नवीन लेखन...

गणपती बाप्पा ….. MORE या!

गणेश चतुर्थी ….. दरवर्षी येते आणि दरवर्षी मी मनाने ( ज्याला इंग्रजीमधे Ticketless Flight म्हणतात ! ) गणेश चतुर्थीला इयत्ता चौथीमधे जातो. वय वर्ष फक्त ८ पूर्ण ! गोरेगांव पूर्वेला प्रवासी संघाच्या समोर एक डोंगर आहे.तिथून माती आणलेली , माती कसली चिखलंच म्हणा ना , आणि गणपतीची मूर्ती बनवली ! चिखलाच्या मातीला साहजीकंच भेगा पडल्या ! पण आमच्या टिळक नगरमधे माझं जाम कौतुक व्हायचं बाॅ ! त्यातही आमच्या शेजारच्या सुहासच्या आई ( म्हणायला सुहासच्या , पण माझी दुसरी आईच ती ! माझं माझ्या घरात झालं नसेल इतकं कौतुक त्यांनी केलंय आयुष्यभर ! ) त्यांना कोण कोतुक !

पुढच्या वर्षीपासून टिळक नगरचा सार्वजनिक गणपती आणायचो तिथून म्हणजे गोरेगांव पश्चिमेला के.मालणकर यांचा गणपतीचा कारखाना होता आय.बी.पटेल शाळेसमोर—त्यांच्याकडून विकत माती आणायला लागलो.मूर्ती दरवर्षी सुबक बनत गेली.असं पुढे मी १२ वी पास होईतो चाललं.माझं बघून आमच्या बिल्डिंगचे मालक गजूभाई प्रधान यांच्या मुलांनी नरेन—दिनेश यांनी पण मूर्ती बनवायला सुरुवात केली.५ दिवस आरत्या वगैरे करायचो.प्राणप्रतिष्ठा वगैरे करायची असते ही अक्कलंच नव्हती तेंव्हा ! ( आताही फार काहि अक्कल आली आहे असा दावा नाहिये म्हणा! ) मग इंजिनिअरिंग पूर्ण होईतो असंच चाललं.इंजिनिअर झाल्यावर मग रिझल्ट लागला त्यावर्षी प्राणप्रतिष्ठा केली गणपतीची.आणि घरी ५ दिवसाचा गणपती आला.आणि आमच्या घरचा बाप्पा ( आमचे वडील — दादा म्हणायचो आम्हि त्यांना ! ) मात्र कायमसाठी विसर्जित झाला.

गणपती विसर्जन झाल्यावर घरी येऊन मी पांघरूणाचा बोळा करून अक्षरश: हमसाहमशी रडलोय , दरवर्षी , अगदी नेमाने ! काय त्या मातीची ओढ होती की त्या बाप्पामधे जीव गुंतला होता कुणास ठाऊक !

आता गणपती दीड दिवसांचाच झालाय….. घरी पंचधातूची मूर्ती आणलीये , CD लावून प्राणप्रतिष्ठा करतो , घरीच विसर्जन करतो.आता यावर्षी तर दोघेहि चिरंजीव घरी नाहीत , दोघेही दोन देशांत गेले उच्च शिक्षणासाठी !
गणपती म्हटलं की हे एवढं सगळं आठवतं !

आता आमचा बाप्पा नाहि , आईचे आई—बाबा नाहित , आमच्या सासूबाई नाहित , सुहासच्या आई नाहित , सीता निवास मधले सगळे शेजारी सोडून गेलेत.फक्त उमेश बोरकर , मनोज ऊर्फ गोट्या आणि मालकाचे नरेन—दिनेश आहेत.बिल्डिंगमधे शिरतानाच गलबल्यासारखं होतं.डोळे भरून येतात.मन आणि पाय आपोआप आमच्या घराआधी सुहासच्या आईच्या घराकडे वळतात , पण त्या असताना कायम सताड उघडं असलेलं दार आता बंद असतं.शेंडेकाका दुसरीकडे असतात.सुरेखा शानभाग दुसरीकडे असते.घुले काकू तिसरिकडे असतात.मजल्यावर फक्त हेमलची आईच बोलणारी राहिली आहे….. नवरे गुरुजी पण आता नाहित.पम्या ऊर्फ प्रमोद दुसरीकडे , दादा दुसरीकडे , बेबी तिसरीकडे ….. डोळे भरुन येतात आणि सतत नवनवीन काहितरी वस्तू बनवणार्‍या या देहाचे — उदयचे , चेस चॅम्पियन म्हणून आणि एकूणंच सगळंच कौतुक करणारी माणसं डोळे शोधत रहातात …..

तरीही उत्साहाने गणेशोत्सव करत म्हणायचंच असतं , गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या!

घरातली मूर्ती घरातंच असते , पण गणेशोत्सव म्हटला की गोरेगांव आठवतं आणि मनातला गणपती मग मला पुन्हा चौथीमधे घेऊन जातो!

कुणास ठाऊक कधी , कुठे व कसे : पण सगळे सीता निवास—राम निवास—लक्ष्मण निवास , प्रगति निवास , लक्ष्मी निवास , दत्त निवास वाले सगळे शेजारी ….. मला भेटतील , गेला बाजार हा माझा लेख वाचतील आणि माझ्यासारखीच त्यांनाही टिळक नगर आणि आसपास चा गणेशोत्सव आठवेल आणि हा वेडाविंद्रा उदय पण आठवेल !

बाप्पा , कधीतरी भेटव ना रे या सगळ्यांना ! भेटवशील ना ? बघ अजून डोळ्यांतलं पाणी थांबलं नाहिये रे…..

© उदय गंगाधर सप्रे म—ठाणे
सेल फोन : +९१९००४४१७२०५ ( संध्या. ५.३० ते ६.३० या वेळेतच कृपया संपर्क करावा ही विनंती ! )
E-mail : sudayan2003@yahoo.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..