नवीन लेखन...

दिलीपराज प्रकाशन संस्थेचे संस्थापक प्रा. द. के. बर्वे

प्रा. द. के. बर्वे यांचा जन्म २१ ऑगस्ट १९१७ रोजी बेळगाव येथे झाला.

द. के. बर्वे यांना जवळचे लोक भाऊ म्हणत असत. बी. ए. व एम. ए.चे त्यांचे शिक्षण मराठी प्रमुख विषय घेऊन फर्गुसन महाविद्यालयात व पुणे विद्यापीठात झाले. बी. एड. बेळगाव इथून शिक्षण महाविद्यालयातून केले. न्यू इंग्लिश स्कुल नानावाडा आणि नंतर टिळक रोड या शाळेत त्यांनी मराठीचे नामवंत शिक्षक म्हणून नाव कमावले. त्यानंतर विवेकानंद शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांमधून उस्मानाबाद,इचलकरंजी, कोल्हापूर व तासगाव इथे त्यांनी मराठीचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळवला. या सर्व शिक्षकी पेशामध्ये त्यांना मानणारा मोठा विद्यार्थी वर्ग आजही स्मरणाने त्यांचे ऋण व्यक्त करतो.

मराठीवर त्यांचे जिवापाड प्रेम आणि तेवढेच प्रभुत्वही. बेळगावच्या सुप्रसिद्ध सरदार हायस्कुलमध्ये इंग्रजी माध्यमातून त्यांचे शालेय शिक्षण झाल्यामुळे त्यांचे इंग्रजीही उत्तम होते, त्याची साक्ष वोरा आणि कंपनीने त्यांच्याकडून शेक्सपिअरच्या अनेक नाटकांवरून कुमारांसाठी करून घेतलेल्या कादंबरिकांवरून येईल. प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी ‘निवडक नवनीत’ व वामन मल्हारांच्या आश्रमहरिणीच्या समीक्षेचे ‘आश्रमहरिणीचे अंतरंग’ ही पुस्तके लिहिली. त्या वेळचे सुप्रसिद्ध व्हिनस प्रकाशनचे स. कृ. पाध्ये यांनी ती प्रकाशित केली आणि बर्वे यांनी अधिक समीक्षालेखन करावे, असे सुचवले; पण त्यांचा खरा पिंड सर्जनशील लेखकाचा होता.

१९५० साली ‘आंबटषौक’ हा त्यांचा प्रौढ वाचकांसाठी पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला, पण त्यानंतर ते प्रामुख्याने वळले बालकुमार साहित्याकडे. बालवाङ्मयाची जवळजवळ सत्तर उत्तमोत्तम पुस्तके लिहून त्यांनी बालसाहित्यकार म्हणून चांगले नाव मिळवले आणि बालसाहित्यात मोलाची भर घातली. आपल्या लहानपणी वाचलेली त्यांची किती तरी सुंदर पुस्तके, कथा-कादंबरिका आजही महाराष्ट्रातील अनेकांच्या स्मरणात आहेत आणि आजच्या पिढीला ही पुस्तके उपलब्ध नाहीत याचे शल्यही मनात आहे. गुलछबू, फुलराणी, गोड गुपित, देशासाठी दर्यापार, बोलका मासा, चंद्रावर ससा, किती वाजले, नन्नी, छबुकड्या गोष्टी, डॉक्टर पोटफोडे— अशी किती तरी वाचनीय आणि गुंतवून ठेवणारी पुस्तके त्या काळात बाल वाचक आवडीने वाचत होते. त्यातली काही पुस्तके समर्थ प्रकाशन— वा. रा. ढवळे यांनी काढली, तर नंतर भाऊंनी स्वत:च्या सुरू केलेल्या दिलीपकुमार प्रकाशनाने काही पुस्तके काढली.

महाराष्ट्र शासनाने नवसाक्षर प्रौढांसाठी काही पुस्तके लिहून घेण्यासाठी महाराष्ट्रातील मान्यवर लेखकांचे एक निवासी शिबिर भोर येथे भरवले होते. त्यात भाऊंनी लिहिलेले ‘गणूचा गाव’ हे पुस्तक महाराष्ट्रभर ग्रामीण भागात सर्वदूर पोचले. ही कादंबरी इतकी पकड घेणारी होती की, पुढे राष्ट्रीय स्तरावर लखनौ येथे भरलेल्या लेखक शिबिरातून त्यांची व प्रसिद्ध कादंबरीकार वि. वि. बोकील यांची निवड झाली.

१९७६ साली सेवानिवृत्तीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन भाऊंनी पुण्यात प्रकाशन व्यवसाय जोमाने सुरू केला. तत्पुर्वी ३ ऑक्टोबर १९७१ ला दिलीपराज प्रकाशन संस्थेची सुरुवात कोल्हापूरला ते प्राध्यापक असतानाच मंगळवार पेठेतील आपल्या राहत्या घरीच प्रा. द. के. बर्वे यांनी ५० पैसे किंमत असलेल्या १६ पानी ‘छान छान नाटुकली’ या त्यांची कन्या डॉ अश्विनी धोंगडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करून केली. आज दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. ही साहित्य विश्वात आणि संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली अशी ख्यातनाम प्रकाशन संस्था आहे. या संस्थेने २५०० अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत आणि हा या क्षेत्रातला एक विक्रमच असेल! सध्या दिलीपराज प्रकाशनचे कामकाज त्यांचे चिरंजीव राजीव बर्वे आणि त्यांची दोन्ही मुले बघत आहेत.नंतर दिलीपराज ने त्यांची अगडबंब राक्षस, पिपातला राक्षस, माकडबाळ, चिव चिव चिमणी,छबुकड्या गोष्टी वगैरे त्यांनी लिहिलेली लहान मुलांसाठीची पुस्तके काढण्यास सुरुवात केली, पण त्यात त्यांचा जीव आता रमेना. लेखनाची उर्मी, आयुष्यभरातले कडू-गोड अनुभव गाठीला आणि जात्याच असलेली प्रतिभा यांच्या जोरावर त्यांनी १९८०-८१ या दोन वर्षांत पुट्टी, पोकळी व पंचवेडी या तीन कादंबऱ्या लिहिल्या. साहित्य परिषदेच्या सभागृहात त्यांचे प्रकाशन समारंभही झाले. बालपणापासूनचे त्यांचे जिवलग मित्र बेळगावचे प्रसिद्ध उद्योगपती रावसाहेब बा. म. गोगटे यांचे चरित्र लिहिण्याचा घाट त्यांनी घातला आणि सागरमेघ पुर्ण केले.मुंबई, बेळगाव, पुणे अशा त्यांच्या वाऱ्या सुरू झाल्या.

हे चरित्र सर्वतोपरी उत्कृष्ट व्हावे, असा त्यांचा ध्यास होता. त्याचा ताण नकळतपणे त्यांच्यावर आला की काय नकळे, पण पुस्तक छापून होण्यापूर्वी केवळ दोन दिवस आधी २४ डिसेंबर १९८१ रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे वयाच्या केवळ ६३ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले.

दि. १२ जानेवारी १९८२ रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ ठरला होता, तो त्यांच्या आठवणी काढत पार पडला. रणजित देसाईंनी त्या वेळी काढलेले भावोद्गार.

‘‘लेखक या नात्याने मी सांगू इच्छितो की, दत्तोपंतांनी अत्यंत सुंदर भावकाव्य निर्माण केले आहे. एक ज्येष्ठ ग्रंथकार मराठीत अवतरला ,रूपाने आणि गुणानेही!’’

— राजीव बर्वे.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..