श्री.ग. माजगांवकर हे ’माणूसकार श्रीगमा’ या नावाने प्रसिद्ध होते. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच आणि विशेष करून साठोत्तरी कालखंडात ‘माणूस’ साप्ताहिकाची स्थापना करण्यात आली. माणूस’चा पहिला अंक १ जून १९६१ रोजी प्रसिद्ध झाला. काही काळ मासिक असलेले ‘माणूस’ नंतर साप्ताहिक करावे लागले, इतकी त्याची आवश्यकता भासू लागली होती. काही काळाने ‘माणूस’ने स्वत:चे मुद्रणालयही चालू केले. १९६१ ते १९९१ अशा तीन दशकांमध्ये अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळी होत होत्या. वेगवेगळ्या विचारसरणींची माणसे एकत्र येऊन सर्वच क्षेत्रांत नवे प्रयोग करीत होती. सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक तरूण स्वत:ला स्वयंस्फूर्तीने या कामामध्ये झोकून देत होते.
‘साप्ताहिक माणूस’चे संस्थापक-संपादक श्री.ग. माजगावकर यांनी ‘माणूस’च्या माध्यमातून या चळवळींविषयी आणि जगभरातील ठळक घडामोडींचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक विश्लेषण केले. हे विश्लेषण मराठी वाचकांसमोर ठेवत मराठी माणूस सकस माहितीने समृद्ध कसा होईल याकडे माजगावकर यांचा कटाक्ष होता. कोणत्याही घटनेवर श्री. ग. माजगावकर काय म्हणतात याकडे वाचकांचे लक्ष असायचे. सकस स्वरूपाचे वैचारिक लेखन देत मराठी साप्ताहिकाचा खप वाढविताना माजगावकर यांनी वाचकांची पिढी घडविली. या माध्यमातून विविध क्षेत्रांतील लेखक घडले.
सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना श्रीगमांनी लिहिते केले. सामाजिक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य देऊन विविध चळवळींना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी कृतिशील पाठिंबा दिला. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना आपापली मते मांडण्याची हक्काची जागा ‘माणूस’ने दिली होती. नेते मंडळींना ‘माणूस’चा धाक वाटायचा. यशवंतराव चव्हाणांनी तर ‘माणूस’चा प्रत्येक अंक मिळालाच पाहिजे, असा आदेश आपल्या खासगी सचिवांना देऊन ठेवला होता. आणीबाणीचा काळ हा तर सर्वच पत्रकारांच्या अत्यंत कसोटीचा काळ होता. सगळ्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्या लावल्या होत्या.
‘माणूस’चे मुखपृष्ठ संपूर्ण काळ्या रंगाचे- त्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह काढून श्रीगमांनी आपला विरोध नि:शब्दपणे, पण अत्यंत समर्थपणे व्यक्त केला. त्याबद्दल पोलिसांनी बोलावून त्यांना चांगली ‘समज’ही दिली होती. भारतात किंवा जगभरात जिथे कुठे अशांतता, असंतोष, उद्रेक, किंवा काही आशादायक घडले, की त्वरित त्याचा लेखाजोखा ‘माणूस’मधून घेतला जायचा. तत्कालीन ज्वलंत राजकीय-सामाजिक विषयांवरील खास पुरवण्या किंवा विशेषांक हे ’माणूस’चे वेगळेपण होते. ‘साप्ताहिक माणूस’च्या अंकांमध्ये या सर्वाचे प्रतिबिंब नेहमीच बघायला मिळत असे.
गमा यांच्या सामाजिक कार्याची स्मृती म्हणून त्यांच्या नावाचा श्रीगमा पुरस्कार दिला जातो.
श्री.ग. माजगावकर यांचे २० फेब्रुवारी १९९७ रोजी निधन झाले.
‘साप्ताहिक माणूस’चे सर्व अंक आता पीडीएफ स्वरूपात इंटरनेटवर उपलब्ध झाले आहेत. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply