नवीन लेखन...

गाणी बनतानाचे किस्से

गाणे जन्म घेताना

प्रत्येक गाणे नशीब घेऊन जन्माला येते. काही गाणी गाजतात तर काही विस्मृतीत जातात. तर काही किस्से बनून जन्माला येतात. एकाच  गाण्याच्या किस्याबद्दल काही लोकांच्या वेगवेगळ्या आठवणी असतात.  त्यातलीच काही गाण्याचे किस्से….

1) गदिमांना कोणीतरी डिवचले “अण्णा , तुमच्या गाण्यात ळ अक्षर का येत नाही हो ?” अण्णांनी थोडासा विचार केला आणि गाणे लिहिले “घन निळा, लडीवाळा झुलवू नको हिंदोळा “ जे आधी रेकोर्ड झाले नंतर “उमज पडेल तर” ह्या चित्रपटात घेतले.

2)  गदिमानी जेव्हा गीत रामायण लिहायचे ठरले तेव्हा पहिलेच गाणे लिहून सुधीर फडके यांच्या कडे पाठवले. दुसऱ्या दिवशी फडके म्हणाले “मला गाणे मिळाले नाही” गदिमा म्हणाले “मी  पुन्हा गाणे लिहिणार नाही,दुसऱ्या  दिवशी गाणे  लाइव्ह रेकोर्ड होणार होते. तेव्हा त्या कार्यक्रमाचे निर्माते सीताकांत लाड गदिमांना म्हणाले “अण्णा तुम्हाला गाणे लिहाव लागेल. मी दरवाजा बाहेरून बंद करून घेतो. गाणे लिहून झाले कि सांगा मी दरवाजा उघडेन. गदिमाचा नाईलाज झाला. थोड्याच वेळात आतून थाप आली. गाणे होते “ स्वये श्रीराम प्रभू ऐकती “

3)  गदिमांना सरस्वती प्रसन्न होती गाणी लिहिण्यासाठी शब्दाशी झगडावे लागले नाही, ते एकटाकी लिहित म्हणजे गाणे लिहायला घेतले कि ते पूर्ण करूनच लेखणी थांबवत. पण एकदा मात्र त्यांना खूप वेळ गाणे सुचत नव्हते. गदिमा पंचवटी बंगल्याच्या मागील अंगणात गादी लोड टाकून बसले,पण मनासारखे गाणे सुचत नव्हते. त्यांच्या सौ ने विचारले “ किती वेळ लागेल सगळे जेवायचे थांबले आहेत” गदिमा म्हणाले “अहो श्रीराम जन्माला यायचे आहेत,वेळ लागणार, तो काय माडगूळचा अण्णा जन्माला यायचा आहे काय? गाणे जन्माला आले “राम जन्मला ग सखी राम जन्मला”

4) गदिमा चित्रपटाच्या कामासाठी कायम पुणे,मुंबई प्रवास करत. एकदा त्यांच्या सहकाऱ्याने,बाबा पाठक यांनी  मुंबईहून परतताना विचारले “अण्णा या आठवडयाच गीत रामायणचे गाणे लिहायचे आहे “ गदिमा म्हणाले “ हो,रे गड्या,” गड्या अण्णांचा आवडता शब्द . त्यांनी गाडीतच कागद पेन काढून गाणे लिहून टाकले “दैवजात दुखे भरता,दोष ना कुणाचा,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ”

5)  गदिमांच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी एका दिग्दर्शकाने आग्रह केला अण्णा गाणे लिहून द्या थोडा फुरसतीचा वेळ मिळाल्यावर त्यांनी गाणे लिहून दिले “लळl ,जिव्हाळा शब्दच खोटे “ वर म्हणाले “शुभ कार्याच्या दिवशी कसली रडी गाणे लिहायला लावता रे?”

6) गदिमांचे ऑपरेशन झाले लोकं भेटायला येत होती,त्यात निर्माते कमलाकर तोरणे सुद्धा होते,गाणे लिहून घेण्यासाठी, गदिमांना जबरदस्त खोकल्याची ढास लागली होती खोकून चेहरा लाल झाला होता खोकला थांबतच नव्हता तिथे व्हायोलीन वादक प्रभाकर जोग होते ते म्हणाले “ माझ्या बायकोला होमिओपॅथिक औषधाची माहिती आहे ते घेऊन बघा. सौ जोगानी गोळ्या दिल्या त्या बघून त्यांनी सौ जोग यांच्याकडे पहिले  व म्हणाले “अग माझा देह केव्हढा,  गोळ्या एव्हढ्या त्या म्हणाल्या असे नसते गोळ्यांचा आकार व गुण याचा संबंध नसतो त्या  घेतल्यावर ढास कमी झाली. लगेच तोरणे म्हणाले “अण्णा गाणे” गदिमांनी कागद पेन घेऊन गाणे लिहिले “चढाओढींन,चढवीत होते, बाई मी पतंग उडवीत होते “

7)  एकदा शरद पिळगावकर यांनी जगदीश खेबुडकर यांना गाठले व म्हणाले “तुम्ही माझ्या अष्ट विनायक चित्रपटासाठी एक गाणे लिहा आठ गणपतीवर “ खेबुडकर यांनी विचारले बाकीची गाणी कोण लिहितंय” “शांता शेळके” मग त्यांनाच लिहायला सांगा ना मला त्या गणपतींची फारशी माहिती नाही. “ पिळगावकर यांनी आरतीच्या आकाराचे अष्ट विनायकच पुस्तक दिले म्हणाले “लिहा आता “ खेबुडकर यांनी थोड्याच वेळात गाणे लिहिले “अष्ट विनायका तुझा महिमा कसा “

8)  श्रीनीवास खळे लता मंगेशकरना म्हटले “माझे एक गाणे गा “ लता दीदी म्हणाल्या “ नाही हो मला अजिबात वेळ नाही “ खळे म्हणाले “एकदा चाल तर ऐका” त्यांनी शांतपणे चाल ऐकली त्यांना ती इतकी आवडली त्या  म्हणाल्या “खळे मी कसाही वेळ काढीन पण गाणे गाईन” गाणे होते . ” या चिमण्यानो परत फिरा रे”

9)  मंगेश पाडगावकर यांना सेन्ट्रल हार्बर च्या एका स्टेशनावर गाडीची वाट बघताना गाण्याच्या काही ओळी सुचल्या “श्रावणात घन निळा बरसला “ त्यांनी त्या श्रीनीवास खळेना सांगितल्या ते तेव्हा एच एम व्ही मध्ये कामाला होते. ते म्हणाले गाणे पूर्ण करा गाणे झाल्यावर त्यांनी चाल बांधली व निर्माते कामेरकर यांना सांगितले “आपण गाण्यात कोणतीही तडजोड करायची नाही, व्यवस्थित वाद्य वापरू  “ आता गाण्याचे नोटेशन लिहायचे काम अनिल मोहिलेना दिले त्यांना वाटले नोटेशन काय डाव्या हातचा मळ पण चाल ऐकल्यावर कळले ती किती कठीण आहे गायिका लता मंगेशकर त्यांनी चाल ऐकल्यावर म्हणाल्या “किती कठीण चाल आहे “खळे म्हणाले “अहो तुम्ही नाही तर कोण गाणार”

10)   एकदा पी सावळाराम यांना गाणे सुचले त्यांनी लता मंगेशकर यांना फोन लावला व म्हणाले मी तुझ्यासाठी एक गाणे लिहिले आहे. व गाणे ऐकवले गाणे संपल्यावर समोर एकदम शांतता नंतर हुंदक्याचा आवाज लता मंगेशकर रडत होत्या गाणे होते “ कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला. “

11)  लता मंगेशकर ह्या द ग्रेट लता मंगेशकर का आहेत त्याचा किस्सा, एकदा संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी लता मंगेशकर यांना विचारले “माझ्यासाठी एक गाणे गाल का ?” त्या म्हणाल्या “माझ्याकडे अजिबात वेळ नाही सगळ्या डेट गेल्या आहेत “ चंदावरकर म्हणाले “तुम्ही काळजी करू नका गाण्याची रिहर्सल झाली आहे गाणे जरी बाईवर  चित्रित होणार  असले तरी ते रवींद्र साठे यांच्या आवाजात रेकोर्ड केले आहे. तुम्हाला फक्त येऊन गायचे आहे “ त्याकाळी सगळ्यांना एकत्र गावे लागे. एक आला गाऊन गेला दुसरा गाऊन गेला अशी संगीतखुर्ची नव्हती. लातादिदी आल्या गाणे शांतपणे  ऐकले . कागदावर हव्या तिथे खुणा करून घेतल्या. एकदा रिहर्सल केली . भास्कर चंदावरकरना विचारले “ बरोबर आहे ?” त्यांनी ओ. के म्हटल्यावर फायनल टेक झाला आणि तासाभरात रेकोर्डिंग स्टुडीओच्या बाहेर पडल्या गाणे होते. ”सख्या रे घायाळ मी हरिणी “

१२ )    सी. रामचंद्र हे अनिल बिस्वास यांचे सहायक होते. नंतर काही दिवसांनी ते स्वतंत्र संगीत दिग्दर्शक झाले. पण संगीत वर्तुळात चर्चा होती कि सी रामचंद्रांच्या संगीतावर अनिल विश्वासची छाप आहे. एक दिवस ते अनिल विश्वास यांच्या कडे गेले व म्हणाले “ दादा ,मी एक गाणे कंपोज केले आहे. तुम्ही गाणे ऐकल्यावर मला चपलेने झोडाल. ” बीश्वास्नी गाणे ऐकले व म्हणाले “खरच तुला चपलेने झोडले पाहिजे” सी रामचंद्र म्हणाले “दादा, हे गाणे थर्डक्लास,फोर्थक्लास असेल पण ते माझे स्वतंत्र गाणे आहे. मला आशीर्वाद द्या हे गाणे हिट होईल. ” बिश्वास म्हणाले “असं म्हणतोस, ठीक आहे गाणे हिट होईल. ते गाणे होते “ आना मेरी जान,मेरी जान संडे के संडे ”

१३)  आर डी बर्मनचे सहायक मनोहारीसिंग यांनी दार्जीलिंगहून एक नेपाळी वादक आणला , त्याचं नाव रणजीत गजमेर. तो नेपाळी वाद्य मादल वाजवत असे. सिटींग मध्ये आर. डी. , आनंद बख्शी,देवानंद होते. आर,डी ने त्याला वाजवायला सांगितले. त्याने नेपाळी गाणे, कांचा ओ कांचा मादल वर  वाजवून गायले. आर. डी ना ते खूप आवडले त्यांनी गजमेरला सांगितले बाहेर बस. त्यांना नेपाळच्या लोकेशनवर गाणे हवेच होते. बक्षी यांनी लगेच “कांची रे कांची रे प्रीत मेरी सांची “ गाणे  लिहिले. आर डी ने लगेच कंपोज केले व गजमेरला सांगितले “आजपासून तू माझ्या टीम मध्ये काम करायचे. आजपासून तुझे नाव कांचा.

१४)  कांचा एक दिवशी सकाळीच रेकोर्डिंग रूम मध्ये लवकर येवून मादल वाजवत होता, घर सिनेमाची गाणी रेकोर्ड होणार होती. थोड्या वेळाने  आर डी आले. कांचा वाजवायचे थांबला . आर डी ने सांगितले वाजवत रहा. तो वाजवत होता. काम करता करता आर डी ऐकत होते. त्यांना ते खूप आवडले. त्यांनी तो रिदम “तेरे बिना जिया जायेना”गाण्यासाठी वापरला.

१५ )   निर्माता नासीर हुसेन एकदा इंग्लंडला गेला असताना त्यांनी गाण्याचा कार्यक्रम पहिला, त्यात एक गाणे संपल्यावर मध्ये ब्रेक न घेता पाठोपाठ ३,४ गाणी गायली जात होती . त्यांनी आर डी ना विचारले आपण हा प्रयोग करायचा का? आर डी तर प्रयोग करायला कायम तयार. त्यांनी सांगितले करू ना आणि हम किसीसे काम नही ची “चांद मेरा दिल, आ दिल क्या ,तुम क्या जानो,मिल गया हमको साथी  मील गया” हि गाणी तयार झाली.

१६ ) प्यासा चित्रपटाच्या रेकोर्डिंग वेळी एका वादकाच्या हातून  तार शहनाई वाद्य चुकीचे वाजले गेले एस डी नी विचारले क्या हुवा वादकाने सांगितलं “गलतीसे बज गया दादा,” एस डी ने सांगितले “ दुबारा बाजावो” वादकाने तसेच पुन्हा पुन्हा वाजवले. सचिनदानी सांगितलं “हो गया काम “ आणि त्यांनी” जिन्हे नाज है हिंद पर वो कहा है “ या गाण्या साठी फक्त ठेका आणि तार शहनाईची ट्यून वाजवली.

१७) तलाश चित्रपटाचा निर्माता ओ. पी . रह्लन अडून बसला कि तेरे नैना तलाश कर जिसे या गाण्यासाठी मुकेश हवा. हे गाणे मुकेशच्या आवाजाच्या जातकुळीतील नव्हतेच. एक तर साचीन्दाना आपल्या कामात कोणी ढवळाढवळ केलेली आवडत नसे वर हे गाणे मुकेशने गावे ? त्यांनी तिथल्यातीथे सांगितले मी हा चित्रपट सोडला,  फक्त दुख; एकच आहे कि या सिमेनाची बाकीची गाणी आता वाया गेली. आणि तिथून निघून गेले. रह्लन ला आपली चूक कळली. पण  सचिनदा त्याला बरेच दिवस भेटच देत नव्हते. शेवटी रह्लन विजय आनंद कडे गेला व त्याच्या मध्यस्तीने साचीन्दानी पुन्हा चित्रपट स्वीकारला.

१८)   गाईडच्या रेकोर्डिंगच्या वेळी “दिन ढल जाये रात ना जाय”गाण्याच्या वेळी रफी व्यवस्थित  गात होते. सचिनदा ओ. के म्हणाले तरी रफी पुनःपुन्हा रिहर्सल करण्याचा आग्रह करत होते. साचीन्दाना कळेना मी ओ. के. म्हणतोय तर पुनःपुन्हा रिहर्सल कशासाठी ? शेवटी त्यांनी रफीना विचारले काय चालले  आहे? ते म्हणाले “ऐसेमे किसको कौन मनाये मधली, कौनची जागा मनासारखी येत नाही आहे” ह्याला म्हणतात डेडिकेशन. नाही तर आता गाणे रेकोर्ड झाले असते तर टेक्निशियनने सांगितले असते “ रफिसाब आप गाईये कौन को बादमे जोडेंगे”

१९ ) एकदा प्रसिद्ध तबला वादक थिरकवासाहेब , बंगाली शास्त्रीय गायक निखील घोष यांच्याकडे राहायला आले. त्यांनी रेडीओ वर “सून मेरे बंधू रे” गाणे ऐकले त्यांना ते खूप आवडले. त्यांनी घोषच्या मुलांना सांगितले मला गाणे परत ऐकायचे आहे ते म्हणाले “हे रेडिओ वर लागले  होते. परत ऐकता येणार नाही “ ते म्हणाले मग मला रेकोर्ड आणून द्या. मुलांनी सगळा बांद्रा पालथा घालून रेकोर्ड मिळवली. थिरकवा साहेबांनी विचारले गाणे कुणी गायले आहे. मुले म्हणाली “एस. डी. बर्मन म्हणून एक संगीतकार आहेत त्यांनी गाईले आहे ,आपल्या घराच्या पुढे दोन गल्ली सोडून राहतात. ते म्हणाले मला त्याला भेटायचे आहे. तसा निरोप साचीन्दाना गेला. दोन दिवसांनी सचिनदा आले. थिरकवा म्हणाले “सुभान अल्ला,खुदाने क्या आवाज दी है तुम्हे , जीते रहो” असे म्हणून त्यांनी साचीन्दाना पाकिटातून एक नोट काढून दिली. सचीन्दानी ती नोट आयुष्यभर जपून ठेवली.

२०)   बंदिनी चित्रपटासाठी शैलेंद्र गाणी लिहित होते. पण मधेच त्यांचे साचीन्दाशी भांडण झाले. पण एक गाणे बाकी होते. बिमल रॉयचे सहायक म्हणाले “माझा एक मित्र मोटार गेरेज मध्ये काम करतो व हौस म्हणून गुलजार नावाने गाणी लिहितो. गुलजारना निरोप गेला पण ते गेलेच नाहीत. हि गोष्ट शैलेन्द्रना समजली. त्यांनी गुलजारना बोलावले व झापले “कोण समजतोस स्वताला ? बिमल रॉय सारखा एव्हडा मोठा माणूस  तुला बोलावतो आहे आणि तू जात नाहीस ? गुलजार गेले. एस डी नी विचारले “मीटरवर लिहिता येत काय ? सचीन्दानी मीटर समजावले. त्यावर गुलजारनी गाणे लिहिले “ मोर गोरा रंग लैले” त्यानंतर बिमल रॉय म्हणाले “ आजपासून तू गरेजमध्ये जायचे नाही माझ्याकडे काम करायचे “

२१ ) कागजके फुल चित्रपटाच्या वेळी एका सिचुएशनसाठी गाणे हवे होते. चित्रपटाचे गीतकार होते कैफी आजमी, त्यावेळी ते नवखे होते. त्याचं गाणे गुरुदत्त्ना पसंत पडत नव्हते. ते शेवटी म्हणाले “ जाऊ देत या सिचुएशनवर गाणेच नको. ” हि गोष्ट कैफी आजमी यांच्या जिव्हारी लागली. ते म्हणाले “ मला एक दिवस द्या “ घरी आले ,आपल्या खोलीत गेले, दरवाजा आतून बंद केला. घरातले सगळे घाबरले त्यांना कळेना नक्की काय झाले आहे? दुसऱ्या दिवशी त्यांनी  गुरुदत्त व सचिनदा यांच्या समोर कागद धरला “वक्त ने किया क्या हसी सितम तुम राहे ना तुम हम राहे ना हम “

२२ )   एस डी नी, आर डी ला सांगितले शैलेंद्र कडून गाणे आण. आर डी शैलेन्द्रच्या मागे दिवसभर फिरत होते . शेवटी शैलेंद्र जुहू चौपाटीवर गेले. आर डी ला सांगितले सिगारेट काढ, मला माहिती आहे तू पितोस. सिगारेट पिऊन झाल्यावर शांतपणे आकाशाकडे पाहिले. चंद्र थोडासा ढगाच्या आड गेला होता. त्यांनी तिथल्या तिथे गाणे लिहिले “खोया खोया चांद खुला आसमा”

२३) मिली चित्रपटाच्या वेळी गाण्यांची रिहर्सल झाली आणि सचिनदाना पेरेलीसीस झाला ते कोमात गेले. किशोर कुमार समोर उभा राहिला त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो तिथेच म्हणाला दादा “बडी सुनी सुनी है “ गाणे मी असे गाईन कि ते अजरामर होईल. आणि तसेच झाले.

२४ )   बाप रे बाप चित्रपट मधील “पिया पिया मोरा  जिया पुकारे “गाण्यात आशा भोसलेंनी चुकीच्या ठिकाणी तान घेतली. त्यामुळे गाणे पुन्हा रेकोर्ड करावे लागणार होते. बाकी सगळे गाणे बरोबर होते. तेव्हा ओ. पी म्हणाले आपण गाणे पुन्हा रेकोर्ड करायला नको. जिथे चुकीची तान  आहे तिथे किशोर कुमारला हिरोईनच्या तोंडावर हात ठेवायला सांगू. शुटींग मध्ये तसेच केले.

२५)   ओ. पी नैयरनी आशा भोसले कडून प्राण जाय पर वचन न जाय चित्रपटासाठी अप्रतिम गाणे गाऊन घेतले. ”चैनसे हमको कभी आपने जिने ना दिया “ दरम्यान ओ. पी व आशा मध्ये वितुष्ट आले. त्यामुळे आशानी  जोर लाऊन गाणे सिनेमात येणार नाही याची काळजी घेतली, पण ते रेकोर्ड मध्ये होते. त्याला पारितोषिक मिळाले. आशा भोसले ते घ्यायला गेल्या नाहीत पण ओ. पी गेले. पारितोषिक घेतले. पण तेही इतके जिद्दी कि  येताना ते रस्त्यात फेकून दिले.

२६ ) एखाद्या माणसाचा तोंडावर अपमान झाल्यावरही तो किती जिद्दीने गाऊ शकतो. चोरी चोरी चित्रपटासाठी शंकर जयकिशनने मन्ना डेना गाण्यासाठी बोलावले. पण निर्माता म्हणाला “ नाही मन्ना डे वगैरे नको मुकेशच हवा. त्यांना गाण्याशी देणे घेणे नसते. राज कपूर म्हणजे मुकेश हेच डोक्यात. हे मन्ना डे च्या समोर. मन्ना डेना सुद्धा पाय रोवण्याची संधी होती. शेवटी शंकरने निर्मात्याला बाजूला घेऊन सांगितले. ”आपण मन्ना डे कडून गाऊन घेऊ नाही आवडले तर मुकेश आहेच. ”कारण हे गाणे मुकेशचे नाही हे शंकरला माहिती होते. असे असूनही मन्ना डेनि गाणे १०० टक्के दिले व मुकेशला घ्यायची वेळ आली नाही. ” ये रात भिगी भिगी”

२७)   शंकर आणि शैलेन्द्रची खास मैत्री. पण एकदा त्यांचे भांडण झाले. अबोला सुरु झाला. शैलेंद्रने एक गाणे लिहून नोकराबरोबर शंकर कडे पाठवले “ छोटीसी ये दुनिया पहेचाने रास्ते है तुम कभी तो मिलोगे तो पूछेंगे हाल”

२८ )  बसंत बहार चित्रपटासाठी शंकर जयकिशननी ठरवले शास्त्रीय संगीतावर गाणे घ्यावे. म्हणून  त्यांनी सहायक राम नारायण व शैलेन्द्रना भीमसेन जोशीकडे पाठवले. भीमसेन यांनी एक कानडी चीज ऐकवली. शैलेंद्रने त्यावर शब्द लिहिले “ केतकी गुलाब जुही चंपक बन फुले” या जुगलबंदीत  भीमसेन हरणार होते. भीमसेनजींच्या समोर कोण तर मन्ना डे, शंकरने मन्ना डे यांना  तसे सांगितले. भीमसेनजी चे नाव ऐकल्यावर मन्ना डे गायब झाले. काही दिवसांनी शंकरने मन्नादाना शोधले. त्यांना वाटले होते दुसऱ्या कोणाला तरी घेऊन गाणे रेकोर्ड झाले असेल. मग भीमसेनजीनी त्यांना धीर दिला. व ते गाण्यात जिंकले. त्यांना विचारले ते म्हणाले “ मी कसला जिंकतोय, मला जिंकवले आहे त्यांनी तान  घेतली कि अशी  वर जाई कि वाटे आता खाली येईल  पण खाली येऊन पुन्हा वर जाई आणि मी जरा वर तान घ्यायचे ठरवले कि फूस. ”

२८ )  एकदा जयकिशन व हसरत जयपुरी अमेरिकत गेले होते. ते एका बारमध्ये गेले. थोडी दारू पोटात गेल्यावर समोर  झगमगणारे  टू पीस घालून नाच करणाऱ्या, पोरी कडे बघून जयकिशन म्हणाला “हसरत ये डान्स करनेवाली पर गाना लिख सकते हो ? हसरतने लिहिले “ बदन पे सितारे लपेटे हुये ओ जाने तमन्ना किधर जा रहि हो जरा पास आओ तो चैन आ जाये “

२९ )   वोह कौन थी चित्रपटाच्या वेळी नैना बरसे रिमझिम गाण्याच्यावेळी लतादिदी परदेशी  होत्या शुटिंगसाठी सगळी तयारी सिमल्याला झाली होती. ती रद्द करून चालणार नव्हती. काय करायचे ?. मदन मोहननी ते गाणे स्वताच्या आवाजात गायले व सिमल्याला साधनावर शूट करण्यासाठी  पाठवले. शुटिंगसाठी जमलेल्या  लोकांना कळेना पुरुष गातोय व बाई ओठ हलवते आहे. आजही मदन मोहनच्या आवाजातील गाणे यु ट्युबवर आहे. त्याच चित्रपटासाठी मदन मोहननी अप्रतिम  गाणे कंपोज केले “जो हमने दास्ता अपनी सुनाई आप क्यू रोये”. व ते दिग्दर्शक राज खोसलाना ऐकवले. त्यांना ते पसंद पडले नाही. शेवटी मदन मोहन मनोजकुमार कडे गेले. त्याला ऐकवले. तो आणि मदन मोहन पुन्हा राज खोसलाकडे गेले. फुरसतीत त्यांना ऐकवले. त्यांना ते खूप आवडले. जर मदन मोहन मनोजकुमार कडे गेले नसते तर आपण एका चांगल्या गाण्याला मुकलो असतो.

३०) आर डी बर्मनने वयाच्या ९ व्या वर्षी एक ट्यून बनवली ती पुढे  सचीन्दानी फन्टूश  मध्ये वापरली  ” ऐ मेरी टोपी पलट के आ. ”  आर डी ने विचारल्यावर त्यांनी सांगितले “मुलाची ट्यून वडिलांनी  वापरली तर काय बिघडलं”

३१ )  हाफ तिकीट मध्ये एक द्वंदगीत होते जे लता मंगेशकर व किशोरकुमार गाणार होते. पण ऐनवेळी लता मंगेशकर येऊ शकल्या नाही. तेव्हा किशोरकुमार सलील चौधरींना म्हणाला कि मी एकटा मेल व फिमेल आवाजात गाऊ का ? सलीलदाना वाटले किशोरकुमार चेष्टा करतोय. पण किशोरकुमारने खरच ते गाणे एकट्याने गायले “आके सिधी लगी जैसे कटारिया”

३२)  आन मिलो साजना चित्रपटाच्या एका गाण्यासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल व आनंद बक्षी सिटींग रुममध्ये बसले होते. दिवसभर आनंद बक्षी गाणे लिहित होते एल पी चल देत होते . पण काही मनासारखं गाणे बनत नव्हते. कागदाचा ढीग रुममध्ये झाला होता. शेवटी आनंद बक्षी कंटाळले. हिंदीमध्ये मै च्या ऐवजी हम सुद्धा  म्हणतात. बक्षी उठले आणि एल. पी. ना म्हणाले “अच्छा तो हम चलते है” प्यारेलालनी विचारले “ फिर कब मिलोगे” बक्षी म्हणाले “जब तुम कहोगे “ आणि त्यांच्या डोक्यात  काहीतरी चमकले. ते तिथेच बसले आणि गाणे तयार झाले अर्थात गाणे सांगायची गरज नाही.

३३)   किशोरकुमार कधी कोणाची इज्जत काढेल हे सांगता येत नाही. आपकी कसम चित्रपटासाठी आर डी बर्मनने रेकोर्डिंग रूम बुक केली. वादक,गायक, रूमचे भाडे यांचा खर्च पन्नास हजार झाला. १९७४मध्ये पन्नास हजार खूप होते. सिनेमाचे निर्माते जे ओम प्रकाश थोड्या थोड्या वेळाने येऊन आर डी. ला सुनावत होते “अरे ५० हजार खर्चा किया” त्यामुळे आर. डी. चा मूड गेला होता. त्याच कामात लक्ष लागत नव्हते. तेव्हढ्यात किशोरकुमार तिथे रेकोर्डिंग साठी आला. त्याने ओळखले आर डी. च काहीतरी बिनसले आहे. त्याने विचारले पंचम काय झाले तेव्हा त्याने सांगितले निर्माते कसे सारखे खर्च काढून दाखवत आहेत. किशोरकुमार तेव्हा काही बोलला नाही. पण जेव्हा “जय जय शिव शंकर” गाण्याचे रेकोर्डिंग होते तेव्हा गाणे संपल्यावर जोरात म्युझिक  वाजत असताना किशोरकुमार ओरडला “ अरे, बजाव रे बजाव इमानदारीसे बजाव, पचास हजार खर्चा कर दिया “ आणि हे गाण्यात आहे.

३४ ) कल्याणजीना पहिला सिनेमा मिळाला,त्यावेळी ते एकटे कल्याणजी वीरजी शाह या नावाने संगीत देणार होते,त्यांना चित्रपट मिळाला सम्राट चंद्रगुप्त, निर्माते होते. सुभाष देसाई, मनमोहन देसाईचे मोठे भाऊ. जी चाल कल्याणजी देत होते ती देसाईना पसंत पडत नव्हती. ते म्हणत होते नौशाद सारखी चाल लाव. शेवटी कल्याणजी कंटाळले. पण सेनेमा सोडून देतील ते कल्याणजी कसले. शेवटी ते कच्छी बनिया होते. त्यांनी एक आयडिया केली. एका पेटीवाल्या भिकाऱ्याला पकडले. त्याला पैसे देऊन गाण्याची चाल घोटून घेतली आणि सांगितले मी सांगेन त्या गल्लीशी उभे राहायचे आणि मी खुण केली कि जी गाडी येईल त्याच्या समोर हे गाणे मोठ्याने गायचे गाणे होते “चाहे पास हो चाहे दूर हो मेरे जीवन् कि तुम तकदीर हो” भिकाऱ्याने त्याप्रमाणे केले. लगेच देसाईने कल्याणजी यांना बोलावून सांगितले. ” कल्याणजी भाई अपना गाना क्या हिट हुवा है”कल्याणजी म्हणाले “मुझे मालूम था हिट होनाही था” आता जे गाणे रेकोर्ड झाले नाही हिट कधी होईल आणि भिकाऱ्याच्या तोंडी कसे होईल हे देसाई ना कळले नाही तरी कल्याणजीना कळले होते.

३५ ) शैलेन्द्र गाईडची गाणी लिहिणार होते त्यांनी पूर्ण कथा ऐकल्यावर गाणे लिहिले “आज फिर जीने की तमना हे आज फिर मरने का इरादा हे “ नंतर त्यांना वाटले रोजी आपल्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून,त्याचे सगळे पाश तोडून राजू गाईड कडे येते हे कुठे गाण्यात दिसत नाही म्हणून त्यांनी मुखड्याच्या आधी शब्द लिहिले “काटो से खिच के ये आंचल तोंड के बंधन बांधी पायल,कोई ना रोको दिल की उडान को इल वो चला “

३६ )गीतकार मजरूह सुलतानपुरी  हे विचाराने कम्युनिस्ट होते. त्यांनी १९५१ साली एक विद्रोही शायरी लिहिली कॉँग्रेसला वाटले की त्यांनी हे नेहरुवर लिहिले आहे. त्यांनी  मजरूह सुलतानपुरीना माफी मागायला सांगितले त्यांनी ते नाकारले तेव्हा त्यांना अटक केली. आता घर कसे चालणार? हि बातमी राज कपूरला कळली आपण पैसे देऊ केले  तर मजरूह सुलतानपुरी घेणार नाहीत म्हणून राजने खोटेच सांगितले मला चित्रपटासाठी गाणे लिहून द्या. डायरीमध्ये गाणे लिहून घेतले राज गाणे वापरणार नव्हता त्याचे गीतकार शैलेन्द्र व हसरत होते. पण १९७६ साली राजने ढरं धरम करम काढला तेव्हा ते गाणे वापरले “इक दिन बिक जाएगा माटीके मोल जगमे रह जायेगे प्यारे तेरे बोल”

३७ ) गाणे म्हणणार होत्या उषा मंगेशकर गाणे मजरूह सुलतानपुरीनी पुरे केले होते फक्त त्यांना दोन मराठी शब्द हवे होते. त्यांनी उषा ताईना विचारले मोठ्या काळ्या मुंगीला जी गुळाच्या ढेपेला लागते आणि लडकीला मराठीत काय म्हणतात त्यांनी सांगितले मुंगळा आणि मुलगी पण हे कश्यासाठी हवे आहे. ते म्हणाले गाणे जीच्यावर चित्रित होणार आहे ती मुंबईच्या देसई बारची आंटी आहे “तू मुंगळा मै गुड की डली व कैसा हई तू शर्मिला तुझसे तो मुलगी भली “

— रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

3 Comments on गाणी बनतानाचे किस्से

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..