रानारानात गेली बाई शीळ हे मराठीतील भावगीत मराठीतले पहिले भावगीत समजले जाते.
‘रानारानांत गेली बाई शीळ गं, राया तुला रे काळवेळ नाही, ताळमेळ नाही’ असे म्हणणार्या एका प्रेमात पडलेल्या तरुणीचे हे मनोगत मेहेकरचे कवी ना.घ. देशपांडे यांनी लिहिले होते. जोशी यांनी ते निवडले व चाल लावून म्हणायला सुरुवात केली. जी.एन. जोशी यांचा जन्म ६ एप्रिल १९०९ रोजी झाला. एका कार्यक्रमात रमाकांत रूपजी यांनी ते ऐकले व त्याची रेकॉर्ड करण्याचे ठरले. १९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफान खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला.
जी.एन. जोशी हे मुळात उच्चशिक्षित वकील होते. एचएमव्ही मध्ये अधिकारी असताना शास्त्रीय संगीताच्या कलाकारांकडून जोशी यांनी अनेक रेकॉर्ड्स करून घेतल्या. ना. घ. देशपांडे यांची ‘नदीकिनारी, नदीकिनारी गं’ व ‘फार नको वाकू उंच जरी बांधा’ ही गाणी पुन्हा जी. एन. जोशी यांनी गाजविली. ‘डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको’ हे ना. घ. यांचे आणखी एक प्रसिध्द गाणे, पण ते नंतर पुढे सुधीर फडके यांच्या आवाजात लोकप्रिय झाले. मा.जी. एन. जोशी यांच्या आवाजात असेच आणखी एक गाजलेले स्त्री गीत म्हणजे भा. रा. तांबे यांचे ‘डोळे हे जुल्मी गडे, रोखून मज पाहू नका’..पुढे वसंत प्रभू यांच्या संगीतात लतादीदींनी ते आणखी लोकप्रिय केले. ना. घ. देशपांडे आणि स. अ. शुक्ल यांची गाणी जोशी यांनी वेचून वेचून निवडली, चाली लावून ती म्हटली व लोकप्रिय केली. भावगीतांच्या वाटेवरचा पहिला यात्रेकरू म्हणून जी. एन. जोशी यांनाच श्रेय दिले जाते. जी.एन.जोशी यांचे २२ सप्टेंबर १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply