आपले गुरू , देव आई वडीलांनंतर आपल्याला जास्त जर कोण ओळखत असेल तर तो असतो मित्र! हे नातंच वेगळं असतं. इतर नाती रक्ताची असतात पण हे नातं रक्ताचं नसूनही आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. आपलं गुपित ह्यांच्यापेक्षा इतर कोणालाही ठाऊक नसतं. आपण कसे आहोत हे ह्या माणसापेक्षा इतर कोणालाच ठाऊक नसतात. आपण केलेल्या चूका ह्या कशा पद्धतीने चूका नव्हत्या आणि आपण त्या ठिकाणी कसे बरोबर होतो हे त्याच्यापेक्षा कोणीही बरोबर पटवून देऊ शकत नाही. ह्या नात्यात एक बरं असतं , ना जातीची काळजी , ना धर्माची , ना गरीबीची ना श्रीमंतीची. भाऊबंदकीतले जरी नसले तरी भावासारखे किंबहुना त्याच्यापेक्षा वरती जर कोणी असेल तर ते फक्त मित्रच! हे खऱ्या अर्थाने आपले crime partners असतात. वेळेला आपल्या पाठी उभे राहून , ” भावा तू फक्त बोल , आईशपथ एकेकाला बघतो ” असा जाहीर पाठींबा देणारी ही एकच जात.
असं म्हटलं जातं की , मित्र हा भगवान श्रीकृष्ण ह्यांच्यासारखा किंवा कुंतीपुत्र कर्णासारखा असावा कारण , भगवंतांसारखा मित्र आपण जर चुकीच्या मार्गाने जात असू तर कान पकडून सरळ मार्गावर आणणारा असतो तर कर्णासारखा मित्र आपला मित्र चुकीचा आहे हे माहित असूनही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहाणारा.
सगळ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात पहिला मित्र असतो ‘ आई ‘ तर मुलीचा ‘ बाप ‘ . पुढे स्वतःच्या स्वभावाला पटणारी व्यक्ती आपला मित्र बनतो.
मैत्रीत श्रीमंती आणि गरीबी हा भेदभाव कधीच दिसत नाही. श्रीमंत मित्र सोबत वावरतांना,
गरीब मित्र दुर्लक्षित होत नाही आणि गरीब मित्र सोबत वावरतांना,
श्रीमंतीचा आवाज येत नाही आणि हाच मैत्रीचा धर्म असतो.
आज दिनांक २ ऑगस्ट आणि ह्या महिन्यातील पहिला रविवार. भारतात पहिला रविवार हा मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. परदेशात हा दिवस ३१ जुलै रोजी साजरा केला जातो.
सरतेशेवटी खरा मित्र तोच जो मैत्रीच्या काट्याकुट्याच्या मार्गाला जाणतो व मैत्रीतील त्याग जाणतो.
– आदित्य दि. संभूस.
Leave a Reply