लेखिका : भावना गवळी (खासदार) – अद्वैत फिचर्स – पुनर्प्रकाशित
वडिलांबरोबर राजकारणाचे धडे गिरवायला मिळाले तरी आज खासदार म्हणून स्वतंत्रपणे वाटचाल करावी लागत आहे. सर्वात तरुण खासदार म्हणून नावलौकीक मिळाला असला तरी वाढत्या जबाबदारींची जाणींवही होती. हीं जबाबदारी पेलताना पक्षातील कार्वकर्त्यांबरोबरच अन्य पक्षातील सदस्यांची मोलाची साथ लाभली. त्यामुळे गल्लीतून सुरू झालेली दिल्लीची वाटचाल उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने सफल राहिली आहे.
१९९९ मध्ये खासदार म्हणून निवडून आल्यानंतर माझ्यासाठी सारे काही नवीन होते. कारण जिल्हा परिषद सदस्य म्हणून किंवा आमदार म्हणून निवडून येण्याचे अनुभव पाठिशी नव्हता. परंतु खासदारपदाची नैतिक जबाबदारी पाठीवर घेऊन दिल्लीत आल्यावर पक्षाचे अन्य सदस्य तसेच इतर ज्येष्ठ राजकारण्यांची मोलाची साथ लाभली. नव्याने निवडून येणाऱ्या सदस्यांसाठी दिल्लीत विशेष प्रशिक्षणवर्गाचे आयोजन केले जाते. त्याचाही बर्यापैकी लाभ झाला. याशिवाय कामकाजात प्रत्यक्ष सहभागी होताना वेळोवेळी मिळालेली माहिती अधिक महत्त्वपूर्ण ठरली. खासदार म्हणून शपथ घेताना अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना अगदी जवळून पाहता आले. त्यांच्याशी संवाद साधता आला ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट होती. त्याचबरोबर वाढती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल याचीही जाणीव होती. आजवरच्या खासदारपदाच्या वाटचालीत सगळेच चांगले अनुभव आले. प्रामाणिकपणे काम करायला येथे अजिबात अडचणी जाणवत नाहीत याचे प्रत्यंतर आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले. केंद्रात युतीचे सरकार असतानाचा बराचसा कालावधी शिकण्यातच गेला. त्यातूनही मग मतदारसंघातील शक्य तेवढी कामे मार्गी लावली.
दिल्ली हे अतिशय सुंदर शहर आहे. ते मला आवडतेच, पण राष्ट्रपती भवनातील मुगल गार्डनमधील फुले मला अतिशय आवडतात. उपजत आवड असल्यामुळे मला ही फुले पहायला जाण्याचा वारंवार मार्ग होतो. हॉटलिंगचे फारसे वेड नसल्यामुळे दिल्लीतील एखादे विशेष आवडते हॉटेल वा पदार्थ सांगता येणे कठीण आहे. दिल्लीची लाईफस्टाईल, तेथील वातावरण आपल्यापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे खासदार म्हणून येथे आल्यानंतर व्यक्तिमत्वात बदल करावा लागतो असा सर्वसाधारण समज आहे, पण मला मात्र असे फारमोठे बदल करावे लागले नाहीत. माझी वेशभूषाही पूर्वी होती तशीच आज कायम आहे. पूर्वीपासून मी सलवार-कूर्ता वापरते. खासदार म्हणून दिल्लीत आल्यावरही तोच वेष कायम ठेवला आहे. दिल्लीत आल्यानंतर सुरुवातीस सरकारी निवासस्थान मिळणे कठीण जाते. त्यामुळे काही दिवस महाराष्ट्र सदनातच वास्तव्य करावे लागते. माझ्यावरही अशी वेळ आली, पण त्याचे फारसे काही वाटले नाही. शिवाय साऱ्यांचे सहकार्य मिळत गेल्याने खासदारपदाच्या पहिल्या टप्प्यात वेगवेगळी कामे हिरिरीने पार पाडू शकले. वेगवेगळ्या पक्षांकडून निवडून आलेल्या सदस्यांमध्ये एखाद्या मुद्यावर एकमत होणे तसे कठीण, पण महत्त्वाची बाब म्हणजे आजवर विविध महत्त्वपूर्ण मुद्यांबाबत सर्व सदस्यांमध्ये सहमती प्राप्त झाल्याची बरीच उदाहरणे माझ्या समोर आहेत. १९९९ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री नितीशकुमार यांनी प्रत्येक जिल्ह्यात कोल्ड स्टोअरेज राबवण्याची सूचना केली होती. त्याला बहुतेकांचा पाठिंबा मिळाला. शिवाय उसाच्या हमीभावाचा प्रश्न, कापसाच्या हमीभावाचा प्रश्न यासारख्या प्रश्नांवर चर्चा करताना जास्तीत जास्त सदस्य कसे पाठीशी उभे राहतील हे पाहिले. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे १९९९ मध्ये निवडून आलेली सर्वात तरुण वयातील खासदार म्हणून माझे नाव घेतले जात होते. त्यावेळी तो कौतुकाचा विषयही होता. या कौतुकाने आनंद होत असताना आपल्या कडून साऱ्यांच्या वाढत्या अपेक्षा आहेत याची जाणीवही होती.
राजकारणात मला वडिलांकडून बरेच काही शिकायला मिळाले. त्यांची पुण्याई आणि माझे प्रयत्न याच्या जोरावर निवडून आले. खासदार म्हणून प्रथम निवडून आले त्यावेळी मी अविवाहित होते. पण एक अविवाहित तरुण खासदार म्हणून दिल्लीत वावरताना फारशा अडचणी जाणवल्या नाहीत. साऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे वाटचाल सूकर झाली. आज विवाहानंतर पतीचे किंवा घरातील अन्य सदस्यांचे तितकेच सहकार्य मिळत आहे. अर्थात, खासदार म्हणून मतदारसंघात सतत होणारे दौरे, अधिवेशन काळात होणारी धावपळ यातून कुटुंबाला म्हणावा तसा वेळ देता येत नाही. याची जाणीव असूनही घरच्यांनी नेहमीच समजून घेतले आहे. आजवरच्या तुलनेत यावेळी संसदेत तरुण खासदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांवर तीव्रतेने मते मांडली जातात. समवयस्क म्हणून या साऱ्यांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. संजीव नाईक, प्रिया दत्त, अनुराग ठाकूर यासारख्या काही खासदारांचा तरुणी-तडफदार मंडळींमध्ये खासदारांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. डीटीसीच्या बैठकीत बरेच विषय चर्चेला येतात. मात्र अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांवर विविध पक्षांच्या तरुण खासदारांमध्ये एकमत झाल्याचे पहायला मिळते.
१९९९ च्या निवडणुकीत वडिलांनी बरीच यंत्रणा सांभाळली होती. पण, २००१ च्या निवडणुकीत ते नव्हते. हा माझ्यासाठी सर्वात मोठा धक्का होता. आता प्रचाराची सगळी यंत्रणा कशी हाताळायची, निवडून येण्यासाठी कसे प्रयत्न करायचे असे प्रश्न उभे होते. पण, ज्येष्ठ ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांची साथ याच्या जोरावर यातून मार्ग निघाला. वडील गेल्यामुळे आधार गमावल्याची भावना निर्माण होत होती, पण त्याच वेळी आता सारे काही आपल्यालाच सांभाळायचे आहे हे लक्षात येत होते. त्यामुळे निवडून आल्यावर तडफेने काम सुरू केले. वाशिमला रेल्वे आणली. या कामी लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी यांनी मोलाची मदत केली हे आवर्जून सांगायला हवे. यापुढील काळात वर्धा-नांदेड-यवतमाळ रेल्वेमार्गाचे काम करून घ्यायचे आहे. अर्थात, ते सहज होणार नसले तरी त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या साऱ्या कामाच्या व्यापातून सुट्टी घेऊन दोन दिवस फिरायला जावे असे वाटते. पाचगणी हे माझे त्यातल्या त्यात आवडते ठिकाण आहे, पण तिथेही नेहमी जाते असे होत नाही. पण, कार्यक्रमाच्या वा परिषदा, अभ्यासवर्ग यांच्या निमित्ताने देशाच्या विविध भागात तसेच परदेशातही दौरे होतात. नुकताच जिनिव्हाचा दौरा पार पडला. या परिषदेत बरेच काही शिकायला मिळाले. तसेच तेथे विविध देशातून आलेल्या सदस्यांसमोर भाषण करण्याची संधीही मिळाली.
मतदारसंघ पुनर्रचनेमुळे काही नवा भाग माझ्या अखत्यारीत आला आहे. वास्तविक विदर्भात सामाजिक प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत. नव्याने समाविष्ट झालेला भाग आदिवासीबहुल आहे. या भागात कुमारी मातांची समस्या मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यातल्या त्यात बांडर कवठा या भागात ही समस्या जास्त आहे. अशा तरुणींच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने ठोस योजना पुढे यावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेही आदिवासी भागातील आरोग्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्रात औषधे मिळत नाहीत अधिकारी आणि कर्मचारीवर्गही अपुरा आहे. या सार्या समस्या लक्षात घेऊन २०० कोटींचा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. अशा पद्धतीने अनेक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंतची ही वाटचाल लोककल्याणासाठी कामी आणण्याचा प्रयत्न होता. तो बऱ्यापैकी साध्य झाला आहे.
भावना गवळी
अद्वैत फिचर्स (SV10)
अद्वैत फिचर्स कडून मराठीसृष्टीसाठी आलेल्या लेखांमधून पुनर्प्रकाशित
Leave a Reply