नवीन लेखन...

फुजिझुका (प्रति-फुजी)

जपानचा पवित्र पर्वत कोणता ? असं विचारलं तर पटकन कोणीही (ह्या देशाबद्दल थोडीफार माहिती असणारे) फारसा विचार न करता अंदाजाने सुद्धा सांगू शकतील माउंट फुजी! गिर्यारोहकांचे, ट्रेकर्सचे जपान मधले एव्हरेस्ट!

जपान अशी डोळ्यासमोर इमेज आणायची ठरवलं की पर्वताची त्रिकोणी आखीव महिरप आणि त्यावर बर्फाची सुंदर पांढरी टोपी समोर येतेच! हाच तो भव्य आणि अतिशय देखणा, शब्दात वर्णन करता येणार नाही इतका खास आणि सुंदर ‘फुजीसान!’

जपान्यांना बऱ्याच ठिकाणी आदर दर्शवण्यासाठी ‘सान’ असे संबोधन जोडायला आवडते. पण इथे मात्र सान चा अर्थ पर्वत!

फुजीसान हा धगधगता जिवंत ज्वालामुखी पोटात घेतलेला पर्वत आहे ह्यावर विश्वास बसणे कठीण व्हावे असे सौंदर्य आणि रूप आहे त्याचे. तीन पवित्र पर्वतीय तीर्थ क्षेत्रातला ( Sanreizan- One of the three Holi Mountains) मधला एक असणारा फुजीसान, ३७७६.२४ मी उंचीचा जपानचा सर्वात मोठा पर्वत असे बिरूद मिरवतो.

प्रदूषणाचे प्रमाण अतिशय कमी असणार्‍या ह्या देशात हवा क्लिअर असल्याने, पुण्याच्या पर्वती सारखा (पूर्वी पर्वती साधारणपणे सगळ्या घरांमधून दिसायची असे ऐकले आहे) फुजीसान त्याच्या आजूबाजूच्या अनेक Prefecture मधून  निरनिराळ्या ठिकाणाहून भेटत राहतो.

दुरून त्याची बर्फाची त्रिकोणी टोपी अगदी चटकन नजरेस भरली आणि फुजीसान स्पष्ट दिसला तर हवामान उत्तम असा संदेश मिळतो. आणि हमखास त्या दिवशी आपल्याला आज वेदर कित्ती छान आहे ना? असे का कोण जाणे समाधान वाटत राहते. (जपान मध्ये क्लीअर वेदर असणे म्हणजे सुख! असं एकंदर गणित आहे) आणि हवा पाण्याच्या गप्पा मारण्यासाठी छान विषय मिळून जातो.

फुजी ह्या नावाच्या अर्थामध्ये संपत्ती आणि मुबलकता दडलेली आहे.  शिन्तो धर्मात ह्या पर्वताला देवाचा दर्जा दिलेला आहे असे म्हणतात. त्यामुळे तीर्थ यात्रीना फुजी सान हा देवासमान आहे. फुजी पर्वतावर चढणे हे त्यांच्यासाठी तीर्थयात्रा केल्याचे पुण्य देणारे असते.
परंतु प्रत्येकाला ते शक्य होईलच असे नाही. आजारपण,व्याधी, वयोमान अथवा बाकी काही कारणांनी फुजीसान वरती चढुन जाणे शक्य होत नाही असे अनेक नागरिक जपान मध्ये आहेत.

काहींना दररोज फुजीसान वरती फेरफटका मारून यावे आणि मनोमन आपल्या ह्या देवाची उपासना करावी अशी इच्छा होत राहते. बरं इतक्या मोठ्या पर्वतावर रोपवे बांधणे अवघड आणि तेथील क्लायमेटचा विचार करता अशक्य आहे. अशा सर्वांना मग मनात इच्छा असून फुजीसान वरती जाता येत नसेल का? निराश होत असतील ना हे सर्व लोकं ?

डेडिकेशन च्या बाबतीत प्रथम क्रमांकावर असणारे हे जपानी नागरिक, त्यांच्या साठी  ‘एखादी गोष्ट शक्य नाही’ ही अशी शक्यता फार तुरळक आहे. आणि जमणार नसेल तर सरळ नाही असे सांगतात,पोकळ आश्वासने देत नाहीत! (पण नाही म्हणत आहेत, हे कळेपर्यंत समोरच्याला वीट येतो त्याच काय?)  असो मजेचा भाग सोडला तर ह्यासारख्या जपानी माणसाच्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नेगेटिव्ह वाटू शकतात. सगळे काही उत्तम असणारा माणूस ह्या जगात कुठेही सापडणे अवघड आहे. हेच खरे!

असो तर फुजीसान वरती चढण्याचा आनंद आणि पुण्य प्रत्येकाला लाभावं म्हणून तोक्यो व इतरही काही ठिकाणी फुजिझुका म्हणजे प्रति-फुजीसान बांधलेले आहेत. ह्या फुजिझुका म्हणजे प्रति-फुजी  वरती चढणे हे खरोखरच्या फुजी वरती जाऊन आल्याचे पुण्य पदरी घालते असे येथील लोक मानतात.

प्रति-फुजी ची रचना तंतोतंत खऱ्याखुऱ्या फुजी सारखी असते, खऱ्या फुजी वरती चढताना लागणारे थांबे (स्टेशन्स) किंवा टप्पे येथे सुद्धा हुबेहुब बांधलेले आहेत. फुजीची दहा स्टेशनस (टप्पे) व शिखरावर असलेले Fujisan Hongū Sengen Jinja सुद्धा प्रत्येक फुजिझुका वरती बांधलेले असते. फुजिझुका बांधताना खऱ्या फुजी माउंटन वरचे खडक व मोठाले दगड व तिथली माती ह्याचा वापर केलेला आहे.  ह्या फुजिझुका वरच्या सर्वात उंच टप्प्यावरून खऱ्या माउंट फुजी चे दर्शन घडते अशी त्यांची रचना आहे. आजकाल उंच उंच बिल्डींग्स वाढल्याने अनेक फुजिझुका वरून प्रत्यक्ष फुजी पाहण्यात अडथळा निर्माण झाला आहे. परंतु फुजीसान कोणत्या बाजूला आहे ह्याचे निर्देश देणारे बोर्ड लावलेले असतात त्यामुळे जपानी नागरिक त्या दिशेला तोंड करून प्रार्थना करताना दिसतात. जपानी नागरिक सुद्धा आपल्याप्रमाणे दोन हातांचे तळवे एकमेकाला जोडून (नमस्कार मुद्रेत ) प्रार्थना करतात.

प्रति-फुजीसान ची उंची फार नसते आणि सहज कुणालाही चढता येईल अशी रचना केलेली आहे. तोक्यो मध्ये व आसपास जवळपास १०० तरी फुजिझुका आहेत. खरोखरच्या फुजीसान वरती चढणे आणि सर्वच डोळ्यांचे पारणे फेडणारे आणि कष्टाचे चीज झाल्याचे समाधान देणारे असते हे खरे असले तरी  ते सर्व  अनुभव प्रति-फुजी संकल्पनेच्या च्या रूपाने सदैव सोबत घेऊन वावरणे व वारंवार घेणे शक्य झाले आहे.

— © प्रणाली मराठे

Avatar
About प्रणाली भालचंद्र मराठे 17 Articles
मी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..