नवीन लेखन...

गदीमा उर्फ ग.दि.माडगूळकर

गदीमांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला. गदीमांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी आणि पहिला पाळणा ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली.

त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन ह्या नावाने संग्रहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही तीन चित्रकथा ही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली आहे. युद्धाच्या सावल्या ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली.

मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. गदीमा हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्यांच्या चित्रपटकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी होत्या. गदिमांनी तब्बल १५८ मराठी चित्रपटांसाठी कथालेखन केले, यातील अनेक चित्रपटांच्या कथा-पटकथा व संवादही त्यांच्याच लेखणीतून उतरले. मात्र त्यांचा संचार केवळ मराठी चित्रसृष्टीतच नव्हता, तर हिंदीतही त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यांच्या कथेवर सुमारे २५ हिंदी सिनेमांची निर्मिती झाली असून त्यात ‘तुफान और दिया’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘आदमी सडक का’ आदींचा समावेश आहे. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’ची मूळ कथाही गदिमांचीच होती, तर राजेश खन्नाचा ‘अवतार’ व अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही गदीमा यांचीच.

गदिमांचा उल्लेख कोणी महाकवी असा केला, की ते गमतीने म्हणत असत- अहो, मी महाकवी नाही, महाकाय कवी आहे! त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला. १९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते; तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सदस्य होते.

ग.दि.माडगूळकर यांचे १४ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकिपीडिया
संदर्भ.शशांक गिरडकर /gadima.com

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..