प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. किरण नाबर यांनी दैनिक लोकसत्ताच्या संपादकांना लिहिलेले पत्र वाचा आणि पुढेही पाठवा….
प्रति,
संपादक,
दैनिक लोकसत्ता.
महाशय,
आपल्या वर्तमानपत्रात गेले कित्येक दिवस यू बी फेअर व नो स्कार मलमाच्या पान-पान भरून जाहिराती येत आहेत. या मलमांमध्ये स्टीरॉइड हे औषध आहे. ही मलमे चेहऱ्यावर लावल्यामुळे मुरमे येणे , त्वचा पातळ बनणे, त्वचा कायमची लाल बनणे, स्त्रियांच्या चेहऱ्यावर केस उगवणे, चेहऱ्याची आग होणे, चेहरा फार हळवा (Sensitive) बनणे,चेहऱ्यावरील रक्तवाहिन्या स्पष्ट बनणे असे अनेक दुष्परिणाम आम्हा त्वचारोगतज्ञांना पहावयास मिळतात.
या जाहिरातींना भुलून सर्वसामान्य तरुण मुले व मुली त्वचेवर तकाकी यावी व त्वचा गोरी व्हावी म्हणून अशी मलमे वापरण्याची दाट शक्यता आहे. या मलमांनी त्वचा तात्पुरती उजळ वाटेल देखील पण एक दोन महिन्यात वर उल्लेख केलेले दुष्परिणाम त्यांना होण्याची दाट शक्यता आहे.
आपणाला अन्न व औषध प्रशासनाने नोटीस पाठवून या मलमांचे दुष्परिणाम असल्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती आपल्या वर्तमानपत्रात करण्यास मनाई केली होती.
एवढे झाल्यानंतर तरी एक सामाजिक बांधीलकी म्हणून आपण अशा मलमांच्या जाहिराती आपल्या वर्तमानपत्रात प्रसिध्द न करणे अपेक्षित होते.
Advertisement Standard Council of India ने देखील या मलमांच्या जाहिराती करू नयेत असा निर्णय दिला होता.
फक्त भरपूर पैसा मिळतो म्हणून अशा प्रकारच्या मलमांच्या जाहिराती आपल्या वर्तमानपत्रात छापणे हे आपल्या सारख्या मराठीतील अग्रेसर वर्तमानपत्राला निश्चितच शोभा देणारे नाही.
आम्हा त्वचारोगतज्ञांच्या अखिल भारतीय संघटनेने जनतेशी बांधिलकी म्हणून स्टीरॉइड मलमांच्या गैरवापराविरुध्द देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही वर्तमानपत्रात स्टीरॉइडच्या दुष्परिणामांवर लेख लिहितो, सर्वसामान्यांसाठी सोशल मिडियावर लेख, पोस्टर व व्हिडिओ उपलब्ध करतो, डॉक्टर्स व केमिस्टसाठी लेक्चर्स देतो व स्टीरॉइड मलमांची तीव्रता, त्यांचे दुष्परिणाम याबद्दल त्यांचे प्रबोधन करतो . तसेच अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना भेटून अशा प्रकारे जनसामान्यांना अपाय होणाऱ्या मलमांवर कारवाई करण्याची मागणी करतो.
पण आपल्या वर्तमानपत्रांसारखी अव्वल वर्तमानपत्रे अशा प्रकारे पैशासाठी समाजाला अपायकारक अशा मलमांच्या पानभर जाहिरातीला आपल्या वर्तमानपत्रात स्थान देऊन आमच्या कामगिरीवर बोळा फिरवितात.
हे आपणाला योग्य वाटते का ? सामान्य नागरिकाला या दुष्परिणामांची कल्पना नसल्याने तो ही मलमे खरेदी करेलही, पण आपल्याला पूर्ण कल्पना असताना देखील आपण अशा प्रकारे जाहिरात प्रसिद्ध करून सामान्य माणसाच्या चेहऱ्याचे आरोग्य धोक्यात घालीत आहात. आपण लवकरच याबद्दल खुलासा करावा व याप्रकारे जाहिरात देऊन सामान्य नागरिकांच्या चेहऱ्याचे आरोग्य वेठीस धरू नये, ही नम्र विनंती.
आपला विश्वासू ,
डॉ. किरण नाबर
त्वचारोगतज्ञ , अलिबाग.
( स्टीरॉइड वापराविरुद्ध अखिल भारतीय त्वचारोगतज्ञ संघटनेच्या मोहिमेचा महाराष्ट्र राज्य समन्वयक )
१६ डिसेंबर २०१५ रोजी पाठविलेल्या पत्राला २० दिवसांनंतरही उत्तर आलेले नाही . सामाजिक बांधिलकीच्या गोष्टी करणाऱ्या अग्रेसर वर्तमानपत्राकडून ही अपेक्षा नव्हती.असो. निदान या जाहिरातीच्या आहारी जाऊन तरुणांनी आपला चेहरा खराब करू नये म्हणून हे पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा .
Leave a Reply