जीए कुलकर्णींनी ज्याक्षणी लेखणीला हात घातला तो क्षण मराठी सारस्वताच्या भाळी कायमचा गोंदला गेला. रूढार्थाने गावकुसाबाहेर राहून त्यांनी मराठी भाषेला जागतिक व्यासपीठ दिले. साहित्याचे सगळे लिखित -अलिखित नॉर्म्स न पाळता ते स्वतःच्या उंचीवर पोहोचले. आम्ही सुरुवातीला त्यांना दुर्लक्षाने मारले. त्याकाळात म. द . हातकणंगलेकर त्यांची काहीशी पाठराखण करीत होते. मग आम्ही त्यांच्यावर (सोप्पा असा ) दुर्बोधतेचा शिक्का मारला. (तसा शिक्का ग्रेसही मिरवत आहे. ) पण या दोघांच्या लेखणीतील मराठी भाषा काही औरच आहे – आपल्या पठडीतील नाही.
जीए थोडेसे किलकिले झाले विद्या -सप्रे चौधरींच्या लेखनातून ! मग सुभाष अवचट आणि शेवटी “मैत्र ” झालेल्या सुनीताबाई ! या दोघांमधील कोवळे भावबंध विलक्षण दिपविणारे आहेत. मात्र सदैव हा लेखक त्याच्या लिखाणातूनच दिसत आला आणि तीच एक पायवाट ठरली त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची. मात्र गंतव्याचा तरीही भरवसा नाही.
सगळं सोसणं कागदाला सांगणारा हा महान कारागीर – वेळ असेल तर वाचा, नसेल तर सोडून द्या असं ठणकावून बजावणारा !
” पहिल्या काही प्रयत्नांमध्ये नक्कीच त्रास होतो पण एकदा जीए वाचण्यात मजा जाणवू लागली की हातात इतर मराठी लेखक धरवत नाही ” हे मत माझ्या एका सहकाऱ्याने १९८१ साली नोंदवलं होतं.
प्रसिद्धीच्या मळलेल्या वाटा (संमेलनं , मुलाखती आणि आजच्या काळात असते तर समाज माध्यमे ) त्यांना कधीच खुणावत नव्हत्या. साहित्य अकादमी पुरस्कार प्रकरणानंतर तर त्यांचा ऐहिक विश्वासच उडाला.
आजही मला ठाम वाटते – मराठीतील एकमेव व्यक्ती म्हणजे जीए , ज्यांचा मराठी साहित्याबद्दल नोबेल पुरस्कारासाठी विचार होऊ शकतो /व्हायला हवा.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply