नवीन लेखन...

गंगा आणि जल (उमा भारती यांच्यासाठी कांहीं माहिती)

२५ जून २०१६ च्या टाइम्स ऑफ इंडियातील एक बातमी गंगेबद्दल आहे. बातमीचें शीर्षक आहे : ‘Dams will doom Ganga’. उमा भारती यांनी ( किंवा त्यांच्यातर्फे, त्यांच्या ‘वॉटर रिसोर्सेस’ खात्यानें) सुप्रीम कोर्टाला सांगितलें की, अलकनंदा, भागीरथी व मंदाकिनी या नद्यांवर (हायड्रोइलेक्ट्रिक वीजनिर्मितीसाठी) धरणें बांधणें हें गंगेसाठी घातक ठरेल , नदीच्या प्रवाहावर विपरीत परिणाम होईल , आणि अर्थातच, त्याचा अनिष्ट परिणाम ecology वरही होईल. त्यांच्या या वक्तव्यात वावगें कांहींच नाहीं. (अर्थात, देशाला हायड्रोइलेक्ट्रसिटीची जरूर आहेच, ही नाण्याची दुसरी बाजू झाली).

आपण या बाबीवर चर्चा करतांना अर्थकारण, समाजकारण, विद्युतनिर्मिती, या सर्व गोष्टी बाजूला ठेवून, फक्त ‘पाणी’ या विषयावर लक्ष केंद्रित करूं या, व पाहूं या, उमा भारतीजींना आपण कांहीं उपयुक्त माहिती पुरवूं शकतो कां, तें.

१. सरस्वती : आपल्याला हें माहीतच आहे की ‘सरस्वती’ नांवाची महा-नदी, जिचें पात्र रुंदी कांहीं ठिकाणी ८-१२ किलोमीटर रुंद होतें , व जिच्या काठावर पुरातन ‘सिंधु-सरस्वती-गंगा’ संस्कृतीची वाढ झाली, ती महा-नदी आटत गेली, आणि इ.स.पू. १९००-१५०० च्या सुमाराला लुप्तच झाली. अनेकांना हेंही माहीत असेलच की, आतांच्या युगात पर्यावरणामुळे बर्फ वितळण्याचें प्रमाण वाढल्यानें हिमनद्या (glaciers) लहान-लहान होत चालल्या आहेत, व त्यामुळे हिमालयातून वाहणार्‍या (गंगेसारख्या) नद्यांच्या अस्तित्वाला धोका आहे. एक ग्लेसियर गंगेसारख्या मोठ्या नदीला १०,००० वर्षें मानी पुरवूं शकतो. त्यापेखी किती वर्षें उलटून गेलेली आहेत ? त्यायून, ग्लेसियर्स् आटत चालले आहेत. म्हणून, गंगा नदी तर एक दिवस आटणारच आहे ; फक्त, ती घटना आपल्या आयुष्यात, किंवा अगदी नजिकच्या भविष्यात घडणार नाहीं, एवढेंच. भगीरथानें महा-प्रयत्नानें गंगा हिमालयातून (स्वर्गातून) खाली (समतल प्रदेशात) आणली (असें पुराणें सांगतात). त्या गंगेला सध्याच्या काळीं कसें जगवायचें, आणि / किंवा गंगा-खोर्‍याला पाणी-पुरवठा कसा कमी होणार नाहीं, हें आपण पहायला हवें.

२. सरस्वतीबद्दल आणखी कांहीं : डॉ. एस्. कल्याणरामन् त्यांच्या पुस्तकात ( संदर्भ नंतर दिलेला आहे) म्हणतात की हा ‘सिंधु-सरस्वतीचा प्रदेश’ म्हणजे एक विशाल homogeneous-aquifer आहे, जणूं एक प्रचंड मोठा स्पाँज आहे.
सरस्वती नदी जरी आजच्या ३५००-३९०० वर्षें आधी आटून गेलेली असली, तरी, तिच्या ‘लुप्त’ पात्रात आजही पाणी लागतें. राजस्थानातील जैसलमेर हा भाग वाळवंटी आहे. पण त्या भागात बोअर-वेल् घेतली असतां खाली बारमाही-पाणी लागतें. ‘रेडिओ-कार्बन डेटिंग’नें हें दिसून आलेलें आहे की, हें groundwater (भूगगर्भजल) इ.स.पू. २९५० ते २४०० या (म्हणजेच, आजच्या काळाच्या ४४००-५००० वर्षें आधीच्या) काळातील आहे . हें वहातें पाणी आहे. त्याचा वेगही मोजला गेलेला आहे. ज्याअर्थी हें पाणी वहातें आहे, त्याअर्थी त्याचा आजही, जमिनीखालून, त्याच्या हिमालयीन उगम-भागाशी संपर्क आहे. या , डीप-वॉटर / ग्राउंड-वॉटर / अॅक्विफर च्या BARC नें केलेल्या ‘Tritium (Hydrogen Isotope) Analysis’ नें याचा काळ, इ. स.पू. ५४०० ते इ.स.पू. ४०० असा दाखवला आहे. BARC च्या रिसर्चर्सनी असें दाखवलेलें आहे की, हें राजस्थानमधील अॅक्विफर्समधील पाणी हिमालयीन आहे, व त्याचा उगम-काळ इ.स.पू. ६००० इतका आहे. (सर्व संदर्भ : Kalyanraman यांचा सरस्वतीसंबंधी ग्रंथ, ‘The River Saraswati : Legend, Myth and Reality’). हे ई.स.पू.चे वेगवेगळे निष्कर्ष असें नक्कीच दाखवतात, की हें भूगर्भजल फार-पुरातन-कालीन आहे.
ही अगदी हल्लीची बातमी पहा : ती सांगते की राजस्थानातील थर वाळवंटात आतां शेतकर्‍यांना Tube-wells मध्ये भरपूर बारमाही पाणी मिळत आहे, आणि तेंही इतक्या जोरात (forcefully) वर येत आहे की तें थांबवणें कठीण आहे. वृत्तपत्र म्हणतें की, याचा अर्थ असा असूं शकतो की सरस्वती नदी पुन्हा बाहेर येत आहे. (संदर्भ : टाइम्स ऑफ इंडिया, मुंबई, दि. २६ एप्रिल २०१६ च्या अंक).
जैसलमेर नजिकच्या, पाकिस्तानातील-भूभागातही अशीच परिस्थिती आहे, तेथेंही, वाळवंटी भागातील bore-wells ना पाणी मिळत आहे.

३. USA मध्ये दक्षिण-पश्चिम भागात, जमिनीच्या खाली एक प्रचंड तलाव आहे, (युरोपमधील एखाद्या लहान समुद्राएवढा) , जो अनेक states च्या खाली पसरलेला आहे. त्यातलें पाणी उपसा करून वापरलें जातें.

४. गंगा-खोरें : जसें जसें आपण पूर्वेकडे जाऊं तसें तसें गंगेला वेगवेगळ्या उपनद्या मिळत रहातात, जसें , यमुना,शोण इत्यादी इत्यादी, व तिच्यातील पाणी वाढत रहातें. म्हणजे, गंगेच्या-पाण्याचा जो कांहीं प्रश्न आहे तो पर्वतराजींपासून अलाहाबादपर्यंतचा आहे.
पुरातत्वशास्त्रज्ञ श्री. ढवळीकर यांनीं लिहिलें आहे की, देहरादूनपासून ते अलाहाबादपर्यंतच्या प्रदेशात उत्खनन करतांना तें चिखलातच करावें लागतें. तसेंच, या भागात खूप लहान-लहान तळी आहेत. या सर्वाचा अर्थ ते असा काढतात की, वेद-पुराणात जो ‘प्रलयाचा’ (महापुराचा) उल्लेख आहे, त्या प्रलयामुळे हें जमिनीतील मुरलेलें पाणी आहे.
तें असो-नसो, पण गंगेनें अनेकदा पात्र मात्र बदललेले आहे, त्याचाही कांहींतरी परिणाम असणारच.
मला असें वाटतें की, ही तळी व हा चिखल याचा अर्थ एकतर असा असूं शकतो की, तिथें जमिनीखालीं एक, पुरातन-काळीं-वहात-असलेली पण नंतर-‘लुप्त’-झालेली (जशी सरस्वती झाली तशी ) ‘नदी’ असूं शकेल. इंडियन टॅक्टॉनिक प्लेट ही एशियन प्लेटला घासली गेल्यामुळे गेल्या कांहीं सहस्त्रकांत बर्‍याच उलथापालथी झालेल्या आहेत. त्यामुळेच, सरस्वतीच्या उपनद्या असलेल्या सतलज व यमुनेनें प्रवाह बदलले, दृशद्वती नष्ट झाली, तोंस ही यमुनेची उपनदी झाली, व सरस्वती लुप्त झाली. त्याचप्रमाणें गंगेजवळही, सहस्त्रों-वर्षांपूर्वी-अस्तित्वात-असलेली एखादी नदी लुप्त होणें शक्य आहे.
किंवा, USA मध्ये आहे तसा एखादा मोठा भूअंतर्गत (underground) तलावही त्या भागात असूं शकेल.अखेरीस, हिमालयीन पर्वराजींमधून सगळेंच पाणी फक्त जमिनीवरील वाहत्या नद्यांमधूनच जात असेल असें नाहीं, तर कांहीं पाणी जमिनीखाली, वहात किंवा स्थिर असूंही शकेल
रिमोट सेन्सिंग एजन्सीनें जसा घग्गर-हाक्रा या सध्याच्या नद्यांच्या भूभागाचा सर्व्हे केलेला आहे (लुप्त सरस्वती नदीसाठी) , तसा गंगाखोर्‍याचा केलेला आहे काय ; किंवा जिऑलॉजिकल सर्व्हे, आर्कियॉलॉजिकल सर्व्हे, वॉटर-रिसर्च कमिशन, वगैरे संस्थांनी त्या भागात भूगर्भजल शोधण्यासाठी कांहीं प्रयोगादाखल उत्खनन केले आहे काय, बोशर-वेल्स् खणून पाहिल्या आहेत काय, व कांहीं माहिती गोळा केली आहे काय , याची मला कल्पना नाहीं . पण , तसें केलेलें नसल्यास तो अभ्यास व्हायला मात्र हवा.

५. भूगर्भजल : कल्याणरामन् सांगतात की, जैसलमेरच्या पश्चिमेच्या ( वाळवंटी ) सरस्वती-पात्रात (भूगर्भात) अंदाजे ३००० मिलियन क्युबिक मीटर इतका रिझर्व आहे. त्याचा वापर सुयोग्य प्रकारें करतां येऊं शकेल . सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डाचे भूतपूर्व डायरेक्टर. डॉ. के. आर्. श्रीनिवासन् त्यांच्या एका लेखात सांगतात की, ‘सेंट्रल-सरस्वती-बेसिन’ या राजस्थानातील केवळ एका भूभागातच, १० लाख ट्यूब-वेलस् ना कायमस्वरूपी पाणी पुरवण्याची क्षमता आहे. कल्याणरामन् हेंही सांगतात की पाकिस्तानातील-पंजाब भागात detailed investigations झालेलें आहे, आणि त्याचा निष्कर्ष असा आहे की , सिंधु व तिच्या उपनद्यांमधून जेवढें पाणी वाहून जातें, त्याच्या दसपट groundwater-reservoir ( भूगर्भजल-साठा) तेथें आहे.

६. जसें जेसलमेर भागात जमिनीखाली पुरातन-काळातील भूगर्भजल मिळालें आहे ; जसें पाकिस्तानातील पंजाब भागात प्रचुर भूगर्भजल आहे ; तसें, कदाचित, किंवा बहुतेक, गंगा-खोर्‍यातही असूं शकेल. गंगाखोर्‍यातही जर पुरातन-भूगर्भजलसंचय मिळाला, किंवा जमिनीखाली पुरातन-‘लुप्त’-नदी मिळाली, तर तिथेंही, वापरायला पाणी मुबलक मिळेल, आणि मग, धरणांमुळे गंगा-प्रवाहात कमतरता येण्याबद्दलची काळजी करायचें कारण रहाणार नाहीं.

७. मंत्रीजी उमा भारती यांच्यावर गंगेबद्दलची जबाबदारी आहे. तेव्हां, त्यांनी पुढाकार घेऊन, गंगा-खोर्‍यातील भूगर्भजलाच्या अभ्यासाला चालना द्यावी, वेग द्यावा. त्यातून प्राप्त होणार्‍या माहितीनें कदाचित गंगेच्या पाण्याचा प्रश्न सुटेलही !

– सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..