गणित शिकलंच आहेस तू,
तर बेरीज वजाबाकी करू.
त्या क्षणांची फक्त बेरीज करू
अन या क्षणांची वजाबाकी करू.
चन्द्रासमोरच्या ढगांना जरासे
प्राजक्ती कळ्यांनी बाजूला करू
दिव्यावरच्या या काजळीला
गुलाबी पाकळ्यांनी बाजूला करू.
आंदोलने विसरून जाऊ सारी
अन क्रांतीचा मार्ग प्रशस्त करू
शहारल्या कमलदलांना या
दवांनीच आता निर्धास्त करू.
चल सखे, पुन्हा एकदा जगू या
चंद्र-चांदण्यांशी गप्पा करू.
अन या लखलखत्या चंद्राला
त्या कोजागरीची आठवण करू.
मी काय म्हणतो आपण ना,
भागाकारच सरळ वजा करू.
बेरजेची साथ घेऊ मोठी
अन गुणाकार आपलासा करू.
कच्चं असलेलं माझं बीजगणित
आपण दोघं मिळून पक्कं करू
गणित शिकलंच आहेस तू,
तर एवढं आपण नक्की करू.
©️ चन्द्रहास शास्त्री
Leave a Reply