लालबागमधील गणपती म्हणजे मुंबईची शान. एक काळ असा होता की हा गणेशोत्सव सर्वसामान्यांचा होता. हळुहळू त्याचे VIPकरण कसे झाले त्याबद्दल लिहिलंय एका माजी लालबागकराने.
एके काळी ४०-४५ वर्षांपुर्वी, आम्ही आई-बाबांचं बोट धरून लालबागचे गणपती पहायला जायचो. चिंचपोकळी पूल, रंगारी बदक चाळ, तेजूकाया, गरमखाडा, गणेश गल्ली, मार्केटचा गणपती, नरेपार्क, लाल मैदान. मार्केटच्या गणपतीला बाहेरच्या मैदानात जत्रा भरायची. मग हे माग, ते माग, हट्ट कर..पेटीत पैसे टाका, चमत्कार बघा..कांबळी चलत् चित्र प्रदर्शन हे त्या वेळचं मुख्य आकर्षण असायचं.
मग बघता-बघता गणपतीचं मार्केटींग सुरू झालं. तो नवसाला पावू लागला, राजा झाला. पेटी मोठी झाली, चमत्कार सुद्धा मोठे झाले. रांग वाढली, भाव वाढला, प्रसिद्धी वाढली, पैसा वाढला, आकर्षण वाढलं..अगदी बाप्पांचा आकारही वाढला..काळ बदलला, समजलच नाही., काळाच्या ओघात कांबळी लुप्त झाले..,
सगळं बदललं, पण भाविक बदलले नाहीत., आज मी जातो मार्केटचा गणपती दाखवायला, बोट धरून. आता डोकी आपटतात, घाई करतात, अगदी हाकलतात सुद्धा…साधी रांग, नवसाची रांग, व्हीआयपी रांग..
पायाचं दर्शन, पडद्याचं दर्शन, खालून दर्शन, वरून दर्शन…प्रत्येक दर्शनाचा भाव (म्हणजे रेट हो..भावना नव्हे..!) निराळा..
मला आठवत कोणे एके काळी त्या बाप्पाची दुपारची कोणी आरती पण करत नसे., परिसरातली लहान मुले दुपारी शाळा सुटली की जायची आणि आरती करायची., आता रहिवाशांना तिकडे जाता येत नाही..श्रद्धा तेवढीच राहीली पण पेटी-ऐपती पेक्षा मोठी झाली., मला देवाची आठवण येते, त्याला माझा चेहरा आठवत नाही का..?
नसेल कदाचीत…,कारण आता “राजा” अंबानी, तेंडुलकर, बच्चन, फडणवीस आणि मोठमोठ्या सेलिब्रिटीज मध्ये व्यस्त आहे “VIP” झाला आहे बाप्पा..आता मी लालबागच्या तमाम गणपतींना घरच्या गणपतीत शोधतो. माझी सर्व श्रद्धा घरच्या गणपतीच्या पायावर ठेवतो.. “राजा”ला माझा इथूनच साष्टांग दंडवत..!!
मनोगत- एक माजी लालबागकर रहिवाशी
Leave a Reply