नवीन लेखन...

गणपती रहस्य

‘गणपती बाप्पा मोरया’ चा आवाज आज सर्वत्र ऐकायला मिळतोय. गेल्या वर्षी हे बाप्पा आमच्या वर रूसले होते पण ह्या वर्षी मात्र ह्यांचे आगमन घरोघरी झाले आहे. आपले लाडके व आराध्य दैवत म्हणजे श्री गणराया. कोणतीही पूजा असो मंगल कार्य असो. प्रथम पूजन विघ्नहर्ता गणारायचे. ‘आदि वंदू तूज मोरया’ पहिला नमस्कार श्री गजाननाला. सर्व देवतांमध्ये आगळे वेगळे रूप ह्या देवतेचे. निराळे असून सर्वांना आकर्षित करणारे. बाळ गंगाधर टिळक ह्यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र यावे, चांगल्या विचारांची देवाण घेवाण करावी हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आज ह्याचे रूप बदललेले दिसते पण जर ह्या गणेशाचे रूप, अलंकार ह्यांचे रहस्य समजून घेतले तर आपण आपल्या जीवनातील विघ्न नष्ट करून सुखी जीवनाचा अनुभव करू शकतो.

पार्वतीच्या मळाने बनवलेला हा मानसपुत्र ज्याचा शंकर येऊन शिरच्छेद करतात. आणि गजमुख लाऊन जीवनदान देतात अशी कथा आपण सर्व जाणतोच. पण प्रश्न हा उभा राहतो की जे शिर धडापासून वेगळे केले गेले त्यालाच लावले असते तर.. .. गजमुख लावण्यामागचे रहस्य काय हे आपण आज जाणून घेऊ या. आज मनुष्याकडे जे काही आहे रूप-रुपया, नाव-गाव, जात-पात,.. .. ह्या सर्वांचा त्याला अहंकार आहे. जो पर्यन्त ह्या अहंकाराचे शिर कापत नाहीत तो पर्यन्त दिव्य बुद्धी प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून शंकर येऊन अहंकाराला नष्ट करून हत्तीचे तोंड लावतात म्हणजेच बुद्धिवान बनवतात. आपण आपल्या जीवनात कसे वागावे ह्याचे व्यावहारिक ज्ञान ह्या गणरायाकडून आपल्याला मिळते. त्यांची ही वेगळी प्रतिमा आपल्याला अमूल्य शिकवण देते.

हत्तीला बुद्धीवान, बलवान, आज्ञाधारक ….. मानले जाते. हत्तीच्या प्रत्येक अंगामध्ये रहस्य आहे.

गजकर्ण :- सुपासारखे कान हे चांगले आणि वाईट ह्यांचा भेद करून चांगले आपल्या जवळ ठेवण्याची कला शिकवणारे आहे. वाईट ऐकण्याची सवय ही आपल्या जीवनाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते. म्हणून Hear no evil ही गाठ आपण बांधावी.

गजचक्षू :- शरीर इतके मोठे मात्र डोळे किती छोटे. दूरची वस्तू बघण्यासाठी आपल्याला डोळे छोटे करावे लागतात. हे डोळे दूरदृष्टीचे प्रतिक आहे. कोणते ही कार्य करण्यासाठी त्याचे होणारे परिणाम पहिले लक्षात घ्यावे. कारण आजचा मनुष्य पहिले करतो आणि मग त्यावर विचार करत राहतो परंतु पहिले विचार करावा व मग कार्याला लागावे ही सवय आपण स्वतःला लावावी.

वक्रतुंड :- हत्तीचे सोंड ही बलशाली असण्याचे प्रतिक आहे. ह्या सोंडेने भले मोठी झाडे मुळासकट उपटून काढली जातात. ह्याच सोंडेने देवाला हार ही अर्पण केला जातो. ह्या सोंडेमध्ये कोणी ही काहीही दिले तर ते मालकापर्यंत पोहोचवण्याची इमानदारी ही दिसून येते. अशक्य कार्य शक्य करण्याची शक्ति हत्तीमध्ये दिसून येते. मानवी मनामध्ये सुद्धा अद्भुत शक्ति आहे ज्या द्वारे असम्भव कार्य सम्भव होऊन जातात. तसेच नम्रता आणि इमानदार राहिल्याने जीवनातल्या समस्या कमी होतात.

एकदंत :- नेहमी एकावर विश्वास ठेवावा मग नातं असो की डॉक्टर असो. तसेच श्रद्धा ही सुद्धा एकावर असावी. आज बाहेरच्या विश्वात द्वेत आहे पण आंतरिक विश्वात द्वंद्व आहे. त्याला समाप्त करून एक नामी बनण्याची प्रेरणा ह्या एकदंत रुप आपल्याला देत आहे.

गणपतीचे रूप कितीही भव्य दिव्य दाखवले गेले तरी उंदीर हा मात्र छोटा. मूषक वाहन का? हा प्रश्न आपल्या सर्वांना पडतंच असेल. उंदीर हा आपल्या कर्म इंद्रियांचे प्रतीक आहे. उंदीर हा असा प्राणी आहे की तो सतत काहीतरी कुरतडत असतो, आपल्या ह्या इंद्रिया सुद्धा सतत कर्म करत असतात. मूषक हे विकार वासनांचे प्रतीक आहे. आपल्या मनामध्ये कधी कोणता विकार येईल हे सांगता येत नाही. जसे उंदीराने घरात कधी प्रवेश केला हे समजत ही नाही तसेच खूप छोट्या छोट्या गोष्टींचा राग येणे, उदास होणे, भीती वाटणे.. .. ह्या कमी आपल्यात कधी प्रवेश होतात ह्याचे ही भान आपल्याला नसते. उंदीर चावण्याच्या आधी त्या जागी फुंकर मारून बधिर करतो तसेच हे विकार ही आपल्या मन बुद्धीला बधिर करतात त्यामुळे आपल्या इंद्रिया चुकीचे कर्म करू लागतात. पण तत्वज्ञानी व्यक्ति आपल्या इंद्रियांचा मालिक बनून त्यांना चालवतो. कुठे, कधी, कसे आणि काय वागावे ह्याची समज त्याच्या कडे असते. म्हणून गणेशाला मूषक स्वामी दाखवले आहे. स्थिर बुद्धी व मनाचे आधिपत्य ज्याच्याकडे आहे तो आलेल्या विघ्नंचा नाश सहज करतो. फक्त आपलेच नाही पण इतरांच्या विघ्नाचा ही नाश करतो. म्हणून गणरायाला विघ्नविनाशक म्हटले जाते.

मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ. मोदकाची बाहेरून चव बघितली तर अगदीच फिकी पण आत मधुर सारण भरलेले असते. तत्वज्ञान हे बाहेरून बेचव वाटले तरी त्याचा अर्थ सारगर्भित असतो म्हणून बुद्धीची देवता गणपती ह्याचा आवडता पदार्थ मोदक दाखवला जातो.

गणरायाचे आवडते फूल म्हणजे जास्वंद. जास्वंदाचे फूल लाल रंगाचे व पाच पाकळ्यांचे असते. त्यात परागदंड असून त्यावर परागकण ही असतात. सुंदर अर्थ हयामागे दडला आहे की आपण ह्या पाच तत्वानी बनलेल्या जगापासून दूर असलेल्या ब्रह्मांडाचे निवासी आहोत. परागकण हे आत्म्याचे प्रतीक आहे. तसेच गणपतीला शिवसुता म्हटले जाते अर्थात शिव पुत्र आहेत. आपण सर्व आत्मा आहोत व आपला पिता परम आत्मा शिव आहेत. आपले घर परम धाम आहे. हा त्याचा भावार्थ.

अश्या अनेक रहस्यानी भरलेले गणरायाचे रूप आपल्याला अनेक गुणांनी भरपूर करण्याची प्रेरणा देत आहे. आपण त्यांच्या रूपाला न्याहाळताना त्यांच्या गुणांना स्मृति मध्ये ठेऊन त्यांची पूजा अर्चना करावी व आपल्या जीवनातील विघ्न नष्ट करावे.

— ब्रह्माकुमारी नीता 

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..