भाषा हा विषय फार मजेदार आहे. एकाच शब्दाचा अर्थ, तीन वेगवेगळ्या भाषेत कसा बदलत जातो ते पहा. त्याचंच एक उदाहरण बघूयात. शब्द आहे ‘जाम’.
मराठी भाषेत आपण सहज बोलून जातो… आज माझं डोकं ‘जाम’ दुखतंय.. असं सांगताना आपण वेदनेची सीमा ओलांडल्याचं, ‘जाम’ हे विशेषण लावून सांगतो..
हिंदी भाषेत तोच ‘जाम’ शब्द, एक ‘मादक पेय’ होऊन जातो.. ‘शाम’ झाल्यावर, काही जणांची ‘जाम’ घेण्याची वेळ होते..
इंग्रजी भाषेत, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची कोंडी होऊन जेव्हा वाहतूक पूर्णपणे ठप्प होते, तेव्हाच्या परिस्थितीला ट्रॅफिक ‘जाम’ झाली.. असं म्हटलं जातं.
मराठी भाषेतून ‘जाम’ हा शब्द आपल्याला विविध रूपांत भेटतो.. या शब्दाच्या आधी ‘गुलाब’ हा शब्द जोडला तर ‘गुलाबजाम’ म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटते.. त्यातूनही ते चितळे बंधूंचे असतील तर विचारुच नका.. सुके असो वा पाकातले, ‘गुलाबजाम’ सर्वांनाच ‘जाम’ आवडतात..
सकाळच्या वेळी ब्रेकफास्टला लहान मुलांना ब्रेडच्या स्लाईसवर ‘जाम’ लावून दिला की, ते आवडीने खातात व ‘जाम’ खुश होतात..
पूर्वी एखाद्या कारखान्यातील कामगारांनी संप केला म्हणजे त्याला चक्का’जाम’ असं म्हटलं जायचं..
सणासुदीच्या दिवसांत मंडईत, लोकांची खरेदीसाठी ‘जाम’ गर्दी उसळते..
पावसात भिजून आल्यावर, डोक्यात पाणी मुरल्याने सटासट शिंका येऊ लागतात व सर्दीने आपण ‘जाम’ होऊन जातो..
प्रत्येक तरुणाला त्याच्या कॉलेजच्या दिवसांत एकतरी मुलगी ‘जाम’ आवडत असते. भले तो स्वतःच्या मनातील भावना तिच्यापुढे व्यक्त करु शकत नसेलही, मात्र मनातून त्याला ती ‘जाम’ आवडलेली असते. तिच्याशी दुसरं कोणी बोललं की, हा ‘जाम’ भडकतो. जसं काही तिच्यावर, याचाच हक्क असतो.. तिनं कधी याच्याकडे पाहून ‘स्माईल’ दिलं तर, हा ‘जाम’ खुश होतो. ती आठवडाभर कॉलेजमध्ये दिसली नाही तर हा ‘जाम’ वेडापिसा होतो. घरी आल्यावर बेचैन होऊन ‘जाम’ डोकं दुखायला लागल्याचं सांगून, बाम लावून शांत झोपी जातो. त्याची अवस्था दिवसेंदिवस ‘देवदास’ सारखी होते. डोक्यावर केसांचं टोपलं होतं. वडील त्याच्या हातावर पैसे ठेवून त्याला ह’जाम’कडे जायला सांगतात. कटिंग केल्यावर, तो नीटनेटका दिसू लागल्याने घरातले त्याच्यावर ‘जाम’ फिदा होतात. आता तो स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करुन, शिक्षण पूर्ण करतो. योग्य वेळी त्याचं, त्याच ‘जाम’ आवडलेल्या मुलीशी लग्न होतं व तो जीवनाची ‘मजा’ घेऊ लागतो.
माझ्या लिखाणात कुठे ‘जाम’ घोळ झाला असेल तर, मला सांभाळून घ्या आणि ‘मजा’में रहा.
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१४-७-२१.
नेहमीप्रमाणे नावडकर सरांचा “जॅम” चांगला व खुसखुशीत लेख