नवीन लेखन...

गावगाडा : स्वदेशीचे स्थानिक जनित्र

 

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला प्रा. शंकर धडगे यांचा लेख


भारत देश हा पूर्वीपासूनच खेड्यापाड्यांनी, वाड्यावस्त्यांनी सामावलेला देश आहे आणि हा देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. या देशात अनेक जाती व धर्माचे लोक पिढ्यान्पिढ्या राहात आहेत. कृषी व्यवसायाशी निगडित अनेक व्यवसाय भारतात प्राचीन काळापासून रूढ आहेत. मनुष्याला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या बरोबरच अनेकविध गरजा भासत आल्या आहेत. गरजेतूनच विविध व्यवसायाची निर्मिती झाल्याचे दिसून येते आणि व्यवसायानुसार अनेक जाती-जमाती निर्माण झाल्या असाव्यात असे जाणवते.

प्राचीन भारताच्या राजेशाही काळापासून ते आजच्या आधुनिक काळात मानवाच्या गरजा भागविण्यासाठी अनेक व्यवसाय व व्यावसायिक जाती-जमाती रूढ आहेत. ग्रामीण भागात राहणारा, शेती व्यवसाय करणारा एक मोठा वर्ग देशभर आहे. शेती व्यवसायाला साहाय्यभूत ठरणारे अनेक व्यवसाय आहेत. ग्रामीण लोकजीवनाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जगण्यात नानाविध व्यवसायांना व व्यावसायिक जाती-जमातींना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचे कारण असे की, शेती व्यवसायाला लागणारी अवजारे तयार करून देणारा वर्ग, सांस्कृतिक लोकजीवन, व्यवहार सुरळीत पार पाडणारा सेवकवर्ग म्हणून जाती व्यवसायांना महत्त्व होते आणि ते आजही आहे.

गावगाडा म्हणजे ग्रामसंस्था होय. यात गावपंढरी, बलुतेदार – अलुतेदार, वतनदार, फिरस्ते यांचा समावेश असायचा. गावपंढरी म्हणजे गावातील शेती व्यावसायिक कुणबी आणि इतर जमातींचे लोक यांचे परस्पराश्रयाचे लोकजीवन होय. जातिनिहाय जातधंदा करून काही हक्काची नेमणूक, उत्पन्न, अधिकार, मानपान, हक्क इत्यादी वंशपरंपरागत पद्धतीने लाभ मिळविणारा वर्ग म्हणजे वतनदार होय आणि फिरस्ते म्हणजे गावगाड्याच्या आश्रयाने जीवन जगत असूनही ग्रामसंस्थेत दाखल होऊ न शकलेल्या भटक्या जमाती होय.

ग्रामीण समाजजीवनामध्ये आजही बलुतेदार- अलुतेदार या संज्ञा रूढ आहेत. श्रमाचा मोबदला सुगीनंतर शेतकऱ्यांकडून मिळविणारा वर्ग म्हणजे बलुतेदार-अलुतेदार होय. वर्षभर शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरेल असा जातधंदा करून वर्षाकाठी एकदाच सुगीनंतर मोबदल्याच्या स्वरूपात धान्य घेणारा वर्ग गावगाड्यात होता. यात बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार राहात असत. म्हणजे त्यांचे जातधंदे निश्चित असायचे. बलुतेदारांमध्ये ‘महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव, कोळी आणि चौगुला’ यांचा आणि अलुतेदारांमध्ये ‘तेली, तांबोळी, साळी, सालार, शिंपी, माळी, मुलाणी’ अशा जातींचा अंतर्भाव असायचा असा उल्लेख प्राध्यापक प्रभाकर गाडे यांच्या ‘गावगाड्या बाहेर’ या ग्रंथात आढळतो.

फिरस्तेमधील भटक्या जमातींमध्ये पशुपालक, व्यावसायिक, भटके, लोककलाकार, देवदैवतांचे उपासक, भिक्षुक जमाती गावोगाव भटकत गावगाड्याच्या आश्रयाने जगत होत्या. त्यांचेही विविध असे व्यवसाय होते. याही लोकजीवनात भटके आणि विमुक्त अशा संज्ञा आहेत. भटक्या जमाती म्हणजे लोकाश्रयाने आपले व्यवसाय करून, करमणुकीचे खेळ करून, देवदैवतांच्या नावाने उपजीविका मागून जगणाऱ्या जमाती होय. तर विमुक्त म्हणजे भारतातील इंग्रजी राजवटीत गुन्हेगार जमाती म्हणून घोषित केलेल्या आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर समान नागरिकत्वाच्या हक्कान्वये मुक्त झालेल्या जमातींना विमुक्त जमाती म्हटले जाते. अशा २८ भटक्या आणि १४ विमुक्त जमाती आहेत. अशा ४२ जमाती भटक्याचं जीवन जगत होत्या. परंतु गावगाड्याच्या लोकाश्रयाने जगत होत्या. त्याचे जातिनिहाय व्यवसाय ठरलेले होते.

वरीलप्रमाणे गावगाड्याचे लोकजीवन भारतात अस्तित्वात होते. पण गरिबी, दारिद्र्य, पासमारी, अज्ञान, अंधश्रद्धा यामुळे म्हणावे तसे चांगले जगणे त्यांच्या पदरी पडत नव्हते. पण अज्ञानात सुख असते. या अर्थाने ते सुखी समाधानी जीवन जगत होते.  मात्र स्वदेशीत्व त्यांच्या जगण्यात होते. परस्परांच्या सहकार्याने, आश्रयाने ते जगत होते.

प्रस्तुत लेखामध्ये गावगाड्यातील व्यवसायांचा विचार करावयाचा असल्याने जातधंदे आणि जमाती यांची सविस्तर ओळख करून घेताना मी केवळ भटक्या जमातींचा विचार येथे मांडत आहे. फिरस्ते, भटके हे गावगाड्यात मानपानाचे नसले तरी गावगाड्याच्या आश्रयाने जगत होते आणि गावगाड्याचे जीवन सुरळीत चालावे म्हणून अनेकविध व्यवसाय करून आपली गुजराण करीत होते.

विविध भटक्या जमाती आणि त्यांचे व्यवसाय

आजही खेड्यापाड्यांतून व शहरांतून उपजीविकेच्या निमित्ताने या जमाती भटकंती करीत आहेत. त्यांच्या विविध व्यवसायांचे स्वरूप पाहणेही सयुक्तिक ठरेल.

त्यांचे व्यवसाय पुढीलप्रमाणे: –

  • शिकार करून उपजीविका करणारी पारधी जमात.
  • जनावरे पाळणे, त्यांची खरेदी-विक्री करणे, जनावरांच्या साहाय्याने खेळ करून उपजीविका करणाऱ्या गोपाळ, दांगट, मैराळ, गोल्ला, डवरी गोसावी, नंदी बैलवाले, दरवेशी इत्यादी जमाती.
  • लोकांचे मनोरंजन करून कलावंत म्हणून उपजीविका करणाऱ्या कोल्हाटी, मदारी, गारुडी, चित्रकथी, बहुरूपी, रायरंद, डोंबारी इत्यादी जमाती.
  • जनसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारातील काही वस्तू बनविण्याचे व्यवसाय करून उपजीविका करणाऱ्या कैकाडी, सिकलगार, कुंचीकोरवी, कंजारभाट, घिसाडी, ओतारी, वैदू, गाडीलोहार इत्यादी जमाती.
  • शकुन व भविष्य सांगून उपजीविका करणाऱ्या मेंढगी, तिरमाळी, कुडमुडे जोशी, वासुदेव, मनकवडे, डमरुवाले जोशी, सरोदे जोशी इत्यादी जमाती.
  • शारीरिक कष्टाची कामे करून उपजीविका करणाऱ्या वडार, लमाण, बेलदार, पाथरवट इत्यादी जमाती.
  • केवळ मागून उपजीविका करणाऱ्या गोसावी, बैरागी, स्मशान-जोगी इत्यादी जमाती.
  • देवांच्या नावाने केवळ मागून जगणारी गोंधळी, वाघ्या-मुरळी, आराधी, जोगतीण- जोगे, रावळ, भोपे, मरिआईवाले इत्यादी जमाती म्हणून सांगता येईल.

या साऱ्या भटक्या जमातींचे व्यवसाय ग्रामीण जीवनाशी व कृषी संस्कृतीशी निगडित होते. त्यामुळे या जमाती भारतीय समाजाच्या जीवनाशी सांस्कृतिक व आर्थिक अनुबंधाने संबंधित होत्या. त्यांचे व्यवसाय लोकजीवनाशी कसे संबंधित होते ते पुढील चर्चेवरून स्पष्ट होते.

  • ज्वारी, बाजरी, साळी, मका, शेंगा, तूर, हरभरा, गहू, करडई इत्यादी धान्य साठविण्यासाठी निरगुडीच्या घाटापासून कणग्या तयार करणे, शेळ्या-मेंढ्यांच्या कोकरांना आणि कोंबड्यांच्या पिल्लांना झाकण्यासाठी अनुक्रमे झाप व खुराडे तयार करणे, शेतीच्या कामाकरिता शिंदीच्या घाटापासून टोपली, उफडणी तयार करणे इत्यादी कामे कृषी व्यवसायाला पूरक असलेला व्यवसाय करणारी कैकाडी (कोरवी) जमात.
  • शेतीच्या बांध-बंधाऱ्याची, मोठ्याताली घालण्याचे मातीकाम करणारी बेलदार जमात.
  • घरांचे, रानातील कोठ्यांचे, विहिरीच्या बारवाचे बांधकाम करण्यासाठी लागणारे दगड फोडणारे, त्यांना घडविणारे (घडईकाम), मोठमोठ्या दगडांची ताल (बंधारे) बांधणारे, बायकांना घरकामात लागणारे जातं, उखळ, खलबत्ता तयार करणारी वडार व पाथरवट जमात.
  • ग्रामीण जीवनात देव-देवतांची उपासना अनेक पिढ्यांपासून चालत आलेली दिसते. काही लोक आपल्या मुलांच्या लग्नामध्ये गोंधळ – जागरण करतात. हे गोंधळ विधी करणारी गोंधळी जमात. या विधीबरोबरच ही जमात सुगीच्या दिवसात दिमडी-तुणतुण्यावर गाणे म्हणून लोकांचे मनोरंजनही करीत असत.
  • गोंधळी जमातीप्रमाणेच वाघ्या-मुरळी, आराधी या जमातीदेखील गोंधळ – जागरण करतात.
  • खेड्यापाड्यातील अशिक्षित, देवभोळ्या लोकांना शकुन, भविष्य पाहण्याचे वेड, छंद – नाद असतो. त्यांना शुभाशुभ शकुन सांगणारे, पोपट या पक्ष्याचा वापर करणारे कुडमुडे जोशी.
  • या कुडमुडे जोशींप्रमाणेच ताड अथवा भोजपत्रासारखे लाकडी फळ्यांवर चित्रित केलेल्या चित्रांच्या आधारे भविष्य कथन करणारी चित्रकथी जमात.
  • शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायातील आयुधे, हत्यार म्हणजे कुऱ्हाड, खुरपे, विळा, कोयता, कुदळ, कुळवाचे फास, बैलगाडीच्या धावपट्ट्या तयार करणारी गाडी लोहार, घिसाडी जमात.
  • गावगाड्यातील सर्वच लोकांना लागणाऱ्या देव्हाऱ्यातील मूर्ती, शेतकऱ्यांना लागणाऱ्या बैलांच्या शिंगावरील शेंब्या, पायातील तोडे, गळ्यातील घागरमाळा, घंट्या इत्यादी वस्तू, तांबे – पितळ-चांदी इत्यादी विविध धातूंपासून भांडी बनविणारे, ओतकाम करणारी ओतारी जमात.
  • सुगीनंतर गुढी पाडव्याच्या पुढे-मागे पहाटेच्या वेळी बैलावर बसून हातातील घाटी वाजवित लोकांना रामप्रहरी जागं करणारा, दुपारी किंवा संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची वंशावळ सांगणारा, नव्या नांदी घेणारा हेळवी/ पांगुळा समाज.
  • कोणत्याही कालखंडात नकला करून लोकांचे मनोरंजन करणारी बहुरूपी जमात.
  • शारीरिक कसरतीचे खेळ करणारी डोंबारी, गोपाळ खेळकरी जमात.
  • पशूंच्या साहाय्याने खेळ करणारे नंदी बैलवाले, माकडवाले, अस्वलवाले दरवेशी, सापवाले गारुडी, उंटवाले मदारी जमात.
  • शेतातील पिकांची राखण, गावाची राखण करण्यासाठी पहारा/ गस्त घालणारी पहारेकरी, रामोशी जमात.
  • पडीक जमिनीवरील व बांध बांधाऱ्यावरील झाडे तोडून लागवडीस योग्य जमीन करून देणारी बेरड जमात.
  • शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी करणाऱ्या हरीण, कोल्हा, रानडुक्कर इत्यादी प्राण्यांचा बंदोबस्त करणारे व फाशांचा वापर करून त्यांची शिकार करणाऱ्या पारधी, भिल्ल, गोंड, कोरकू इत्यादी आदिवासी जमाती.
  • प्रवासाची साधने नव्हती त्या काळात बैलांच्या पाठीवरून माल वाहून नेण्याचे काम करणारी लमाण जमात.

या जमातींच्या अशा व्यवसायांमुळे त्या जमाती गावकऱ्यांच्या जीवनाला उपयुक्त व हितकारक वाटत होत्या. अप्रगत अशा खेड्यातील जनतेचे व या जमातींचे सहसंबंध परस्परपूरक होते व आपल्या गरजा भागविणारे घटक म्हणून एकमेकांकडे पाहिले जात असे. या भटक्या जमाती अस्थिर असल्या तरी त्यांनी आपल्या श्रमाने, कष्टाने समाजाला खूप योगदान दिले आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा मोठेपणा मराठी साहित्यात फारसा आढळत नाही. परंतु संस्कृतीच्या विकासात आणि देशाच्या इतिहासात त्यांच्या श्रमाचा फार मोठा वाटा आहे.

‘भटक्यांच्या प्रत्येक जमातीने या देशाकरिता आपले योगदान दिले असल्याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. या देशात नृत्यकला, चित्रकला, शिल्पकला, वाद्य व गायनकला इत्यादींना जन्म भटक्यांनीच दिला आहे. भटक्यांच्या घामामुळेच हा देश आकाराला आला असून त्यांच्या बाहूंतील शक्तीमुळे देश शूरवीरांचा ठरला. त्यांच्या कलाकौशल्यांच्या घामामुळेच देश सत्यम्, शिवम्, सुंदरम् बनला. या सर्व जाती-जमातींच्या अथक परिश्रमांतून आणि त्यांच्या निढळाच्या घामातून हा देश जगाच्या पाठीवर श्रेष्ठ ठरला, याचा सार्थ अभिमान संपूर्ण देशवासियांना होणे आवश्यक आहे,’ असे डॉ. लिनकुमार बावने यांनी आपल्या ‘भटक्यांचा भग्न संसार आणि संस्कृती’ या ग्रंथातून केले आहे. डॉ. बावने यांच्या या मीमांसेत काहीजणांना अतिशयोक्ती जाणवेल. तथापि भटक्या जमातीतील विविध घटकांनी समाज जीवनाच्या विविध क्षेत्रांना योगदान दिले आहे, हे मात्र मान्य करावे लागेल आणि यातूनच स्वदेशीत्व जाणून घेता येण्यासारखे आहे.

राजेशाहीच्या काळात भारतात वस्तुविनिमय पद्धत रूढ होती. शेतकरी आपला शेतमाल देऊन शेती उपयुक्त कामे करून घेत होते. या काळात चलन नव्हते असे नाही. या काळात चलन म्हणून नाणेपद्धती होती. सुवर्ण व चांदीची नाणी होती. प्रत्येक राज्याच्या राजे-महाराजांनी आपापल्या राज्याच्या मुद्रा असलेली नाणी टाकसाळीतून निर्माण केली होती. तरीही बलुते – आलुतेदार, फिरस्ते यांना धान्याच्या रूपानेच मोबदला दिला जात असे. पुढे जगात औद्योगिक क्रांती झाली. लोकशाहीचा उदय झाला. राजेशाही संपुष्टात आली. शिक्षणाचा प्रसार झाला. ग्रामीण उद्योग व्यवसायातून निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांना पर्याय उपलब्ध होऊ लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने तळागाळातील जनतेला आत्मभान येऊ लागले. बलुत्यांची कामे नाकारली जाऊ लागली. खेड्यातील लोक रोजगारासाठी शहरात येऊ लागले. यामुळे एक नवीन समाजजीवन निर्माण झाले. या आधुनिक काळात वस्तुविनिमयाची पद्धत बंद पडून पैशाचा व्यवहार होऊ लागला. असा हा सामाजिक बदल आपणास माहीतच आहे. तरीही काही प्रमाणात वस्तुविनिमय पद्धती टिकून असल्याचीही उदाहरणे पहावयास मिळतात. पनवेल येथील चर्मवाद्य निर्माण करणारे एक व्यावसायिक आजही तबला, मृदंग, ढोल, ताशे, हलगी, डफ, नगारे तयार करून विकताना, त्याच्या मोबदल्यात धान्य स्वीकारतात. यूट्यूबवरील एका चित्रफितीमधून ही माहिती मिळते. त्या दुकानदाराचे नाव भगवान नाना पुणेकर यांचे ‘जय मल्हार म्युजिकल वाद्यालय’ हे दुकान असून गेल्या ९७ वर्षांपासून परंपरेने ते हा व्यवसाय करतात आणि ते मोबदला म्हणून तांदूळ स्वीकारतात. मालक ज्ञानेश्वर पुणेकर हे ही पद्धत जोपासत आहेत. वर्षाकाठी ९०० ते १००० किलो धान्य मिळते असे त्यांचे म्हणणे आहे.त्यांना या परंपरेचा अभिमान वाटतो. आपल्या पूर्वजांची ही परंपरा ते आजही जोपासत आहेत. शोध घेतल्यास आणखीनही काही उदाहरणे सापडू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रामीण कुटीरोद्योग मोडीत निघण्याच्या आणि औद्योगिकीकरण सुरू होण्याच्या संक्रमणकाळात समाजजीवनामध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. त्याचा परिणाम समाजजीवनावर झाला. औद्योगिक प्रगतीमुळे निर्माण झालेल्या भौतिक सुविधांमुळे पूर्वीच्या वस्तूंना आजच्या पर्यायी वस्तू उपलब्ध होऊ लागल्याने ग्रामीण लोकजीवनातील व्यवसायांना उतरती कळा प्राप्त होऊ लागली. परिणामी त्यांचे व्यवसाय बंद पडले. यामुळे समाजजीवनात आमूलाग्र असा बदल झाला. ते आज आपण अनुभवत आहोत. प्लॅस्टिकचा शोध लागल्याने टोपली करणारा कैवाडी समाज पारंपरिक जातधंद्यापासून दुरावला. नायलॉनच्या दोरीमुळे मातंगांच्या दोरखंडाचा व्यवसाय थांबला. सूत गिरण्यांतून तलम कापड निर्माण होऊ लागल्याने विणकर लोकांनी तयार केलेले जाडेभरडे कापड लोकांच्या पसंतीतून उतरले. धातूच्या ओतकामातून विविध वस्तू व अवजारे निर्माण होऊ लागल्याने लोहार, कुंभार, ओतारी यांचा व्यवसाय बुडाला अशा अनेक बाबी सांगता येण्यासारख्या आहेत. अशा या बदलत्या समाजाच्या व्यथा अधोरेखित  करणाऱ्या साहित्यकृती देखील निर्माण झाल्या. ते म्हणजे उद्धव शेळके यांची ‘धग’, रा. रं. बोराडे यांची ‘पाचोळा’, बाबुराव मुसळे यांची ‘पखाल’ या ग्रामीण कादंबऱ्या वानगीदाखल सांगता येण्यासारख्या आहेत. एकंदरीत गावगाड्यातील लोकजीवन हे अभावग्रस्त असले तरी स्वयंपूर्ण असे होते. मानवाच्या गरजा जसजशा वाढत गेल्या, तसतसे अनेक व्यवसाय निर्माण झाले. पण आज रूढ असलेल्या कोणत्याही व्यवसायात देशी तत्त्व सापडते. कोणताही व्यवसाय पूर्णपणे नवा नाही. केवळ शिक्षणाचा उपयोग करून नानाविध वस्तू व सेवांची निर्मिती करता आली पाहिजे. समाजाला त्याचा उपभोग घेता येत आहे. सुखमय, सोयीचे जीवन लाभावे यासाठी केवळ पैसा महत्त्वाचा नसून गरजांची पूर्तता होत आहे, हे महत्त्वाचे वाटते.

या सर्व लेखन व्यवहारातून स्वदेशीचा आग्रह धरावा असे मत मी मुळीच मांडणार नाही. परंतु एकेकाळी लोकमान्य टिळकांनी मांडलेला स्वदेशीचा विचार पुन्हा एकदा समजून घ्यावा. भारत आर्थिकदृष्ट्या बलशाली होण्यासाठी स्वदेशी वस्तू आपण खरेदी केल्या पाहिजेत, वापरल्या पाहिजेत. म्हणजेच भारतातील पैसा भारतात राहील, याचा विचार करण्यासारखा आहे. 

संदर्भ :-

  • भटक्यांचे भग्न संसार आणि संस्कृती – डॉ. लिनकुमार बावने
  • गावगाड्याबाहेर प्रा. प्रभाकर मांडे
  • भटक्या विमुक्तांची आत्मकथने: एक अभ्यास

(पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांना पीएच.डी.साठी सादर केलेला प्रबंध २०१२) प्रा. डॉ. शंकर आंदू धडके.

(सी. बी. खेडगी महाविद्यालय, अक्कलकोट ता- अक्कलकोट जि. सोलापूर येथे अध्यापक) 

-प्रा. शंकर धडगे

(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी  २०२० च्या अंका मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..