची जोड देणारी यंत्रणा संस्थेमध्ये उपलब्ध आहे. अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था – संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचाही ही संस्था उत्तम उपयोग करून घेते. या विद्यार्थ्यांच्या अनुभवाच्या आधारावर अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सातत्याने नव्या मुद्दय़ांची भर घातली जाते. अशा प्रकारचे नानाविध अभ्यासक्रम आणि विषय नव्या-जुन्या विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक पातळीवरच नव्हे, तर व्यवहाराच्या पातळीवरही तितकेच उपयुक्त ठरत आहेत. शेतीविषयक उद्योगधंद्यांमधील तसेच उद्योगांच्या अर्थकारणाचे बारकावेही या संस्थेच्या अभ्यासक्रमामधून जाणून घेता येतात. संस्थेमध्ये सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ॲ‍्प्लिकेशन्स इन इकॉनॉमिक ॲ‍तनालिसिस हा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध करून देण्यात आला आहे. संस्थेमध्ये एम. एस्सी. अभ्यासक्रमाला नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान इंटर्नशिपचा काळ पूर्ण करावा लागतो. त्याद्वारे अभ्यासक्रमादरम्यान शिकलेल्या बाबींचा प्रत्यक्ष अनुभवातून आढावा घेण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळते. याशिवाय संशोधनाच्या पातळीवरील पीएच.डी.चा अभ्यासक्रमही संस्थेमध्ये उपलब्ध आहे.

पुण्यातील डेक्कनच्या परिसरामध्ये या संस्थेचे शैक्षणिक संकुल वसलेले आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या संकुलामध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व शैक्षणिक सोयी-सुविधांची उपलब्धता करून दिली जाते. याच संकुलामध्ये संस्थेचे ग्रंथालय आणि सभागृहाची सुविधाही उपलब्ध आहे. १९०५साली संस्थेमध्ये सुरू झालेले ग्रंथालय हे धनंजयराव गाडगीळ ग्रंथालय म्हणून ओळखले जाते. या ग्रंथालयाच्या माध्यमातून अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतची नानाविध संशोधने अभ्यासणे अभ्यासकांसाठी शक्य झाले आहे. केवळ अर्थशास्त्रच नव्हे, तर इतर विषयांचा सखोल आढावा घेणारे तीन लाखांहून अधिक दस्तावेज, कागदपत्रे, पुस्तके, ग्रंथ आणि नियतकालिके हे ग्रंथालय विद्यार्थ्यांसमोर तितक्याच प्रभावीपणे घेऊन येते. संस्थेमध्ये निरनिराळी संशोधन केंद्रेही चालविली जातात. ॲ‍ाग्रो इकॉनॉमिक रिसर्च सेंटरमध्ये (एईआरसी) शेतीवर आधारलेल्या अर्थव्यवस्थेविषयी आणि त्यावर परिणाम करणाऱ्या नानाविध घटकांविषयी सखोल संशोधने करण्याचे काम चालते. १९५४ मध्ये स्थापन झालेल्या या केंद्रामध्ये आत्तापर्यंत जलसिंचनाचे अर्थकारण, पाणलोटक्षेत्र विकास, माती आणि जलसंधारण, शाश्वत विकास आदी मुद्दय़ांबाबत सखोल संशोधन झालेले आहे. पॉप्युलेशन रिसर्च सेंटरमध्ये (पीआरसी) लोकसंख्याशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याचे काम चालते. सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल एक्स्क्लुजन ॲ‍ण्ड इन्क्लुजिव्ह पॉलिसी (सीएसएसई ॲ‍ण्ड आयपी) हे एक आंतरविद्याशाखीय संशोधन आणि अध्यापन केंद्र म्हणून पुढे आले आहे. सर्वसमावेशक धोरणांवरील संशोधने हे या केंद्राचे एक वैशिष्टय़ं ठरते. याशिवाय संस्थेमध्ये रिझव्‍‌र्ह बँक, केंद्रीय नियोजन आयोग, फोर्ड फौंडेशन, कमलनयन बजाज फौंडेशन याच चार संस्थांच्या मदतीने चालणारी चार अध्यासनेही आहेत. अशा सर्वच सुविधांच्या मदतीने या संस्थेने विद्यादानाच्या क्षेत्रामध्ये आपली प्रगती कायम ठेवत आहे.

संस्थेच्या http://www.gipe.ac.in या संकेतस्थळावर या अभ्यासक्रमांविषयी सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..