पुस्तकाच्या सुंदरशा पण स्वप्नाळू अशा जगात जगणे म्हणजे स्वप्न पाहण्याचे सार्थकच. कधी कधी जिवलग माणसाजवळ सुध्दा ज्या गोष्टी मन उघड करून बोलता येत नाहीत. त्या या स्वप्नातील जगात अगदी सहजच उलगड़ल्या जातात. आणी आपण मनावरचं ओझं थोडं खाली उतरवल्यामूळे आनंदी होतो.
जीवनातल्या सत्याच्या उग्र चेह-यांना सामोरे जाण्याचं मानसीक धारीष्ट्य जगण्याचीच इच्छा प्रबळ करतं. तेही याच पुस्तकांच्या स्वप्नाळू जगामूळे.
तसा तूही पुस्तकांच्या काल्पनिक दुनियेतलाच म्हणून विचारावसं वाटलं. अवसेच्या अंधारात उगवलेल्या शुक्र ता-यासारखा तू ही मनाच्या गाभा-यात चमकलास. आणी मनाचा गाभारा आंतरीक सुगंधाने दरवळून गेला. हा आंतरीक सुगंध सोबत घेऊन कधी सत्यात येशील का रे, माझ्या सोबतीला या स्वप्न आणि पुस्तकांच्या विषाद नसलेल्या स्वप्नात ?
तेव्हा ही स्वप्नपहाट झाली असेल प्रभाकरासोबत आलेल्या पारीजातकाच्या आणी जास्वदांच्या राशीसारखी अवर्णनीय सुंदर !
ती स्वप्नपहाट पाहायला तू येशीलच.. हो नक्कीच येशील हा माझ्या मनाचा सांगावा आहे. उगीच नाही म्हणत मी तूला विश्रब्ध.
“बघ तर खरं या पहाटेला पारीजातकाच्या आणि जास्वंदाच्या राशी दिसायलाही लागल्यात .”
© वर्षा पतके- थोटे
11-02-2019
Leave a Reply