नवीन लेखन...

गहिरे डोळे

एखाद्या सिनेअभिनेत्रीचे नाक सुंदर चाफेकळी असते तर एखादीचे ओठ, आकर्षक असे धनुष्याकृती असतात.. मात्र गहिरे भावपूर्ण डोळे असलेली एकमेव अभिनेत्री आहे, जिचे डोळे पाहिले की, आपण त्यात डुबून जातो..

राखी. राखी गुलजार हे तिचं नाव! आज १५ आॅगस्ट २१, म्हणजेच ७४ वर्षांपूर्वी स्वातंत्र्यदिनीच तिचा जन्म झाला. वयाच्या सतराव्या वर्षी घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. ते दोन वर्षही टिकलं नाही. तिने १९६७ साली एका बंगाली चित्रपटात पहिलं काम केलं. ‘रेश्मा और शेरा’ मध्ये तिला हिंदी चित्रपटाची पहिली संधी मिळाली. तो प्रदर्शित होण्याआधीच तिच्या धर्मेंद्र सोबतच्या ‘जीवन मृत्यु’ चित्रपटाने, चित्ररसिकांशी तिची ओळख झाली…

मी हा चित्रपट ‘प्रभात’ मध्ये मॅटिनीला लागलेला असताना पाहिला.. त्यातील ‘झिलमिल सितारों का आंगन होगा..’ हे गाणं फार आवडलं… आणि त्यानंतर येणारे, राखीचे चित्रपट मी आवर्जून पाहू लागलो..

शशी कपूर बरोबरचा तिचा ‘शर्मिली’ विजयमध्ये पाहिला. त्यात तिचा डबल रोल होता. एक शांत स्वभावाची कंचन तर दुसरी अवखळ, चुलबुली कामिनी. यातील सर्व गाणी, अप्रतिमच होती.

त्यानंतर तिचा संजीव कुमार हिरो असलेला, ‘पारस’ चित्रपट पाहिला. या चित्रपटात संजीव कुमार साधासुधा गांधीवादी माणूस असतो तर ही शहरातील फॅशनेबल तरुणी. या चित्रपटातील एक गाणे, पुण्यातील पेशवे पार्कमध्ये शूट केले होते..

मी देव आनंदचा फॅन असल्याने ‘हिरा पन्ना’, ‘बनारसी बाबू’ या चित्रपटांतून तिला देव आनंद सोबत पाहिले..

‘दाग’ चित्रपटात, समोर अनुभवी राजेश खन्ना व शर्मिला टागोर असूनही तिने तिची भूमिका अप्रतिम साकारली..

‘ब्लॅक मेल’ या विजय आनंद दिग्दर्शित चित्रपटात तिने धर्मेंद्र व शत्रुघ्न सिन्हा सोबत काम केले. यातील ‘पल पल दिल के पास, तुम रहती हो..’ हे किशोरच्या आवाजातील गाणं खरंच ‘अजरामर’ आहे…

त्यानंतर तिला पाहिलं, ‘कभी कभी’ चित्रपटात.. इथून तिचे अमिताभ बच्चनसोबतचे चित्रपट सुरु झाले.. ‘कभी कभी’ मधील सर्व गाणी त्या चित्रपटाचा ‘प्राण’ आहेत..

मुंबईला पहिल्यांदाच गेल्यावर ‘दुसरा आदमी’ पाहिला.. त्यात ती आपल्या सहकाऱ्यामध्ये, गेलेल्या पतीला पहात असते.. पतीच्या मित्राने तिला समजावून सांगूनही ती आपला विचार बदलत नाही… रमेश तलवार दिग्दर्शित, या चित्रपटातील गाणी ऐकल्यावर मी पुन्हा भूतकाळात जातो..

‘त्रिशूल’ मधील तिची गीताची भूमिका अविस्मरणीय आहे.. संजीव कुमारला धडा शिकविण्यासाठी अमिताभ बच्चन, त्याच्या टेंडरपेक्षा एक रुपयाने कमी असलेले टेंडर प्रत्येकवेळी भरत राहतो व त्याला बरबाद करतो.. या कामात राखी त्याला मदत करीत असते.. अतिशय हुशार, अशी आॅफिस असिस्टंट असलेल्या राखीची ती भूमिका अजूनही लक्षात आहे… तशी कोणी हुशार स्त्री दिसली की, राखीची ‘गीता’ आठवते..

‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपट मी अनेकदा पाहिलाय.. ती, अमिताभ आणि विनोद यांचा प्रेमाचा त्रिकोण असलेल्या या कथेने रौप्यमहोत्सवी यश प्राप्त केले. यातील ‘दिल तो है दिल, दिल का एतबार…’ या तिच्या गाण्यावर विनोद खन्नाच नव्हे तर प्रेक्षकही फिदा झाले…

त्यानंतर तिला बऱ्याच कालावधीनंतर पाहिलं, ते ‘राम लखन’च्या आईच्या भूमिकेत… ती शोभली देखील छान! पुन्हा ती ‘करण अर्जुन’ची आई झाली. व त्यांच्याकडून ठाकूरजीचा तिने बदला घेतला.. मग तिच्या ‘अनाडी’, ‘बाजीगर’, ‘खलनायक’, ‘बाॅर्डर’, ‘बादशहा’, ‘सोल्जर’, इ. मधील आईच्या भूमिका चालू राहिल्या..

२००३ नंतर तिनं चित्रपटात काम करणं थांबवलं. तरीदेखील ती सुमारे तेहतीस वर्षे अभिनय करीत राहिली. १९७५ साली तिने गुलजार यांच्याशी लग्न केल्यानंतर, जर गुलजार यांच्या सांगण्यावरून चित्रपटात काम करणं बंद केलं असतं तर, तिचं करीयर तिथंच संपलं असतं… मात्र ती अशी पारतंत्र्यात राहणारी नव्हती, म्हणून तिने वेगळे राहून अभिनयाला प्राधान्य दिले.

तिची मुलगी मेघना गुलजार ही वडिलांसारखीच हुशार दिग्दर्शिका झालेली आहे. तिने काही यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे.

राखीला फिल्मफेअरचे तीन पुरस्कार मिळाले आहेत. एका बंगाली चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय ‘पद्मश्री’ पुरस्काराने तिला सन्मानीत करण्यात आलेलं आहे.

आज ती अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना समाधानाचं निवृत्ती जीवन जगते आहे.. सध्या तिचा बहुतांशी मुक्काम पनवेलमधील फार्म हाऊसवर असतो..

प्रत्येक अभिनेत्रीचा तिच्या कारकिर्दीतील एकतरी सर्वोत्तम चित्रपट असतोच.. तसा राखीचा मला अत्यंत आवडलेला एक कृष्णधवल चित्रपट आहे, तो म्हणजे ‘२७ डाऊन’! १९७४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील तिची शालिनीची भूमिका अविस्मरणीय अशीच आहे.. यु ट्युबवर हा चित्रपट उपलब्ध आहे, आपण वेळ काढून अवश्य पहा…

मग आपणासही वाटेल, या गहिऱ्या डोळ्यांत डुबून जावं…

© सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

१५-८-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..