नवीन लेखन...

गाढव बाजार

आटपाट नगर होते.

“त्याला राजा नव्हता. एक मुख्य मंत्री होता आणि अनेक मंत्री होते. आधी सुरुवातीला एक मुख्य मंत्री आणि पाच दहा मंत्री असे छोटेसे मंत्रीमंडळ होते. सगळे चांगले चालले होते.

हळू हळू मंत्र्यांना कळले की आपण मंत्री आहोत ते लोकांनी निवडून दिलेले असलो तरी त्यांची कामे केलीच पाहिजे असे नाही.

एकदा निवडून आलो की लोकांना विसरले तरी चालते. आपली आणि आपल्या सात पिढयांची कमाई करून घ्यायची ही संधी आहे.

त्या संधीचे सोने करायची कला ते शिकले.

आपल्या पुभयोबांनाही त्या कलेत प्रविण केले.

घरांवर सोन्याची कौले चढवली.

लोक आनंदाने ती पाहू लागले.

आटपाट नगरात मंत्र्यांचे इमलेच्या इमले चढू लागले.

मंत्री झाल्यावर कशी जादूची कांडी फिरते हे एकदा समजले आणि मुख्य मंत्र्यांवर मला मंत्री करा, मला मंत्री करा असा दबाव वाढू लागला.

पंचवी मंत्री मंडळ वाटू लागले. दहाचे पंधरा, पंधराचे पंचवीस, पास असे मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढू लागते.

त्यात प्रत्येकाची स्वयंचे खाते मिळविण्याची धडपड.
काम कुणी करायचे याची चिंता एक मुख्य मंत्र्यांनी करायची !

मुख्य मंत्री बजार बेजार झाले !

इच्छुकांची गर्दी सरता सरेना!

नवीन नवीन खाती आणि ती ही खायची कोणती आणि किती काढायची? मुख्यमंत्र्यांच्या डोक्याचा भुगा झाला.

आटपाट नगरात एक धोबी रहात होता. त्याचे नाव धूतकर्मा.

त्याची चार गाढवे होती. उच्चरवा, लंबकर्ण, दीर्घ पुच्छ आणि लघुपुच्छ मुख्यमंत्री आणि मंत्री मंडळातील मंत्री यांचे कपडे धुण्याचे आणि इस्त्री करण्याचे काम तो करीत असे.

मंत्री मंडळाची संख्या वाढत गेली तसे त्याचे कामही वाढले.

चार गाढवं पुरी पडेनात. चाराची आठ, आठाची सोळा, सोळाची बत्तीस अशी ती वाढतच चालला.

प्रत्येक मंत्री दिवसाला तीन तीन ड्रेस बदलायचा.

हळूहळू मंत्रीच काय त्यांचे पी.ए., गल्लीबोळातले कार्यकर्ते भाई, दादा सगळेच पांढरेशुभ्र कडक इस्तीचे कपडे वापरू लागले.

धूत वर्माचा धंदा शंभर पटीने वाढला. गाढवं कमी पडू लागली.

आटपाट नगरात रस्तोरस्ती, गल्ली बोळांतून बगळ्यासारखे पांढरे धप्प कपडे घातलेल्या मंत्री, पुढारी, कार्यकर्ते, भाई, दादा त्यांची पिलावळ यांचे मोठे मोठे जाहिरातींचे बोर्ड झळकू लागले.

कुठे सुलभ शौचाल्याचे उद्‌घाटन, कुठे वाढदिवस, कुठे रस्त्यावर, पार्कमधे बसायला बाक, कुठे केशकर्तनालयाचे उद्‌घाटन, कुठे जंयती, कुठे मयंती, कुठे स्वागत, कुठे निरोप, कुठे रस्त्याची नावाची पाटी, कुठे पूजा, कुठे काही, कुठे काही अशा नाना प्रकारच्या आणि नाना आकारांच्या पाट्यांनी आटपाटनगर सजलेले दिसू लागले.

पुढारी तरी किती प्रकारचे? ढेरपोटे, मिशाल, बुटके, उंच, मग्रूर, एकही बघावा असा नाही. त्याच्या अवती भवती विंचवाच्या पिलांप्रमाणे त्याची पिलावळ. आटपाट नगरात संडास, मुताऱ्या, वाढदिवस इ. शिवाय काही कामे होत नव्हतीच असे चित्र दिसत होते.

धूतवर्माकडे अनेक गाढवे होती ती त्याचा जीव, उच्चरवा, लंबकर्ण, दीर्घपुच्छ आणि लघुपुच्छ या त्याच्या चौकडीवरच होता. मुख्य मंत्र्यांचे कपडे धुण्यासाठी तो फक्त त्यांचाच वापर करी.

एकदा मुख्य मंत्र्यांच्या बंगल्यावर त्यांच्या कपड्यांचे गठ्ठे घेऊन गेला असता मुख्यमंत्री आणि बाईसाहेब यांचे बोलणे चालू होते.

काय हो अलिकडे तुम्ही फारच चिंतेत दिसता?

काय झाले?”

“काय सांगू तुला? या मंत्री मंडळ विस्ताराने माझी झोप उडवलीय अगदी. ”

“का बरे त्यात काय येवढा त्रास?”

सगळे नुसते गाढव आहेत. साल्यांना नुसती खायची आणि चरायची खाती हवीत. कामाच्या नावानं बोंब! आता कुठून आणू येवढी खाती? बरं नाही म्हणाव तर उद्या मंत्री मंडळ गडगडायचे ! पार गोची झालीय !

कपडे दऊन धूतवर्मा परत आला. त्यान गाढवांना खायला दिले आणि मोकळे सोडले. मोकळे सोडताच ती चौकड़ी उच्चरवाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पिकनिक स्पॉटवर म्हणजे कचराकुंडीकडे चरायला आणि खायला निघाली.

पुढे उच्चरवा, मागे लंबकर्ण, दीर्घपुच्छ आणि शेवटी लघुपुच्छ असे ते क्रमाने उभे राहिले. उच्चरवाने आपल्या दर्दभरी आवाजात एकदा तोंडवर करून, ही हाँ ही हाँ! ही हाँ! ही हाँ!! असा आवाज दिला आणि मागून इतरांनी त्याला साथ देताच ते चौखुर उधळत पिकनिक स्पॉटवर पोहोचले!

आटपार नगरात अशा पिकनिक स्पॉटची बिलकुल कमतरता नव्हती.

पिकनिक स्पॉटवर पोहोचताच त्यांनी सिलेक्टेड मालावर ताव मारायला सुरुवात केली.

उच्चरवा, दुपारी मुख्य मंत्र्यांच्या बंगल्यावर ते आणि बाईसाहेब काय म्हणत होते एकलेस ना?” लंबकर्ण.

“हो पण त्याच आपल्याला काय देणं घेणं? ”

“अरे ते म्हणाले नाही का की मंत्री मंडळात घ्या म्हणून गर्दी करणारे सगळे गाढव आहेत?

हो पण तशी म्हणायची पद्धतच आहे.”

ही आपली बदनामी नाही का?

असू दे उगाच नसत्या भानगडीत नाक खुपसू नकोस, “ठीक आहे. अरे पण ते आणखी काय म्हणाले आठवते का?

“काय म्हणाले?

“ते म्हणाले या सर्वांना काम करायला नको पण नुसती खायची आणि चरायची खाती तेव्हढी हवी खरे, पण त्याचा खाती तेवढी हवी!

हो म्हणाले खरे, पण त्याचा आपल्याला काय फायदा?

अरे आपण गाढव तर आहोतच शिवाय आपण रगड काम करतो आणि खाणं आणि चरण्यातही आपण काही कमी नाही.

‘हो तू म्हणतोस ने खरे आहे. मग तुझे काय म्हणणे आहे?

अरे मग आपण जर मालकांना सांगून मु.मंत्र्यांची भेट घेतली तर?

मुख्य मंत्र्यांची भेट? ती कशाला?

अरे आपल्यालाही मंत्री करा म्हणून विनंती करायला?

“काय गाढवपणा लावलाहेस? अरे आपल्याला कोण मंत्री पद देणार?

“अरे आपल्याला कोणतेही खाते नसलेतरी चालेल. बिन स्वात्याचे मंत्रीपद दिले तरीही चालेल. आपण आपले खायचे आणि चरायचे तेवढे सांभाळू.

‘हां हे बरोबर वाटते. म्हणजे मुख्यमंत्र्यांना आज जी खातेवाटपाची आणि नव नवीन खाती निर्माण करायची डोके दुखी झाली आहे ती तरी मिटेल.” दीर्घपुच्छाने सहमती दर्शविली.

मालकांना सांगून त्यांनी मु. मंत्र्यांची भेट घेतली.

त्यांचा प्रस्ताव मुख्य मंत्र्यांना फारच पसंत पडला.

त्यांचा सल्ला त्यांनी मानला परंतु प्रत्यक्ष गाढवांची वर्णी न लावता सर्व इच्छुक गाढव उमेदवारांची बिन खात्याचे मंत्री म्हणून नेमणूक करून टाकली !

आटपाट नगरात आता सगळा आनंदी आनंद आहे.

जातिवंत गाढवं तर धंदा वाढला म्हणून खूष आहेतच पण बिन कामाचे खाते मिळाले म्हणून गाढव मंत्रीही खूष आहेत.

एका गाढवाने आटपाट नगरामधे जो क्रांतिकारी मार्ग दाखवला त्याचे उदाहरण इतर नगरात, राज्यातही यथावकाश अनुसरले जाऊ लागले झपाटयाने पसरले.

या पूर्वी राजकारण्यत पक्षांतर न म्हणता घोडेबाजार म्हणत असत त्याला आता ‘गाढव बाजार’ असे नामकरण झाले आहे.

विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..