मालदीव, श्रीलंकेतील अलीकडच्या घडामोडींच्या निमित्ताने शेजारी राष्ट्रांबाबतच्या भारताच्या अनाकलनीय धोरणाचा पुन्हा प्रत्यय आला. पाकिस्तान, चीनबरोबरची डोकेदुखी कायम असताना बांगला देश, नेपाळ आदी शेजार्यांशीदेखील आपण सुरळीत संबंध राखू शकत नाही याला कारणीभूत ठरतात आपली चुकीची गृहितके. फ्रान्सच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर फ्रान्स्वा ओलॉद यांनी युरोपबाहेरील पहिल्या परदेश दौर्यासाठी भारताची निवड करावी, यावरून भारताबरोबरच्या संबंधांना तो देश किती महत्त्व देत आहे, ते कळते. ओलॉद यांच्याबरोबरच त्यांच्या मैत्रिणीचेही स्वागत करण्यासाठी राजशिष्टाचारविषयक नियमांमध्ये लवचिकता दाखवून भारतानेही या भेटीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. भारत व फ्रान्स या दोघांनाही आर्थिक मंदीची छाया भेडसावत आहे. अशा काळात व्यूहात्मक, आर्थिक व तंत्रज्ञानात्मक सहकार्य वाढविण्याच्या भारत व फ्रान्सच्या प्रयत्नांच्या दृष्टिकोनातून या भेटीकडे पाहावे लागेल. ओलांदे यांनी आपल्या शिष्टमंडळात, त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ सदस्य आणि फ्रान्सचे आघाडीचे उद्योजक यांचा समावेश करत ही भारतभेट त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे सूचित केले होते. आंतरराष्ट्रीय शिष्टाचारानुसार, एका देशाच्या कार्यप्रमुखाने दुसर्या देशाला भेट दिल्यानंतर, त्या दुसर्या देशाच्या कार्यप्रमुखाने पहिल्या देशाला भेट देणे अपेक्षित असते. यानुसार, भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची फ्रान्स भेटीची पाळी होती. मात्र दोन्ही देशांनी या राजनैतिक परंपरेला फाटा देत राष्ट्राध्यक्ष ओलांदे यांच्या भारत दौर्या ला अंतिम स्वरूप दिले.
भारत फ्रान्स मजबूत सामरिक आणि संरक्षण संबंध
फ्रान्सला ओलांदे यांच्यापूर्वी फ्रान्सच्या अध्यक्षपदाची धुरा वाहणारे, निकोस सार्कोझी डिसेंबर 2010 मध्ये भारतभेटीवर आले होते. आंतरराष्ट्रीय राजकारणात सार्कोझी-मनमोहनसिंग यांनी 2009 मध्ये इटलीत झालेली जी-8+5 परिषद, लंडन आणि पिट्सबर्ग येथे भरलेल्या जी-20 परिषद आणि 2010 मध्ये टोरंटो आणि सेउलमध्ये झालेल्या जी-20 परिषदांमध्ये परस्पर सामंजस्य प्रस्थापित करत द्विपक्षीय आणि बहुराष्ट्रीय सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली होती. सन 2009 मध्ये फ्रान्सने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना ‘बैस्तिले डे परेड’ म्हणून ओळखल्या जाणार्या त्यांच्या राष्ट्रीय दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून सन्मानित केले होते. ‘बैस्तिले डे परेड’ ही संपूर्ण युरोपमधील सर्वाधिक भव्यदिव्य लष्करी कवायत म्हणून प्रसिद्ध आहे. डॉ. सिंग यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कराच्या 400 मराठा रेजीमेन्टच्या जवानांनी या परेडचे नेतृत्व केले होते. या कालावधीत भारत आणि फ्रान्सदरम्यानचे सामरिक आणि संरक्षण बंध मजबूत होत गेले. शिवाय सांस्कृतिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण इत्यादी क्षेत्रातील सहकार्य वाढीस लागले. याच कालावधीत गाजलेल्या भारत-अमेरिका नागरी आण्विक सहकार्य कराराचा फायदा भारत-फ्रान्स संबंधांना नवी दिशा मिळण्यास झाला. भारत-अमेरिका नागरी आण्विक सहकार्य कराराच्या आधारे भारताला अणुऊर्जेच्या शांततापूर्ण विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची परवानगी मिळताच फ्रान्स हे पहिले राष्ट्र होते, ज्यांनी भारताशी यासंबंधी तत्काळ करार केला होता.
फ्रान्समध्ये 70 टक्के ऊर्जा अणुप्रकल्पाच्या माध्यमातून
सार्कोझी यांच्या काळात भारत-फ्रान्स अणुकरार होऊन महाराष्ट्रातील जैतापूर येथे 10 हजार मेगावॅट क्षमतेच्या अणुप्रकल्पाची पायाभरणी झाली होती. जैतापूर अणुप्रकल्पाचे तंत्रज्ञान अरेवा या फ्रेंच कंपनीकडून पुरवले जाणार आहे. ओलांदेंना सार्कोझींच्या काळात भारतासमवेत झालेला अणुकरार आणि लष्करी करार पुढे न्यायचा आहे. त्यामुळे भारतात अणुऊर्जेविषयी बरेचसे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी आपली भारतभेट आखली होती. ओलांदे यांनी मुंबईत येऊन राज्यपाल के. शंकरनारायण, उद्योगमंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याशी जैतापूरबाबत चर्चा केली व फ्रान्स सर्वोत्तम अणुतंत्रज्ञान देण्यास वचनबद्ध आहे असे स्पष्ट केले. वास्तविक फ्रान्समध्ये सुमारे 70 टक्के ऊर्जा ही अणुप्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण केली जाते व तेथे कित्येक दशके एकाही अणुप्रकल्पामध्ये दुर्घटना घडलेली नाही .
ओलांदे यांनी केवळ अणुतंत्रज्ञान नव्हे तर भारताशी 126 राफेल लढाऊ विमान खरेदीच्या संदर्भातही महत्त्वाची पावले उचलली आहेत. लढाऊ विमान खरेदीचा करार या वर्षी होण्याची शक्यता आहे. या विमान खरेदीमुळे भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य वाढेल. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीत स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी फ्रान्स कित्येक वर्षे लॉबिंग करत आहे. 1998 मध्ये अणुचाचण्या केल्यानंतर अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध घातलेले होते. या निर्बंधांच्या विरोधात त्या वेळी फ्रान्सने आवाज उठवला होता.
700 फ्रेंच कंपन्या भारतात कार्यरत
संरक्षण आणि अणुऊर्जा हे विषय सोडले, तर ग्रामीण विकास, संशोधन आणि विकास, औषधनिर्माण, पारंपरिक ऊर्जा आणि अवकाश तंत्रज्ञान हे दोन देशांतील चर्चेचे मुख्य विषय आहेत. सागरी सर्वेक्षणासाठी फ्रान्स आणि भारत यांच्या संयुक्त विद्यमाने “सरल’ हा उपग्रह या महिन्याच्या अखेरीस अवकाशात सोडला जाणार आहे. सध्या केवळ तीन हजार भारतीय विद्यार्थी फ्रान्समध्ये शिक्षण घेत आहेत, याची खंत ओलॉद यांना आहे. त्यामुळेच उच्चशिक्षण व संशोधनक्षेत्र भारतीयांसाठी खुले करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. सध्या दुतर्फा व्यापाराचे प्रमाण केवळ साडेआठ अब्ज डॉलर आहे. त्यात वृद्धी करण्यास मोठा वाव असून, फ्रान्सच्या साडेसातशे कंपन्यांनी भारतात केलेल्या अडीच लाख रोजगारनिर्मितीप्रमाणेच भारतीय कंपन्यांनीही फ्रान्समध्ये गुंतवणूक करावी, हा ओलॉद यांचा आग्रह या भेटीत स्पष्ट झाला. ओलांदे यांनी सध्याच्या इराण प्रश्नाबाबत भारताने फ्रान्सची मदत करावी, अशीही मागणी केली.
सध्या आर्थिक मंदीचा दोन्ही देशांतील व्यापारावर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. 2011 मध्ये द्विपक्षीय व्यापारात फक्त 5.8% इतकीच वाढ झाली, जी 2010 मध्ये 30% होती. भारताची फ्रान्सला होणारी निर्यात 13 टक्क्यांनी वाढलेली आहे. मात्र, फ्रान्सकडून होणारी आयात 4.5 टक्क्यांनी घटलेली आहे. भारतात प्रत्यक्ष गुंतवणूक करणार्या देशांमध्ये फ्रान्सचा क्रमांक आठवा असून, सुमारे 700 फ्रेंच कंपन्या भारतात कार्यरत आहेत. मात्र, भारतीय गुंतवणूकदार अद्याप फ्रान्सबाबत उदासीन आहेत.
ओलांदे यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी लढण्यासाठी फ्रान्स भारताला मदत करेल असे आश्वासन दिले. त्याचबरोबर दहशतवाद्यांशी लढताना विकसित होणारे सर्व तंत्रज्ञान भारताला पुरवण्यात येईल असेही स्पष्ट केले. ओलांदे यांनी भारतामध्ये वाहतूक, पायाभूत सोयी, जलवाहतूक, कृषी उत्पादन या क्षेत्रांत गुंतवणूक करण्याची फ्रान्सची इच्छा असल्याचेही सांगितले. अहमदाबाद-मुंबई द्रुतगती रेल्वेमार्ग विकसित करण्यासाठी फ्रान्स तंत्रज्ञान देणार आहे. या तंत्रज्ञानामुळे या मार्गावरील नव्या स्थानकांमध्ये अत्याधुनिक सोयी उपलब्ध होतील, शिवाय या मार्गाला जोडणारे नवे मार्गही यानिमित्ताने सुरू होणार आहेत. भारत-फ्रान्स यांचे संबंध 80 च्या दशकापासून अधिक दृढ होत चालले आहेत. ओलांदे यांनी हा विश्वास आपल्या भेटीतून अधोरेखित केला आहे. संपूर्ण युरोपीय संघाशी व्यापक संबंध स्थापन करायचे भारताचे धोरण असले तरी तो मार्ग ग्रेट ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या युरोपमधील तीन सर्वात शक्तिशाली देशांमधून जातो, या दृष्टीने फ्रान्सला ओलांदे यांची भारतभेट महत्त्वपूर्ण आहे,
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply