मराठवाडा ही साधुसंतांची भूमी आहे. क्रांतिकारकांच्या योगदानाविषयी लिहिताना जागतिक कीर्तीचे अनेक विचारवंत आठवतात. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, बाजीराव पेशवे, नाना फडणीस, कान्होजी आंग्रे, धोंडो केशव कर्वे, पां. बा. काणे, गो. कृ. गोखले किती थोरामोठ्यांनी कोकणात जन्म घेतलाय म्हणून सांगावे?
स्वातंत्र्यसंग्राम जगाच्या पाठीवर अनेक देशात झाल्याचा इतिहास आहे. इस्राएलचा संघर्ष आठशे वर्ष चालला. फ्रेंच क्रांती आणि रशियन क्रांती जाणकारांना ठाऊक आहेच. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी 1857 सालापासून 1947 सालापर्यंतचा इतिहास पाहिला तर सुमारे 90 वर्षे हे समर सुरू होते. देशाच्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात क्रांतिकारक होते. प्रस्तुत लेखात महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचा आढावा घेताना केवळ कोकण प्रांताचा विचार केला तरी एक भलामोठा ग्रंथ होईल. इतके स्त्री-पुरुष इथं क्रांतिकारक झाल्याचा इतिहास आहे.
मराठवाडा ही साधुसंतांची भूमी आहे. कोकण ही प्रतिभावंतांची सोनेरी खाण आहे. तेथील प्रज्ञावंत, समाजसेवक आणि कलावंतांची यादी फार मोठी आहे. क्रांतिकारकांच्या योगदानाविषयी लिहिताना जागतिक कीर्तीचे अनेक विचारवंत आठवतात.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, बाजीराव पेशवे, नाना फडणीस, कान्होजी आंग्रे, धोंडो केशव कर्वे, पां. बा. काणे, गो. कृ. गोखले किती थोरामोठ्यांनी कोकणात जन्म घेतलाय म्हणून सांगावे?
आद्य क्रांतिकारक फडके हे मूळचे केळशी, रत्नागिरीचे. मात्र शिरढोण, रायगड गावी त्यांचे कुटुंब रहायला आले. त्यांंचा जन्म झाला 4 नोव्हेंबर 1845 रोजी. पुढे त्यांचे शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या ठिकाणी झाले. पाचवीनंतर त्यांनी शिक्षण सोडले. ते नोकरीस लागले. नंतर रेल्वे खात्यात आणि ग्रँट मेडिकल कॉलेजात काही काळ नोकरी केली. 1863 मध्ये लष्कराच्या अर्थ खात्यात नोकरीस लागले. 1865 मध्ये त्यांची पुण्यात बदली झाली.
17 एप्रिल 1879 रोजी त्यांनी श्री शैलमच्या मल्लिकार्जुनास आत्मसमर्पण करून आत्मचरित्र लिहायला सुरुवात केली. त्यांनी प्रथमच सशस्त्र क्रांतीचा नारा दिला. ’लढाऊ राष्ट्रवादाचे जनक’ असे त्यांना म्हटले जाऊ लागले. पुण्याजवळील लोणीकंद या ठिकाणी आपले क्रांतिकार्याचे कार्यालय सुरू केले. मध्यम वर्गानं त्यांच्या कार्यात भाग घेतला नाही. तळागाळातील लोकांनी साथ दिली. नऊशे सैनिक जमले. इंग्रज अधिकाऱ्यांचे खून करणे, जनजागृती करणे, पगार देणे… वगैरे करताना पैसा हवा होता.
भारतीय इतिहासाला लागलेला रोग म्हणजे फितुरी
मेजर डॅनिएलला फडक्यांची कागदपत्रं सापडली. त्यांचे सर्व बेत कळले. विजापूरमधील देवर-नावडगी या गावी एक बौद्ध मंदिरात फडके प्रचंड थकून झोपले होते. 21 जुलै 1879 रोजी त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत काही सैनिक होते, त्यांनाही पकडले. काळ्यापाण्याची शिक्षा फर्मावण्यात येऊन एडनच्या तुरुंगात 1880 मध्ये टाकण्यात आले. तिथे त्यांचा क्षयरोगाने अंत झाला. हे चरित्र पुष्कळ मोठे आहे. ते वाचण्याची प्रेरणा मिळावी म्हणून ही झलक. अशी अनेक मान्यवर क्रांतिवीर मंडळी झाली. त्यांच्यात चापेकर बंधूंची कहाणी चित्तथरारक आहे. वासुदेव बळवंत चापेकरांचा जन्म 1880 मध्ये झाला. त्यांचे बंधू दामोदर आणि बाळकृष्ण यांनी तरुणांना शस्त्र शिक्षण दिले. इंग्रज अधिकारी रॅण्ड क्रूर होता. चापेकर बंधूंचे वडील हरिपंत हे कीर्तनकार म्हणून मुंबई, ठाणे, पुणे येथे जात असत. तिथे भाऊ त्यांना साथ करत. ‘केसरी’मध्ये टिळकांचे स्फूर्तिप्रद लेख येत. ते वाचून ते क्रांतिकारक झाले. त्यावेळी प्लेगच्या साथीत अनेक जण मरण पावले. रोगावर नियंत्रण करण्यासाठी रॉल्टर चार्ल्स रॅण्ड आला. त्याने केलेले अत्याचार भयानक होते. इथून संघर्षाला सुरुवात केली. त्यांनी सूड घेण्यासाठी 22 जून 1897 रोजी रॅण्डवर गोळ्या झाडल्या. 3 जुलैला तो मेला.
18 एप्रिल 1898 रोजी दामोदरला फाशी झाली. 8 मे रोजी वासुदेवाला आणि 16 मे रोजी फाशी… तिन्ही बंधू शहीद झाले.
लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, नामदार गो. कृ. गोखले, दापोलीचे महर्षी धोंडो केशव कर्वे, रँग्लर परांजपे, पां. बा. काणे, टिळक, आंबेडकर असे सुमारे छत्तीस सुपुत्र कोकणचे होते. त्यापैकी काही नावे आहेत ः भार्गवराम फाटक, पुरुषोत्तम मराठे, केशव शेडगे, सी. एच. गायकवाड, मानाजी जाधव, चंद्रकांत मेहता, शिवराम गोंधळेकर, भगतसिंह फाटक, रावजी केळकर, रतनलाल भंडारी, श्रीधर केळकर… अशी ही नामवंत मंडळी असली, तरी ज्यांची नोंद नाही, अशी क्रांतिकारक मंडळी हजारोंनी असतील, यात शंका नाही.
भटजी पहलवान हे नाव ठाऊक आहे?
सेनापती बापट, डॉ. खानखोजे आणि डॉ. मुंजे या प्रसिद्ध थोर लोकांना क्रांतिकार्याची दीक्षा देणारे भटजी पहलवान अर्थात भिडे गुरुजी हे 7 डिसेंबर 1948 रोजी देवाघरी गेले. गुरुजी मूळचे निर्बोडी गावचे. त्यांचा जन्म 22 जुलै 1876 या दिवशी झाला. पुण्याला त्यांना फार शिकता नाही आले. मात्र दांडपट्टा, मल्लखांब, नेमबाजी इत्यादी खेळांची आवड होती. कुस्ती, घोडेस्वाररी, व्यायाम हे त्यांचे छंद.
पुण्यात आल्यावर चापेकरांशी ओळख झाली
अण्णासाहेब पटवर्धनांनी त्यांना गुरूदीक्षा दिल्यावर म्हटले, ‘कधीही, कोणतेही पुरावे मागे ठेवू नयेत. कमी बोलावे.’ गुरुजींनी गावोगावी जाऊन क्रांतिकारकांशी संपर्क साधला. शस्त्रे पुरविली, मुसलमान क्रांतिवीरांनी त्यांना ‘भटजी पहलवान’ ही पदवी दिली. ठिकठिकाणी नोकऱ्या केल्या. योगी अरविंदांना क्रांतिकार्य कसे करावे हे शिकवले. 7 डिसेंबर 1948 रोजी त्यांना देवाज्ञा झाली.
पालघर परिसरातही असंख्य क्रांतिकारक झाले
सावंत मास्तर, सखाराम पाटील, छोटालाल श्रॉफ, बाबासाहेब दांडेकर, धर्मा तांडेल, बाबुराव जानू, रंगनाथ परुळेकर, भोगीलाल शहा, हरीभाऊ राऊत, रघुवीर शिंदे, रंगनाथ वर्दे, मुकुंद संखे… पुष्कळ. 1918 मध्ये लोकमान्य टिळकांनी ठाणे दौरा केला. पालघरला सभा झाली. त्यावेळी ठाणे जिल्ह्यातील देशभक्त आले होते. त्या काळात तीन हजार 600 रुपयांचा निधी जमला. 1928 मध्ये सरदार पटेल आले होते. 14 ऑगस्ट 1942 या दिवशी ‘चले जाव’ आंदोलन वाढले. तेव्हा क्रूरपणे लाठीमार करून अनेकांना ठार केले, हा ब्रिटिशांचा रानटीपणा पाहून चळवळीला जोर चढला. 26 ऑक्टोबरला पालघर-बोईसर रेल्वे अडवण्यात यश मिळाले. पाच जण हुतात्मे झाले. पाच बत्ती चौक त्यांच्या नावे आजही ओळखला जातो.
अनंत कान्हेरे हे मूळचे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आयनी मेटे या गावचे. शिक्षणासाठी त्यांना औरंगाबादला जावे लागले. नाशिकचा क्रूर न्यायाधीश जॅक्सन! त्याला ठार मारण्यास 19 एप्रिल 1910 या दिवशी अनंता नाशिकला गेला आणि आधीच्या अभ्यासाप्रमाणे त्याने जॅक्सनवर चार गोळ्या झाडल्या म्हणून त्याला आणि कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे यांना ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले. अनंता हा कोकणचा सुपुत्र एकोणीसाव्या वर्षी शहीद झाला.
महात्मा गांधींच्या आदेशानुसार देशभर वैयक्तिक सत्याग्रहाची जी लाट उसळली त्यात बोर्डीचे हिराकांत पाटील यांचेही टाइम बॉम्बने आग लावणे, रेल्वे रूळ उखडणे असे अनेक क्रांतिकारी उपक्रम ही मंडळी करीत असत.
रायगडमधील कर्जतचे क्रांतिकारक विठ्ठल लक्ष्मण कोतवाल ऊर्फ भाई कोतवाल! माथेरानला 1 डिसेंबर 1912 रोजी जन्म झाला. शिक्षण घेत असताना एक दिवस ते अचानक बेपत्ता झाले. मॅट्रिकला असताना क्रांतिकारकांच्या कथा ऐकून ते वेडे झाले. पुण्यात कॉलेज शिक्षण घेताना ते गायब झाले. मुंबईत आले. मुंबईचा इंग्रज अधिकारी गव्हर्नर भयानक अत्याचार करत होता. त्याला मारायला भाईंनी पिस्तुल मिळवले. इंग्रजांनी उभारलेले विजेचे खांब कसे पाडयचे याची माहिती मिळवली आणि त्यांनी साथीदारांसह खांब पाडायला सुरुवात केली!
त्यांचा मुक्काम होता सिद्धगडाच्या गढीत. पोलिसांना बातमी समजली. सुगावा लागला. सशस्त्र पोलीस गढी चढून वर आले. गोळीबार सुरू केला. मांडीवर भाईंना गोळी लागली. दुसरी गोळी डोक्यातून गेली. भाई हुतात्मा झाले.
क्रांतिकारक मृत्युमुखी पडले खरे, पण अशा सशस्त्र क्रांतीमुळेदेखील स्वातंत्र्य मिळाले!
–अरविंद दोडे
(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply