मी सध्या कौटुंबिक सुट्टीसाठी गोव्याला आहे. चार दिवसांची ही सुट्टी अगदी निवांत चालली होती. त्यातं कारण या चार दिवसांत माझ्यापुरती टिव्हीलाही सुट्टी दिली होती (फक्त’ तारक मेहता…’ आणि ‘टाॅम ॲंड जेरी’ मी कुठेही असलो तरी पाहातो.) हे कार्यक्रम बीपी-शुगर नियंत्रणात ठेवतात, असा माझा अनुभव आहे.) टिव्ही आणि त्यातील मिडीया नामक मर्कटांच्या लीला हे देशातील बऱ्याच जणांच्या मानसिक आणि म्हणून शारीरीकही अनारोग्याचं महत्वाचं कारण असावं, असं मला मनापासून वाटतं. माझ्या शुगरचं कमी-जास्त होणं, हे मिडीयामुळे असावं असं माझं ठाम मत आहे..
काल असंच काहीसं झालं. ‘तारक मेहता..’ कुठे असावा, याचा शोध घेताना अचानक माझ्या आवडत्या नितीन गडकरीचं दर्शन झालं. गडकरीचं शांत-संयत बोलणं मला आवडतं. राजकारण हा माझा अत्यंत नावडता विषय असुनही, ते मला गडकरींच्या तोंडून ऐकायला आवडतं. मनात असेल ते बिनधास्त बोलतात, कोणाला आवडेल-न आवडेल याचा विचार न करता गडकरी व्यक्त होतात. म्हणून म्हटलं, की पाहू तरी नितीनजी काय म्हणतायत ते..! त्यांचं भाषण ऐकलं आणि गडकरींविषयी माझ्या मनात जो आदर होता, त्याला मोठा धक्का बसला..
निमित्त होतं इंदिरा डॉकमध्ये प्रस्तावित ‘मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल’च्या भूमिपूजनाचं. या प्रसंगी नितीन गडकरींसोबत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि नौदलाचे कमांडंट चीफ व्हाईस ॲडमिरल गिरीष लुथ्राही उपस्थित होते. श्री. गडकरी म्हणाले की, “काही महिन्यांपूर्वी नौदलाचे अधिकारी घरांसाठी दक्षिण मुंबईमधील भूखंड मागण्यासाठी आले होते. त्यांना मुंबईतच घर कशासाठी हवे? त्यांची खरी गरज सीमेवर आहे. त्यामुळे नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या घरासाठी मुंबईत एक इंचही जागा देणार नाही”..! केंद्रीय बंदरमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी मुंबईत नौदलाचा अवमान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि नौदलाच्या उच्चाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केला, तो अत्यंत अक्षम्य आहे. गडकरी पुढे असंही म्हणाले की, “नौदल अथवा संरक्षण मंत्रालय म्हणजे सरकार नव्हे, तर केंद्रामध्ये सरकार आहे आणि आम्ही त्यात आहोत”..! ह्या वाक्याला गडकरीसाहेब, गर्वाचा दर्प आहे..सरकरात आपल्याप्रमाणे आम्ही आणि सैन्य-सशस्त्र दलंही आहोत, याचं भान सुटू देऊ नका..
गडकरीसाहेब, तुम्ही सरकार आहात हे सांगीतलंत ते बरं झालं, कारण माझ्यासारखे लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या अनेकांचं मत ‘जनता सरकार असते’ असं होतं. आम्ही सुरक्षित आहोत, ते सरकारमुळे नव्हे, तर सैन्य दलांच्या सिमेवर असल्याने, अशीही आमची भावना आहे. तुम्ही आणि तुमचं नसलं तरी, सरकारं नांवाची संस्था आणि त्यातले अधिकारी स्वत:ला ‘सरकार’ समजून प्रजेची कशी पिळणूर करतात, हे आम्हाला माहित आहे. सरकारं ज्यांच्या जीवावर निर्धास्त कारभार करतात, अशा सैन्यदलांच्या घरासाठी एक इंचंही जागा मिळवून देणार नाही हे आपलं स्टेटमेंट म्हणूनच अत्यंत निषेधार्ह आहे..एक बरं झालं, की तुम्ही निदान त्या जागेवर ‘विकासा’चा डोळा आहेत असं बिनधास्त कबूल तरी केलंत, उगाच कुठलं तरी ‘आदर्श’ सांगून वाकड्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला नाहीत, हे तुमच्या बिनधास्त स्वभावाप्रमाणेच झालं..
जलपर्यटनाला चालना देण्यासाठी दक्षिण मुंबईमधील मलबार हिल येथे तरंगता धक्का (जेट्टी) उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र, नौदलाने त्याला परवानगी नाकारली. श्री. नितीन गडकरींच्या त्या आक्षेपार्ह विधानामागे ही घटना आहे.
गडकरीजी, तुमची विकासाची तळमळं रास्त आहे, मला त्याचं कौतुकही आहे. परंतू नेव्हीने असा धक्का उभारण्यास जी परवानगी नाकारली, त्यामागे देशाच्या, म्हणजे आमच्या, सुरक्षिततेचा विचार असावा. आणि आमची सुरक्षा धाब्यावर बसवून होणारा विकास आम्हाला नको आहे. २६/११ला काय झालं, ते काय नव्याने सांगायची गरज नाही. एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाल्यावर सर्वांनीच देशाच्या आपली सागरा सीमा सुरक्षित नाही असं सांगून नेव्ही-कोस्ट गार्ड आदी संस्थांना दुषण दिलं होतं. या पार्श्वभुमीवर दक्षिण मुंबईमधील मलबार हिल येथे तरंगता धक्का उभारायला नेव्हीने नाकारलेल्या परवानगीनागे, मुंबई आणि मुंबकरांच्या आणि पर्यायाने देशाच्या सुरक्षिततेचा विचार असू शकतो, असा विचार नितीनराव, किमान तुच्यासारख्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मंत्र्याने मणीशंकर अय्यर यांच्यासारखं काही तरी बरळण्याअगोदर करायला हवा होता..मणीशंकरांचं ठिक आहे, त्यांना कुणीच गांभिर्याने घेत नाही, पण तुमचं तसं नाही, तुमच्यावर लोकांची श्रद्धा आहे. लोक तुमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात, विचार करतात, याचं भान तुम्ही ठेवायला हवं..!!
गडकरीसाहेब, या परिसरात नौदलाचे ना अस्तित्व आहे ना नौदलाचा कोणता कारभार त्या भागात आहे, हे वाक्य माझ्यासारख्या एकाने क्षुद्र, अडाणी व्यक्तीने म्हटलं असतं, तर एकवेळ क्षम्य होतं..पण नौदलातली माणसंही आपल्याच देशाची नागरीक आहेत, त्यांनाही कुटुंबं असतं आणि त्यांनाही जमिननीच्या तुकड्याची गरज भासत असते. गरूड कितीही उंचं उडाला तरी विसाव्यासाठी त्याला जमिनीचा आधार घ्यावाच लागतो. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सागरी सीमेवर पाण्यात राहावं अशी तुमची अपेक्षा आहे काय? आणि किनाऱ्यांवर इमले बांधायचा विशेषाअधिकार फक्त भ्रष्ट बाबू आणि राजकारणी यांचाच आहे काय? बाकी इतरांचं सोडून द्या, पण रोजचं आयुष्य मरणाच्या उंबरठ्यावर ठेवलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांना हा अधिकार नाही का? उलट किनारपट्टीवर नौदलाच्या अधिकारी-सैनिकांना प्राधान्याने घरं उपलब्ध करून द्यायला हवीत,कारण त्यामुळे तरी आम्ही सुरक्षित आहोत ही भावना आमच्यात निर्माण होईल.
गडकरीजी, निदान आपल्यालारख्या ज्येष्ठ मंत्र्याने तरी सैन्य दलाचा अनादर होईल अशी वक्तव्य जाहिररित्या टाळायला हवीत. “नौदलाला एक इंचही जागा मिळवू देणार नाही”, हे आपलं वाक्य, इतरांचं माहित नाही, पण मला तरी कौरवाच्या दुर्योधनाने “पांडवांना सुईच्या अग्रावर मावेल येवढीही जागा मिळू देणार नाही”, या पठडीतलं वाटलं..! मला माहित आहे तुम्ही दुर्योधन नाहीत आणि म्हणून तुम्ही असं वाक्य उच्चारावं, याचंच मला दु:ख होतं आहे..
माझ्या मनात तुमच्याविषयी असलेला आदर तुमच्या अनावश्यक वक्तव्यामुळे हलला, हे मात्र खरं..! आपल्या वक्तव्यामुळे जनतेच्या मनातला आपल्या ‘विकासा’विषयीच्या कल्पनांचा आदर किती वाढला आणि नेव्हीविषयीचा किती कमी झाला, याचा एकदा सर्व्हे करून घ्याच..!! गडकरींनी या भाषणात पर्यावरणवाद्यांनाही शब्दांचा मार दिला, परंतू त्यावर चर्चा होऊ शकते, मात्र नेव्हीविषयीच्या वक्तव्यावर मात्र माझ्यासारखी माणसं दुखावली असतील, यात शंका नाही..!
टिव्हीपासून चार दिवस लांब राहील्यामुळे नियंत्रणात आलेली माझी शुगर, आपल्या दर्पाळ वक्तव्यामुळे नक्की वाढली असणार..!!
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply