दिवाळी जवळ आली रे आली की रामजी शेठजींचा मूड एकदम बिघडायचा. एक माणूस म्हणून ते चांगले होते पण पदरचा पैसा गेला की त्यांचा जीव कासावीस होत असे. गणपती उत्सवाला शेकड्यांनी वर्गणी द्यायला लागायची. मग लगेच नवरात्र. ते झाले की दिवाळी अंकासाठी जाहिराती द्याव्या लागत. कधी अर्धपान, कधी पूर्णपान, कधी मुखपृष्ठ तर कधी मलपृष्ठ. मार्केटमध्ये रहायचं तर या गोष्टी गरजेच्याच होत्या. आताच एकजण रंगीत पानाची जाहिरात घेऊन गेला आणि शेठजींनी फर्मान सोडलं, ‘आता जर या वेळेला माझ्याकडे कोणी आले तर मी घरात नाही असं स्पष्ट सांगून द्या.’
हे वाक्य शेठजींनी म्हणायला आणि ‘राम राम शेठजी’ अशी हांक समोरून कानी पडायला एकच गांठ पडली. चेहऱ्यावर खोटं हसू आणत ‘या, याऽऽ’ म्हणत शेठजींनी हात जोडले आणि स्वतः झोपाळ्यावर बसले. समोरच खाली गालिचा सोडून फरशीवर सगळे बसले. शेठजींच्या डोक्यात दिवाळीचा खर्च आणि सर्व नोकरांना पगार आणि महिन्याचा पगार बोनस म्हणून याचे किती हजार होतील हा विचार करता करताच त्यांनी थेट विचारले,
‘काय मं कुठून आलात?’
‘आम्ही जव्हार जवळच्या पाड्यावरून आलो.’
पांचएकशे लोक तिथं असतो. मी ‘सखा’. १० वी पास आहे. आता तिथंच समाजकार्य करतो.
कसंतरी इथपर्यंत शिकलो. आता इथल्या मुलांना स्वावलंबनानं जगायला शिकवायचंय.’
‘आता काय मागायला आलात ते सांगा.
ते ५-७ आदिवासी एकमेकाकडं टकामका बघायला लागले. गोंधळून गेले. आल्यावर पाणी पण न विचारता सरळ काय मागायला आलात? हे विचारणे अपमान होता पण गरिबाने ‘कां?’ हा प्रश्न विचारायचाच नसतो नां?
शेठजींना काय वाटले कोणास ठाऊक पण जाणवले की आपण कुठंतरी चुकलोय. कारण प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर त्यांना एक प्रकारचा निग्रह दिसला जो गरिबीला मागे सारून पुढे आलेला दिसत होता.
नकळत का होईना पण झालेला अपमान विसरून सुखा म्हणाला,
‘शेठजी, ताकाला जाऊन भांडं मी लपवत नाही. आधी सांगतो काय हवंय आणि मग सांगतो का हवंय ते!’
एक दोन सायकली तुम्ही आमच्या आदिवासी केंद्राला द्याव्यात. म्हणून आलो. तुमच्याबद्दल बरंच ऐकून आलो आहोत. आणि आता कां? ते सांगतो. जव्हारच्या पुढे ‘मौजेच्या पाड्यावर’ आम्ही रहातो. नीट शाळा नाही. दवाखाना, डॉक्टर तर फार लांबच राहिले. दुकानं मोठी नाहीत, ५-७ मैल तांगडतोड केल्याशिवाय काही मिळत नाही. झोपडी पुढच्या-मागच्या जागेत काही लावतो आणि पोटापुरतं काहीतरी खातो. कपडा म्हणावा तर दोन बायकांत एक धड लुगडं अशी स्थिती. डॉक्टरला बोलवायला जायलाच तास-दोन तास लागतात.
परवाच या बुधाच्या मुलाला डायरिया झाला. दवाखान्यांत अॅडमिट करायचे तर पोराला नेणार कसं? तर दर २ मैलावर एक माणूस उभा केला. जवळ जवळ पळतच हातातनं पोर नेऊन पुढच्या माणसाकडं द्यायचं. रिले रेस लागली होती. कारण एकटा माणूस आणि त्याची आई १० मैल पळणार कशी? शेठजी, शेवटी ते पोर वाटेतच गचकलं.’ हे ऐकताना बुधा अंगावरच्या ते फाटक्या पंचान डोळे पुसत होता. त्याच्या पाठीवर हात ठेवून सुखा म्हणाला,
‘कळलं कां? सायकल असती तर डबल सीट नेलं असतं.’ या बोलण्यानं वातावरण सुन्न झालं पण शेठजी स्पष्टपणे म्हणाले,
‘जगात लाखो लोक तुमच्यासारखे आहेत. हा रामजीशेठ किती जणांना पुरे पडणार? निदान आत्ता तरी मला काही देणं शक्य नाही.’
हे वाक्य ऐकता क्षणी सुखा ताडकन् उठला. एकाही अक्षराने अजिजी केली नाही. मनात राग होता पण चेहरा शांऽऽत होता. बाकीची मंडळी पण उठली. एकजण म्हणाला, ‘सुखा, तू जागा चुकीची निवडली बघ.
‘ काम करणाऱ्या माणसांना आणि ‘नाही रे’ लोकांना हे ‘आहे रे’ लोक असंच बोलतात. आता कुठेच मागणी नाही. दोन महिन्यात पैसे उभे करू. काळजी करू नका.
‘पण करायचं काय?’ बुधानं विचारलं. ‘मी सांगतो पण आधी इथून बाहेर पडा.’ सुखा म्हणाला. त्याने मागे वळूनही पाहिलं नाही. एकाही शब्दाची याचना न करता या लोकांनी माघारी फिरणं म्हणजे शेठजींच्या अहंकाराच्या फुग्याला लागलेली टांचणी होती. आता वेळ निघून गेली. शेठजींच्या अस्वस्थपणात भरच पडली. त्यांत आतून सीताभाभी म्हणत होती,
‘अहो, सोनीला एक ताप आहे. कालपासून कमी आला नाहीये. तिला रिक्षेनं घेऊन जाते आहे पण ती तयार नाही. मला कारमधूनच जायचे आहे म्हणून रडतेय. आज ड्रायव्हर नाही. तुम्हालाच यावे लागेल. आता तिच्या मनाविरुद्ध रिक्षेनं नको जायला.
सोनी, लाडकी लेक शेठजींची. त्यांनी लगेचच गाडी काढली आणि स्पेशलिस्टकडे घेऊन गेले. डॉक्टरनी बघितलं. इंजेक्शन औषधे दिली. ‘व्हायरल इन्फेक्शन आहे. काळजी करू नका’ म्हणून सांगितले. दोघांचा जीव भांड्यात पडला. घरी आले. सोनी झोपली. शेठजीपण दोन घास खाऊन झोपायला गेले. त्यांच्या मनात कुठंतरी माणुसकीचा गहिवर होता. बुधाचा मुलगा वाहन नाही म्हणून गेला. मी मुलीला कारने दवाखान्यात घेऊन गेलो. गणित कुठंतरी चुकतंय. एकदा जव्हारला जाऊन यायला हवं. एरवी किती मदत करतो आपण ! आपल्याविषयी काय म्हणत असतील ते !
सुखा सवंगड्यांना घेऊन एस. टी. स्टॅण्डवर आला. सगळे मिळून चहा घेत होते. बुधा म्हणाला, ‘सुखा तू रं कां इतका गप झालास. आपली खेप फुकट गेली म्हून कां?’ ‘तसं नाही रे ! माझ्या डोसक्यात वेगळाच विचार चाललाय! आजपर्यंत आपण इतरांची मदत घेतली पण सारा वेळ लोकाच्या मदतीवर विसंबून नाही राहत येणार. आपलं आपल्याला हातपाय हलविलं पायजेत. मोदीजी पण म्हणतात नां ‘आत्मनिर्भर भारत’ त्याची सुरुवात ‘आदिवासी मौजेचा पाडा आत्मनिर्भर’ करूया. मी उलट शेठजींचे आभार मानतो. आपल्यासाठी यशाचे दरवाजे उघडे केले त्यांनी. अरे बायासारख्या बाया डरत नाहीत मग आपण तर पुरुष आहोत. आपला नवरा हॉस्पिटलात, तपासण्या करायला पैसे नाहीत तर त्याची बायको पेपरात पळण्याच्या शर्यतीची जाहिरात वाचते. सातवी पास होती म्हणून हे झालं. तिच्याकडं बूट नाहीत, खेळाचे कपडे नाहीत. डोस्कीवरचा पदर खोचलान आणि बिनचपलाची तिथं गेली. लोक हसले पण नियमाप्रमाणं तिला विचारात घ्यावं लागलं. बिन चपलाची, साडी नेसून ३ कि.मी. पळाली. डोळ्यापुढं नवऱ्याच्या तपासण्या दिसत होत्या. पहिली आली. ५०००/- रुपये मिळाले. ही खरी गोष्ट हाय. कल्पनेतली नाही. तिच्या जिद्दीनं तिला यश दिलं. दुसरं, नवरा मेल्यावर कोल्हापूर जवळच्या शेवंताबाईनं नवऱ्याचं केशकर्तनालय स्वतः चालवायला सुरुवात पदरात ३ पोरी. लोकं हसली. प्रथम कुणी येईना. हिला शिक्षण नाही. पण हळू हळू बारकी पोरं यायला लागली. मग बापे लोक आले. कमाईवर पोरीचं लगीन केलं मग जावई दुकान बघू लागला. मग आपल्याला दोन सायकली जड हायत का? ल सगळ्यांचे चेहेरे फुलले. ह्यांनी योजना ठरवली. हसत हसत पाड्यावर आले. आपापल्या कामांत गुंतले. असेच सहा महिने गेले.
इकडे रामजीशेठनाही विसर पडला आणि अचानक त्यांना मौजेवाडीच्या पाड्यावरून आमंत्रण आलं. आमच्यासाठी एक दिवस काढा म्हणून विनवलं. शेठजींना जायचंच होतं. त्यानी होकार दिला आणि ठरलेल्या दिवशी गाडी ड्रायव्हर घेऊन मौजेच्या पाड्याकडं निघाले. जव्हारपासून १० किलोमीटरचा रस्ता अगदी खराब, खडकाळ, वेडावाकडा कच्चा रस्ता गाडीतही धक्के बसत होते. वाटेत एक विवाहाचं चित्र दिसलं पण ना रेकॉर्डस्, ना सळसळणारे पदर, ना दागिन्यांचा बडेजाव पण साऱ्यांचे चेहेरे फुललेले होते. वधूला ना हेअर ड्रेसर ना मेकप. मुखावरची लज्जा आणि गळ्यातले काळी मणी हेच अलंकार. लग्न संध्याकाळी होतं पण आता साऱ्यांना एकत्र करून ‘सुखा’च त्यांना समुपदेशन करत होता. सारे अल्पशिक्षित नाहीतर अंगठाबहाद्दर. नागलीची शेती करणारे, बाहेरच्या जगाशी संबंध नाही अशा स्थितीत लग्नानंतर आणि नेहमी व्यसनापासून दूर कसे रहायचे? शरीराची नासाडी व्यसनाने कशी होते त्याची मोठी चित्रे दाखवत होता. बायकोला मान कसा द्यायचा? अंगावर हात टाकायचा नाही. तुमच्या पिठाबरोबर बाई मीठ कसं मिळवेल? या सर्वाची माहिती फार छान देत होता. प्रौढ आणि रात्रशाळा इथं सुरू होणार आहे हे पण सांगितल आणि जोडीला कुटुंब नियोजनाचं महत्व सांगायला विसरला नाही. हे एकचित्तानं ऐकत असता गाडीवाला शेठ ही ओळख शेठजीना दूर ठेवायची होती म्हणून लांबवर गाडी लावून ते गर्दीत मागे येऊन उभे राहिले.
‘आपल्या सायकलींच उद्घाटन बी आहे ना?’एकानं विचारलं. ‘होय. शेठजी येतीलच. त्यांना पण आपण सांगू की पैसा कसा उभा केला. या सायकली गावाच्या मालकीच्या. कुणा एकाच्या नाहीत कारण मिळवलेले पैसे प्रत्येकजण माझ्या जवळ असलेल्या डब्यात साठवत होता. बायकांना मी पापडाचं पीठ आणून देत होतो. बायका पापड लाटून द्यायच्या. मी ते पोचवत होतो. मिळालेले पैसे बायकांनी घेतले नाहीत. डब्यात टाकले. शहरातून येताना जुने कपडे-साड्या आणत होतो. सुंदर नक्षीकाम करत गोधड्या बायका शिवून देत होत्या. त्याचे पैसे मिळालेले कुणी घेतले नाहीत. आपले उत्तम पोहणारे पटू, त्यांना ओळखीनं मी दोन महिने शहरात ठेवलं. कमी पैसे घेऊन त्यांनी वीसेक मुलांना पोहायला शिकवलं. छोटी मोठी कामं करून पैसे मिळवून पोट भरलं. हे सगळं ‘एकीच बळ’ आहे. कुणी किती कमावले? याला महत्त्व नाही. माझ्या समाजासाठी केलं याचा आनंद आणि माझ्यावर विश्वास ठेवलात मी धन्यवाद देतो. आता आपण काहीपण करू शकतो. आपल्याला बँक कर्जही देईल. त्यांना दाखवायला आपण काही करून दाखवलंय. आता शेठजी येतील.’
‘मी आलोय.’ शेठजी मोठ्यानं ओरडले. ‘सुखा’ च्या आनंदाला पारावार नव्हता.
‘कुठं होतात? कसे आलात? केव्हा?
‘थांब. थांब., लग्नाच्या तिथेच मागे गाडी लावली. चालत आलो. मला कोण ओळखणार? तुझं समुपदेशन पण ऐकलं. खूप आनंद झाला. सायकली कशा मिळवल्यात तेही कळलं. आता जव्हारला जाणं सोपं पडेल आणि मी जाहीर करतो की आज मी सायकली द्यायला म्हणून आलो होतो पण माझी गाडीच मी या मौजेपाड्याला भेट देऊन जातोय. शहरांत कुणालाही अडीअडचणीला नेता येईल. मला बाकी काहीच बोलायचे नाही. आजपासून ‘मौजेपाडा’ माझा, म्हणून शेठजी ड्रायव्हर सह माघारी जव्हारकडं चालत जाताना सर्वांनी पाहिलं आणि साऱ्यांचे डोळे पाणावले.
सुखाचे जमिनीवर पडलेले अश्रू धरतीने कृतज्ञतेने टिपले. मौजेपाड्याला आज एक माणुसकीचा गहिवर मिळाला होता.
-माधुरी घारपुरे
९८१९०३५७१२
(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंका मधून)
Leave a Reply