(मुंबई महानगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गांडूळ शेती प्रकल्प राबवला. हे गांडूळ खादाड आणि जाडजाड असतात आणि कचऱ्याचा फडशा पाडतात. कौतुकाने प्रकल्प बघायला गेलेल्यांना मात्र तिथे कचऱ्याचे ढिगारे आणि भिकारी सापडले, गांडुळे मात्र बेपत्ता! कुठे होते ते?)
महानगरपालिकेने राबवला
गांडूळ शेतीचा प्रकल्प
हे गांडूळ असतात खादाड
आणि दिसायला जाड जाड
लोक गेले तिथं
पहायला गंमत
दिसले त्यांना तिथे
कचऱ्याचे ढिगारे
आणि भिकाऱ्यांची पंगत!
लोक तरी कसे खुळे
पाहायला गेले भलतीकडे?
महापालिकेच्या सभागृहातच
वळवळतात ते अलीकडे!
गांडुळाच्या शेतीत
गांडुळाचा अभाव
सभागृहातल्या गांडूळांचा
मात्र वधारतो भाव!
कचरा खायला काय
ते आहेत गांडूळराव?
अकलेचे कांदे आहेत खरे
कचऱ्यापेक्षा म्हणतात शेण बरे!
— विनायक अत्रे.
Leave a Reply