नवीन लेखन...

शेअर मार्केटशी मैत्री

अनेकदा कंपन्या भांडवल वाढीसाठी पब्लिक ऑफर न आणता कंपनीच्या भागधारकानाच नवीन समभाग अग्रहक्काने विकतात. बहुतेकदा अशा वेळी ऑफर करण्यात आलेले शेअर प्रचलित बाजारभावापेक्षा कमी असतात. त्यामुळे भागधारक ही ऑफर स्वीकारतात व कंपनीची भांडवल उभारणी होते.

शेअर मार्केट हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्यांनी त्यातून पैसा मिळवलाय व यशस्वीपणे त्या मार्केट मध्ये रमताहेत ते त्तर अनेकांच्या कौतुकास पात्र होतात. त्याच प्रमाणे शेअर मार्केट मधून कोणी कसा पैसा मिळवला कोण श्रीमंत झाले तसाच पैसा आपण मिळवावा असे अनेक लोकांना वाटत असते.कोणीतरी शेअर मार्केट मधून पैसा मिळवून घर घेतलं, गाडी घेतली, असे कानावर येते त्याचबरोबर शेअर मार्केट मध्ये बुडालेले कंगाल झालेले सर्व गमावून बसलेले लोक पण दिसतात. शेअर मार्केट मधील झालेल्या तोट्यामुळे घरदार विकाव लागलं असं पण ऐकू येत.

या जगात पैसा सहज मिळत नसतो. त्यासाठी कष्ट, मेहनत, परिश्रम घ्यावेच लागतात शेअर मार्केट हा काही जुगार नव्हे तर तो एक अभ्यासाचा विषय आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. आर्थिक गुंतवणूक ही एक कला आहे व ती आत्मसात करण्यासाठी सखोल अभ्यास व अनुभव लागेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक का करावी याचं उत्तर आहे की, महागाई ज्या प्रमाणात वाढतेय म्हणजेच महागाई वाढतेय त्यामुळे बँका, कर्जरोखे, पोस्टल डिपॉजिट यामधून मिळणारा परतावा हा चलनवाढीचा मुकाबला करू शकत नाही. महागाई वाढीचा मुकाबला करण्यासाठी शेअर गुंतवणुकीतून मिळणारा फायदा हाच एकमेव पर्याय आहे, गेल्या अनेक दशकांपासून शेअरबाजारातील गुंतवणूक ही सर्वात वेगाने वाढ देणारी गुंतवणूक आहे, मात्र शेअर गुंतवणुकीत धोके पण तेवढेच आहेत. त्यासाठी अभ्यासाची जरूर आहे नाहीतर आपण नफा कमावणे सोडाच आपले भांडवल देखील गमावून बसू. पण मी गेली 25 वर्षे नियमित पणे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगतो की व्यवस्थित अभ्यास करून काळजी पूर्वक शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केली, योग्य संयम पाळला, व आपल्या लोभावर नियंत्रण ठेवले तर अगदी सामान्य माणूस बँक किंवा पोस्टल ठेवीवर मिळणाऱ्या  व्याजापेक्षा निश्चित ज्यास्त पैसे शेअर मार्केट मधून मिळवू शकतो.

आपला मराठी माणूस शक्यतो शेअर मार्केट मध्ये रमत नाही. पण आज गुंतवणुकीला खूप अनुकूल वातावरण आहे. अनेक टीव्ही चैनल आहेत, मार्गदर्शक आहेत त्यामुळे न घाबरता ज्यास्तीत ज्यास्त मराठी माणसांनी यात पडावं असं माझं मत आहे. शेअर मार्केट लोकांना आता नवीन नाही या बाबतीत माहिती इन्टरनेट, या विषयावरील पुस्तके यातून पण मिळू शकते.

त्याच प्रमाणे सुरवातीला निवडक Mutual Fund मध्ये पैसा गुंतवून शेअर मार्केटचा लाभ मिळू शकतो. यासाठी पण स्वतः थोडा अभ्यास करावा किंवा तज्ञांचे मार्गदर्शन/सल्ला घ्यावा. दीर्घ कालीन Mutual Fund SIP चांगला लाभ मिळवून देतात.

माझ्या अनुभवातून काही गोष्टी शिकलो त्यामुळेच हा विषय सोप्या मराठी भाषेत मांडण्याचा हा माझा एक प्रयत्न करतोय…

शेअर समभाग म्हणजे काय

प्रथम आपण शेअर म्हणजे काय ते समजून घेऊ. मराठीत आपण शेअरला समभाग म्हणतो. समभाग म्हणजे समान भाग, कुठलाही व्यवसाय सुरू करताना भांडवल लागतेच, साधारण पणे मोठे उद्योग उभारताना मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असते, भांडवलाची समान भागात विभागणी म्हणजेच समभाग. प्रत्येक समभागाची किंमत समान असते म्हणजेच इक्वल त्यामुळे इंग्रजीत इक्विटी शेअर असा शब्द प्रचलित आहे.

समभागाचे दर्शनी मूल्य : आपण यापूर्वी पाहिले की भांडवलाची समान भागात विभागणी म्हणजेच समभाग.म्हणजे उदारणार्थ भांडवल 1 कोटी रुपये भांडवलाचे आपण 10 लाख समान भाग केले तर एका भागाची किंमत 10 रुपये येईल. म्हणजे शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये. याप्रमाणे प्रत्येक कंपनी आपल्या समभागांचे दर्शनी मूल्य ठरवत असते. आपल्याला समभागावर मिळणारा लाभांश हा दर्शनी मूल्यावर मिळत असतो. आज शेअरचे दर्शनी मूल्य साधारणपणे 10 रुपये 5 रुपये 2 रुपये व 1 रुपया अशी आहेत. आज रिलायन्स च्या समभागाचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. तर इम्फोसीस, ल्युपिन यांच्या समभागाचे दर्शनी मूल्य 5 रुपये आहे. एल एंड टीचे दर्शनी मूल्य 2 रुपये तर टीसीएसचे 1 रुपया. मात्र या समभागांची बाजारातील किमत दर्शनी मूल्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. शेअर खरेदी करताना त्याचे दर्शनी मूल्य माहित असणे जरुरी आहे, आजकाल शेअरचे विभाजन करण्याची प्रथा अनेक कंपन्या करतात. उदारणार्थ युनायटेड ब्रुवरिस या कंपनीने 10 रुपयाच्या शेअरचे दर्शनी मूल्य आता 2 रुपये केले आहे. त्यामुळे जर एखाद्याकडे युनायटेड ब्रुवरिस चे 10 रुपयाचे 50 शेअर असतील तर कंपनीने आता दर्शनी मूल्य 2 रुपये केल्याने त्याच्याकडे आता युनायटेड ब्रुवरिस चे 2 रुपये मूल्याचे 250 शेअर्स होतील. शेअरची संख्या वाढेल पण मूल्य रुपये 500 एवढीच राहील. शेअरचे दर्शनी मूल्य कमी झाल्याने कंपनीचा बाजारभाव पण त्या प्रमाणात कमी होइल.

हक्क समभाग किंवा राईट शेअर : अनेकदा कंपन्या भांडवल वाढीसाठी पब्लिक ऑफर न आणता कंपनीच्या भागधारकानाच नवीन समभाग अग्रहक्काने विकतात. बहुतेकदा अशा वेळी ऑफर करण्यात आलेले शेअर प्रचलित बाजारभावापेक्षा कमी असतात. त्यामुळे भागधारक ही ऑफर स्वीकारतात व कंपनीची भांडवल उभारणी होते.

बक्षीस किंवा बोनस शेअर : काही कंपन्या त्यांच्या नफ्याचे वाटप त्यांच्या भागधारकांना बोनस शेअर देऊन करतात. समजा कंपनीने 1;1 असा बोनस शेअर रेशो ठरवला तर एका शेअर वर एक बोनस मिळून असणारे शेअर /समभाग दुप्पट होतात. रिलायन्स, आय टी सी, लार्सेन अंड टुब्रो, इन्फोसिस इत्यादी कंपन्या वेळो वेळी बोनस देत असतात त्यामुळे या कंपन्याचा शेअर्सना बाजारात खूप मागणी असते.

शेअर्सची खरेदी विक्री

  1. प्रायमरी मार्केट : प्रचलित कंपनी किंवा अगदी नवीनच निर्माण झालेली कंपनी जेव्हा भांडवल उभारणी करण्यसाठी लोकांना आपले समभाग ऑफर करते यालाच पब्लिक शेअर इश्यू से म्हणतात. कंपनी जेव्हा पहिल्यांदा लोकांना शेअर ऑफर करते तेव्हा त्याला आय पी ओ (initial public ऑफर) असे म्हणतात. कंपनी हे समभाग दर्शनी मूल्याला किंवा premium घेऊन विक्रीस काढले जातात. म्हणजे 10 रुपये मूल्याचा समभाग जेव्हा 50 रुपया किमतीने विक्रीस काढला जातो तेव्हा हा शेअर 40 रुपये प्रीमियम घेऊन लोकांना घ्यावा लागतो. या आयपीओसाठी तज्ज्ञ लोक मार्गदर्शन करायला असतात. शेअरची वाटणी झाल्यावर त्याची शेअर बाजारात नोंदणी होते. जर समभागाची नोंदणी ऑफर केलेल्या भावापेक्षा ज्यास्त झाल्यास आपणाला लगेच ते विकून अल्पावधीत चांगला नफा कमावता येतो. यालाच लिस्टिंग गेन असा शब्द प्रचलित आहे. प्रायमरी मार्केट मध्ये शेअर घेण्याचे फायदा म्हणजे चांगल्या कंपन्यांचे शेअर रास्त भावात मिळू शकतात व तोटा होण्याची शक्यता कमी असते. शेअर बाजारात बरेचदा अशा शेअर्सची नोदणी चढ्या भावाने होते व अल्पावधीत फायदा (लिस्टिंग गेन) कमावता येतो. मात्र चांगल्या कंपन्याच्या समभागांना खूप मागणी असते त्यामुळे समभाग मिळतीलच याची खात्री नसते. त्याच प्रमाणे मार्केटच्या त्तेजीचा लाभ उठवण्यासाठी अनेक बनावट कंपन्या भरपूर प्रीमियम घेऊन शेअर विक्री करतात परिणामतः लोकांचे पैसे बुडतात कारण अशा समभागांना मागणी नसते व मार्केट मध्ये कमी भावात नोंद होते.

सेकंडरी मार्केट : ज्या कंपन्यांचे समभाग हे शेअर बाजारात नोंदले जातात अशा शेअर्सची खरेदी विक्री शेअर बाजारात नियमित पणे होत असते. आपण शेअर बाजारातून या शेअर्स ची खरेदी विक्री करू शकतो.शेअर बाजारातून हे शेअर आपण विकत घेऊ शकतो व भाव वाढल्यावर विकू पण शकतो. यात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खरेदी, अल्पकाळासाठी खरेदी, शेअर ट्रेडिंग, फ्युचर/ ऑप्शन असे अनेक गुंतवणुकीचे प्रकार असतात. मात्र इथे शेअर चे भाव खूप वाढलेले असतात तसेच मागणी पुरवठा या तत्व नुसार त्यात सतत वाढ घट होत असते .

आता एखाद्याला शेअर गुंतवणूक सुरु करायची असेल तर त्याला काय पूर्व तयारी करावी लागेल ते पाहू.

  1. Demat Account : आता शेअर इलेक्टोनिक फौर्म मध्ये म्हणजेच डीमटेरिल स्वरुपात खरेदी किंवा विक्रीला उपलब्ध असतात. त्यामुळे NSDL किंवा CDSL सलंग्न डीपौझीटरी मध्ये आपले Demat खाते काढावे लागेल, आज सर्व राष्ट्रीयाकुत बँका, खाजागी बँका, वित्तीय संस्था, ब्रोकिंग कंपन्या या सर्वांकडे ऊशारीं खाते काढता येते. त्यामुळे आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा ते इलेक्ट्रोनिक फॉर्ममध्ये आपल्या ऊशारीं खात्यात जमा होतात. व शेअर विकतो तेव्हा आपल्या खात्यातून वजा होतात. जसे आपल्याकडे किती पैसे आहेत हे आपल्या बँक पासबुकावरून समजते, तसेच कोणत्या कंपन्यांचे किती शेअर आपल्याकडे जमा आहेत हे आपल्याला ऊशारीं खाते दाखवते.
  2. ट्रेडिंग खाते : शेअर्सचे खरेदी विक्री साठी ट्रेडिंग खाते पण असणे आवश्यक आहे.भारतात अनेक ब्रोकिंग कंपन्या आहेत. त्यांच्या मार्फत आपण शेअरची खरेदी विक्री करू शकतो, ट्रेडिंग अकौंट साठी झअछ कार्ड आवश्यक आहे. कारण शेअर वर होणारा नफ्यावर आपणाला सरकारला कर द्यावा लागतो. म्हणून शेअरचे व्यवहार ट्रेडिंग खात्यामार्फत केले जातात.
  3. बँक खाते : बहुतेक सर्वांचे बँक खाते असतेच आपण ते आपल्या ट्रेडिंग अकौंटला/ डीमैट अकौंटला लिंक करू शकतो म्हणजे आपल्या शेअर्स वर जेव्हा कंपनी dividand जाहीर करते तेव्हा ते आपल्या बँक खात्यात जमा होतात, तसेच जेव्हा शेअर्स विकतो तेव्हा त्याचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतात.आपणाला शेअर विकत घ्यायचे असतात तेव्हा या खात्यातून आपण ब्रोकरला पैसे देऊ शकतो.

आज अनेक बँका, वित्तीय संस्था ही तीनही खाती एकत्र देतात. त्याला थ्री इन वन account म्हणतात. यावर आपण स्वतः शेअर ची खरेदी विक्री करू शकतो. हे account उघडण्यासाठी खालील कागदपत्र लागतात-

(KYC documents)

– फोटोग्राफ

-Identity Proof Address Proof – आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायविंग लायसेन्स ईत्यादि

-Pan Card

-इतर कागदपत्र गरजेनुसार

थ्री इन वन खाती माझ्या माहितीनुसार खालील ठिकाणी उपलब्ध आहेत.या व्यतिरिक्त ठिकाणी पण असतील. खाती उघडताना मिळणारी सेवा, द्यावे लागणारे चार्जेस व इतर बाबींचा नीट अभ्यास करून ज्याला जिथे सोयीचे वाटेल तिथे त्याने खाते उघडावे. थ्री इन वन उघडायचे नसेल तर तीन वेगळ्या ठिकाणी वशारीं, trading व बँक account उघडू शकता, मात्र ही तीनही खाती शेअर खरेदी विक्रीसाठी आवश्यक आहेत.

* ICICI Bank – ICICI Direct

* IDBI Bank – IDBI Capital Market

* HDFC Bank – HDFC Securities

* State Bank of India – SBI Capital

* Kotak Mahindra Bank – Kotak Securities

* Axis Bank

* Angel Broking

* Motilalal Oswal

* India Bull Finance

* Sherekhan

* Wisdom Capital

ह्या गोष्टी लक्षात असुद्या…

शेअर गुंतवणूक सोपी नाहीये. यासाठी अनुभवी मान्यवरांनी, तज्ञांनी केलेले मार्गदर्शन आपल्या माहितीसाठी दिले आहे…

-टिप्स वर शेअर खरेदी करू नका. बाजारात अनेक वाईट प्रवृत्तीचे लोकं असतात. त्यामुळे अनेकदा स्वतःच्या स्वार्थासाठी ते चुकीचे शेअर सांगतात. त्यामुळे अशावेळी स्वतः अभ्यास करून गुंतवणूक निर्णय घ्यावा किंवा योग्य मार्गदर्शक निवडावा. त्यामुळे आपली गुंतवणूक फसणार नाही.

-आपण ज्या कंपनीचे शेअर खरेदी करणार आहोत त्या कंपनीची पूर्ण माहिती मिळवा. म्हणजे कंपनी कोणत्या क्षेत्रात आहे, प्रमोटर कोण, आर्थिक स्थिती, इत्यादी.

-शेअर खरेदी किंवा विक्री याची वेळ महत्वाची आहे, शेअरचा भाव वरती जाणे खाली येणे हे चक्र चालू असते. प्रत्येक शेअरचा कमाल किमान भाव समजू शकतो (high Low) आपली शेअर खरेदी त्या शेअरचा भाव किमान पातळीवर असताना करावी आणि विक्री भाव कमाल पातळीवर गेल्यावर करावी. अर्थात मार्केट time करणे सोपे नाही.

-सर्व खरेदी एकाच वेळी करू नका. टप्या टप्प्याने गुंतवणूक करा. त्यामुळे मार्केटच्या चढ उताराचे तोटे कमी होऊन आपल्या खरेदीची सरासरी किंमत कमी राहील.

-शेअर खरेदी करतना आपणाला किती नफा अपेक्षित आहे ते ठरवून विक्रीचा भाव ठरवून ठेवा, आणि तो भाव येताच शेअर विका.

-एकाच कंपनीत सर्व पैसे गुंतवू नका. आपली गुंतवणूक निवडक 8-10 शेअर्स मध्ये करा. त्याने जोखीम विभागली जाईल. कारण काही कारणाने 1-2 कंपन्यांच्या भावात घट झाली तरी बाकीच्या कंपन्या तो तोटा भरून काढतील. यालाच Risk diversion म्हणतात.

-लक्षात असुद्या की शेअर गुंतवणूक नफा मिळवण्यासाठी आहे. त्यामुळे योग्य नफा मिळत असेल तर शेअर विका. अति लोभ टाळा. जर आपला गुंतवणूक निर्णय चुकला असेल असे वाटले तर प्रसंगी थोडा तोटा सहन करून शेअर विका. भावनेच्या आहारी जाणे टाळले पाहिजे.

-शेअर गुंतवणूक ही दीर्घकालीन असुद्या. योग्य अशा शेअर मध्ये केलेली दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरते. कंपन्या कारण चांगल्या कंपन्या बोनस शेअर्स देतात त्याने आपली गुंतवणूक वाढत जाते. शिवाय दरवर्षी नियमित dividand मिळत असतो. अशा कंपन्यांना मागणी खूप असते त्यामुळे त्यांचे भाव पण वाढत असतात.

-आपणाकडे असणारे गुंतवणूक योग्य असे पैसेच शेअर्स मध्ये invest करा. कर्ज काढून कधीही शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका, शेअर खरेदी करताना रिस्क – रिवार्ड बघा. नेहेमी रिस्क कमी व मिळणारा फायदा ज्यास्त असला तरच रिस्क रिवार्ड योग्य समजावे.

-आपण शेअर गुंतवणूक केल्यावर आपल्या वेळोवेळी आपल्या गुंतवणुकीचा आढावा घ्या आणि त्यानुसार निर्णय घ्या.

नव्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी शक्यतो सेन्सेक्स निफ्टी मधील निवडक शेअर पासून सुरवात करावी. हे शेअर जरी महाग वाटले तरी आपली गुंतवणूक सुरक्षित राहील. जर काही कारणामुळे भाव खाली आले तरी त्यात सुधारणा पण लवकर होईल. या बाबतीत तज्ञांचा सल्ला घ्यावा.

–विलास गोरे

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..