नवीन लेखन...

गाढवांची कहाणी

आधुनिक गाढवांचे म्हणजे माणसाळलेल्या गाढवांचे पुरातन काळातले फारसे पुरावे उपलब्ध नाहीत. पुराव्यांच्या अपुरेपणामुळे, त्यापासून काढल्या गेलेल्या निष्कर्षांत संदिग्धता आहे. इजिप्तमध्ये ओमारी येथे सापडलेले सुमारे सात हजार वर्षांपूर्वींचे गाढवांचे अवशेष, तसंच इजिप्तमध्येच माडी येथे सापडलेले साडेपाच हजार वर्षांपूर्वीचे गाढवांचे अवशेष, गाढवांच्या शरीराचा आकार या काळात लहान झाल्याचं दर्शवतात. काही संशोधकांच्या मते, हा बदल गाढवं माणसाळायला लागल्यामुळे झाला असावा. तसंच लिबियात तयार केल्या गेलेल्या, पाच हजार वर्षांपूर्वीच्या एका कोरीव चित्रात काही माणसाळलेले प्राणी चालताना दाखवले आहेत. यांत काही गाढवंही चालत असल्याचं दिसून आलं आहे. हे चित्र त्या काळातली लिबियातली गाढवं माणसाळली असल्याचं दर्शवतं. येमेनमध्ये सापडलेल्या काही अवशेषांवरून, तिथली गाढवं साडेआठ हजार वर्षांपूर्वीच माणसाळली असल्याची शक्यता काही संशोधकांनी व्यक्त केली आहे. मेसोपोटेमिआमध्येसुद्धा (आजचा इराक) पाच ते सहा हजार वर्षांपूर्वीचे असेच पुरावे सापडले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर, गाढवं प्रथम कधी आणि कुठे माणसाळली ह्याबद्दल संभ्रम दिसून येतो. किंबहुना काही संशोधकांच्या मते, ती एकाहून अधिक ठिकाणी स्वतंत्रपणे माणसाळवली गेली असावीत. एव्हेलिन टॉड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनामुळे, आधुनिक गाढवांच्या उगमाबद्दलची अनिश्चितता काही प्रमाणात कमी झाली आहे. एव्हेलिन टॉड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन गाढवांच्या जनुकीय आराखड्यांवर आधारलेलं आहे.

एव्हेलिन टॉड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनांत, जगभरातील एकूण ३७ प्रयोगशाळांत उपलब्ध झालेले, गाढवांचे जनुकीय आराखडे अभ्यासले. यांत आफ्रिका, आशिया, युरोप, दक्षिण अमेरीका, या खंडांतील एकूण ३१ देशांतून गोळा केलेल्या, २३८ जनुकीय आराखड्यांचा समावेश होता. यांतले २०७ जनुकीय आराखडे हे आज अस्तित्वात असणाऱ्या गाढवांचे होते आणि ३१ जनुकीय आराखडे प्राचीन काळातल्या (काही हजार वर्षांपूर्वीपर्यंतच्या) गाढवांचे होते. याचबरोबर या संशोधकांनी आपल्या संशोधनात तुलनेसाठी, आजच्या काळातील १५ जंगली गाढवांच्या जनुकीय आराखड्यांचाही वापर केला. या संशोधकांनी, प्राचीन गाढवांच्या जनुकीय आराखड्यांत ठिकाणानुसार होत गेलेले बदल अभ्यासले. तसंच त्यांनी प्रत्येक जनुकीय आराखडा कोणकोणत्या काळातल्या गाढवाचा आहे, हे लक्षात घेतलं. या सर्व जनुकीय आराखड्यांची आजच्या गाढवांच्या जनुकीय आराखड्यांशी सांगड घातली. जनुकीय आराखड्यांत झालेले स्थानानुरूप आणि काळानुरूप बदल लक्षात घेऊन, या संशोधकांना आधुनिक गाढवांच्या प्रवासाचा अंदाज बांधणं शक्य झालं.

एव्हेलिन टॉड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार, आधुनिक गाढवं ही पूर्व आफ्रिकेतल्या (आजच्या) इथिओपिआ, सोमालिआ आणि केनया या, एकमेकांना चिकटून असलेल्या देशांतून इतरत्र पसरली असावीत. पूर्व आफ्रिकेतली ही आधुनिक गाढवांची निर्मिती सात हजार वर्षांपूर्वी झाली असल्याचं या संशोधकांना आढळलं आहे. या शोधामुळे आधुनिक गाढवांची निर्मिती वेगवगेळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या काळात झाली असल्याच्या चर्चेला विराम मिळाला आहे. शक्य आहे की, पूर्व आफ्रिकेतील या प्रदेशातल्या गुराख्यांच्या प्रयत्नांतून जंगली गाढवं माणसाळवली गेली असतील. या संशोधकांच्या मते हीच माणसाळलेली गाढव नंतर विविध कारणांनी जगभर पसरली. आज आढळणारी सगळी आधुनिक गाढवं ही याच गाढवांची वंशज आहेत. आधुनिक गाढवं निर्माण होण्याचा म्हणजेच जंगली गाढवं माणसाळवली जाण्याचा काळ हा, घोडे माणसाळवले जाण्याच्या किमान तीन हजार वर्षं अगोदरचा ठरला आहे.

पूर्व आफ्रिकेत माणसाळलेल्या या गाढवांपैकी, काही गाढवं ही आफ्रिकेच्या वरच्या बाजूच्या सुदान, इजिप्त या देशांत नेली गेली असावीत, तर काही गाढवं पश्चिम आफ्रिकेतल्या नायजेरिआ, घाना, मॉरिटेनिआ, सेनेगल, या देशांत नेली गेली. सुदान, इजिप्तकडे नेलेली गाढवं कालांतरानं तांबड्या समुद्राद्वारे वा सिनाईच्या द्वीपकल्पातून आशियात नेली गेली असावीत. तिथून ती मध्य आशियातल्या इराण आणि तुर्कमेनिस्तानमार्गे पुढे चीन आणि मंगोलिआत पोचली असावीत. आफ्रिकेच्या पश्चिमेकडील भागात गेलेली गाढवं ही कालांतरानं युरोपात पोचली असावीत. युरोपमध्ये गेलेली गाढवं ही मॅसेडोनिआ, क्रोशिआ, या देशांद्वारे पश्चिमेकडील डेन्मार्ककडे व त्यानंतर आयर्लंडमध्ये नेली गेली. या स्थलांतरामुळे सुमारे तीन ते चार हजार वर्षांपूर्वी आशियातल्या गाढवांना स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालं, तर सुमारे अडीच हजार वर्षांच्या अगोदरच युरोपमधील गाढवांना स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालं. काही शतकांपूर्वी युरोपमधली गाढवं दक्षिण अमेरिकेत वसाहती करणाऱ्या स्पेन-पोर्तुगालमधील लोकांद्वारे ब्राझिलसारख्या लॅटीन अमेरिकन देशांतही पोचली.

एव्हेलिन टॉड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला, आधुनिक गाढवांचा इतिहास शोधण्याचा हा प्रयत्न लक्षवेधी ठरला आहे. मात्र या संशोधनानंतरही एका प्रश्नाचं उत्तर मिळणं अजून बाकी राहिलं आहे. जगभरच्या सर्व आधुनिक गाढवांचे मार्ग पूर्व आफ्रिकेतून सुरू झाल्यामुळे, या गाढवांची निर्मिती पूर्व आफ्रिकेत झाल्याचा निष्कर्ष काढला गेला. प्रत्यक्षात असंच असण्याची शक्यताही मोठी आहे. तरीही, ही आधुनिक गाढवं यांच प्रदेशांत निर्माण झाली आहेत, की तिथेही ती दुसरीकडून कुठून आली आहेत, या प्रश्नाचं उत्तर अधिक स्पष्टपणे मिळायला हवं. त्यासाठी जुन्या काळातल्या गाढवांचे अजून काही अवशेष मिळायला हवेत. या प्रश्नाचं निश्चित उत्तर मिळाल्यानंतरच आधुनिक गाढवांच्या संपूर्ण प्रवासाचं चित्र आपल्यासमोर उभं राहिलेलं असेल.

— डॉ. राजीव चिटणीस.

-छायाचित्र सौजन्य : अभयारण्य (ब्रिटन)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..