नवीन लेखन...

गणपती बसवला म्हणून बौद्ध धर्मातून बहिष्कृत!

घटनेतील धर्म स्वातंत्र्य धोक्यात येतंय का..?

कोणत्याही धर्मातील लोक देवाला का मानतात हो? कारण त्यांची देवावर श्रद्धा असते. प्रत्येक धर्माची आपल्या देवावर श्रद्धा बाळगण्याची वेगवेगळी पद्धती असते. त्याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये लोक आपल्या देवाची मूर्तीपूजा करून देवाप्रती असलेली आपली श्रद्धा दर्शवतात. त्यात वाईट असे काही नाही.

आता गणेशोत्सवाचं उदाहरण घ्या…गणपतीला मानणारा कोणीही मनुष्य हा देव आपल्याला एका रात्रीत श्रीमंत करणार किंवा आपल्याला कधीच काही होऊ देणार नाही या आशेने गणपती घरात बसवतच नाही. आता काळ बदलला आहे. लोकांच्या मनातील देव देखील बदलला आहे. त्यांना माहित आहे की, गणपती घरात बसवल्याने तो काही जादूची कांडी फिरवून आपली विघ्ने हरणार नाही आहे. पण तरीही गणपती बाप्पावर असलेली श्रद्धा, पाळली जाणारी एक परंपरा, त्याच्या घरातील आगमना मुळे निर्माण होणे चैतन्यमय वातावरण, प्रत्येक संकटात तो आपल्याला शक्ती देईल ही आशा मनात ठेवून लोक मनोभावे गणपतीचा उत्सव साजरा करतात.अश्या या भक्तांच्या श्रद्धेला उगाचच कर्मकांडपणाचे वा अंधश्रद्धेच रूप देऊन जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न यंदाच्या गणेशोत्सवामध्ये दिसून आला. तुम्हाला देखील कल्पना असेल–हिंदूच नाही तर विविध धर्मीय आपल्या घरी गणेशोत्सव साजरा करतात. त्यात बौद्ध धर्मीय हे देखील आलेच. तर महाराष्ट्रात काही बौद्ध धर्मियांनी आपल्या घरी गणपती बाप्पा बसवला किंवा त्यांनी गणेशोत्स वामध्ये सहभाग घेतला म्हणून त्यांच्याच समाजाने त्यांना वाळीत टाकण्याची धमकी दिली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सुशील दामोदर इंगोले यांना गणपती उत्सवात सहभागी का झालात, आपल्या धर्मात असलं काही चालत नाही असा दम देऊन त्यांच्याच समाजाकडून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. स्वत:ला बौध्द धर्माचे रक्षक म्हणवणाऱ्या गटांनी हा नवीन मूर्खपणा सुरु केला आहे. या गटांनी गणेशोत्सवाविरोधातील मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत. यात हे गट आपल्या बौध्द धर्मीयांना आवाहन करत आहेत की, त्यांच्या जवळपास कोणीही बौद्ध धर्मीय घरात गणपती बसवत असेल किंवा गणेशोत्सवात सहभागी होत असेल तर त्याला तसे करण्यापासून रोखा अन्यथा त्यांच्यावर प्रतिबंध लावा. त्यांच्यानुसार गणेशोत्सवामध्ये सहभागी होणे हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीच्या विपरीत आहे. या मेसेजमध्ये ते आंबेडकरांच्या २२ शपथांचा संदर्भ देतात आणि म्हणतात की, एका शपथेनुसार बाबसाहेब आंबेडकर म्हणाले होते की, माझा गौरी-गणपती किंवा हिंदू धर्मातील कोणत्याही देवावर विश्वास नसेल, ना मी त्यांची पूजा करेन.

सुशील दामोदर इंगोले ज्यांना वर सांगितल्याप्रमाणे गणेशोत्सवात सहभागी झाल्याबद्दल आपल्याच समाजाच्या लोकांकडून बोल खावे लागत आहेत ते म्हणतात की, मी माझ्या घरी गणपती बसवत नाही. मी ज्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्या शाळेतील गणपती उत्सवात मी गेल्या वर्षी सहभागी झालो होतो आणि म्हणून या वर्षी गणेशोत्सव सुरु झाल्यावर मी गेल्या वर्षीचा गणपतीचा फोटो माझा वॉट्सअप डीपी म्हणून ठेवला होता. पण कोण्या तरी समाज कंटकाने माझा नंबर सर्क्युलेट करून मी घरी गणपती बसवला आहे अशी अफवा उठवली आणि झालं तेव्हापासून मला महाराष्ट्रभरातून कॉल येऊ लागले, त्यात धमकीचे फोन देखील होते. काही फोन हे तर ओडीसा आणि उत्तर प्रदेशातून देखील आहे. हे सर्व थांबावे म्हणून मी पोलिसांत तक्रार देखील केली आहे.

पण मला कळत नाही गणपती उत्सव साजरा केला तर काय वाईट आहे..? माझे काही उच्च वर्णीय हिंदू मित्र आहेत जे माझ्यासोबत आंबेडकर जयंतीतही सहभागी होतात. आंबेडकरांच्या २२ शपथांचा मी आदर करतो. पण त्याच आंबेडकरांनी संविधानात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मर्जीने देवाची पूजा करण्याचे स्वातंत्र्य देखील दिले आहे.सुशील इंगोले यांच्यासारख्या सामान्य नागरीका व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्राला हसविणाऱ्या भाऊ कदम यांना देखील या मूर्ख समाजकंटकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. भाऊ कदम यांनी इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचे महत्त्व सांगण्याच्या उद्देशाने आपल्या नवीन घरात गणपती बाप्पाचे आगमन केले होते. पण हीच गोष्ट त्यांच्या बौद्ध धर्मीय समाज मंडळींना रुचली नाही आणि त्यांनी भाऊ कदम यांना ‘गद्दार’ घोषित करून त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन आपल्या समाज बांधवांना केले आहे. झालेल्या त्रासाने खचलेल्या भाऊ कदम यांच्यावर अखेर हार मानून आपल्या समाजाची माफी मागण्याची वेळ आली.

अजून एका प्रकरणात अंबरनाथ येथे राहणाऱ्या दशरथ जगताप यांनी आपल्या घरात गणपती बसवला म्हणून, भारतीय बुद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्या घरात जाऊन धुमाकूळ घातला आणि त्यांना धमकी दिली की, यापुढे जर घरात गणपती बसवला किंवा गणेशोत्सव साजरा केला तर जातीतून त्यांना हद्दपार करण्यात येईल. या धमकीने भेदरलेल्या जगताप कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी भारतीय बुद्ध महासभेला आपला माफीनामा सादर केला आणि आपली चूक कबुल केली. बौद्ध असून देखील नवी मुंबईचे अभय साबळे हे देखील कित्येक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहेत, पण पहिल्यांदाच आपल्याला अश्या धमक्या येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या उपरोक्त चार प्रकरणांवरून लक्षात येते की, भारतात धार्मिक तणाव किती वाढीस लागला आहे. हिंदू, मुस्लीम समाजावर त्याबाबत नेहमीच आरोप होत असतात, पण आता त्यात शांततप्रिय बौद्ध समाजाचा देखील क्रमांक लागला आहे हे नक्की…! उगाच काहीही कामधंदे नसताना हिंदू आणि बौद्ध समजामध्ये भांडण लावून देण्याचे काम करणाऱ्या या स्वयंघोषित रक्षकांना खाली गोष्टींबद्दल देखील स्पष्टीकरण द्यावे – खालील नमूद केलेल्या छायाचित्रात बौद्ध धर्माचे धर्मगुरू दलाई लामा चक्क शंकराला अभिषेक करतान दिसत आहेत.

बाबासाहेबांच्या विचारांचा प्रत्येक बिगर बौद्ध धर्मीय आदर करतो, कारण त्यांनी अमुल्य असे संविधान आपल्याला दिले आहे आणि त्याच संविधानाच्या आधारेच आपण आज लोकशाहीत वावरतो आहे. त्यामुळे बाबासाहेब संपूर्ण समाजाचे आहेत. त्याचप्रमाणे गणपती हा देखील संपूर्ण मानवजातीचा आहे. त्याच्यावर श्रद्धा असावी वा नसावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबद्दल कोणीही कोणाला ज्ञान शिकवू शकत नाही, कारण मुख्य गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनीच घटनेत धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. अश्या गोष्टी करून व्यक्तीचे धर्मस्वातंत्र्य धोक्यात येत आहे आणि आपणच बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान करत आहोत एवढी साधी गोष्ट ही त्यांच्या अनुयायांना कळू नये यापेक्षा हास्यास्पद गोष्ट नाही.

हा जर कर्मकांड होत असेल, उगाच अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक होत असेल तर त्याचा जरूर विरोध करा. हिंदू देखील अश्या गोष्टींबाबत तुम्हाला साथ देतील. पण उगाच गणपतीचा फोटो ठेवला किंवा गणपती घरात का बसवला असे तद्दन फालतू विषय उकरून काढून वाद घालू नये ही विनंती. या ठिणगी एवढ्या वाटणाऱ्या वादाचा कधी वणवा होईल आणि आपले राजकारणी त्यावर कशी पोळी भाजतील आणि आपण सामान्य त्यात कसे होरपळून जावू याची तुम्हालाही चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे हिंदू अनु बौद्ध धर्मातील सुजाण व्यक्तींनी वेळीच पुढे येऊन अश्या गोष्टींला आवर घातला पाहिजे.

— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..