नवीन लेखन...

गणपति : विज्ञानयुगीन उकल

प्रास्ताविक :

आजचें युग हें विज्ञानयुग आहे. आतां विज्ञानाच्या भिंगातून जुन्या संकल्पनांचें विश्लेषण होतें आहे. आपणही आतां विज्ञानाच्या कसोटीवर गणपतीचा विचार करणार आहोत.

गजाननाच्या सर्वमान्य रूपातील मुख्य घटक कोणते, तें सर्वप्रथम पाहू या. ते आहेत –

• हत्तीचें मस्तक ; म्हणजेच हत्तीसारखी सोंड व हत्तीप्रमाणे सुपासारखे कान
• हत्तीसारखा मोठा, पण एकच दात (सुळा, tusk) ; (एकदंत)
• स्थूल शरीर, विशाल उदर
• मूषक हें वाहन.

या घटकांचा विचार आपण पुढे करणारच आहोत.

‘गणांचा अधिपति’ याच अर्थाने गणेशाचा ऋग्वेदामधे उल्लेख आहे. ‘गणानां त्वा गणपतिम् हवामहे’ ही ती सुप्रसिद्ध ऋचा. ऋग्वेदकाळापासूनच, गजानन हा गणनायक आहे, गणाधिपती आहे, असें म्हटलें गेलेलें आहे. कृष्णयजुर्वेदात गणपतीला ‘दंती’ (म्हणजे, सुळा, tusk असलेला), ‘हस्तीमुख’ व ‘वक्रतुंड’ (वाकडी सोंड असलेला) असा उल्लेख केलेला आहे. महाभारताचा लेखनिक गणेश आहे, अशी आख्यायिका आहे. गणेश पुराण तर गणपतीशीच संबंधित आहे. ‘श्रीगणपतिअथर्वशीर्ष’ या स्तोत्रात गजाननाच्या, ‘गणपति, एकदंत, वक्रतुंड, शूर्पकर्ण, लंबोदर’, वगैरे नावांचा उल्लेख आहे, व ‘गँ गणपतये नम:’ असा मंत्रही आहे. अथर्वशीर्ष हें अथर्ववेदाचा एक भाग आहे, असे मानले जातें. अथर्वशीर्ष स्वत:ला एक उपनिषद म्हणवते. गजानन हा गणाधिपति आहे, म्हणूनच आपण गणपतीचे पूजन प्रत्येक विधीच्या आरंभी करतो. थोडक्यात काय, तर ऋग्वेदकालापासून आपल्याला गणपती आढळतो.

ऋग्वेदाचा काळ हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. परंतु, पुढे जाण्यापूर्वी आपण, आपल्या विषयाच्या अनुषंगानें ऋग्वेदकालाचा थोडासा आढावा घेऊ या, म्हणजे गणपतीची संकल्पना किती जुनी आहे, याचा अंदाज येईल. ऋग्वेदाचा काळ इ.स.पू. १५०० असा, १९व्या शतकातल्या पाश्चिमात्य विद्वानांनी मानलेला आहे, व आजही काही भारतीय विद्वानांची त्याला मान्यता आहे. ‘दि आर्यन डिबेट’ या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पुस्तकात विविध जुन्यानव्या विद्वानांच्या लेखांचे संकलन आहे, व त्यांत तो काल, इ.स.पू. १५००, इ.स.पू. २०००, इ.स.पू. २२०० असा वेगवेगळा मांडलेला आहे. काही अन्य भारतीय विद्वान ऋग्वेद त्याहून खूप प्राचीन आहे, असे मानतात, व भारतीय परंपराही तसेंच मानते. नक्षत्रतारकापुंजांच्या स्थितीबद्दलची कालक्रमणाच्या संदर्भातील गणिती समीकरणें मांडून, लोकमान्य टिळकांनी तो काळ इ.स.पू. ४५०० असा सप्रमाण दाखवून दिलेला आहे. ‘ऋग्वेदाचा मराठी शास्त्रीय अनुवाद’ या ग्रंथाचे लेखक डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रस्तावनेत उल्लेख केलेला आहे की, वेगवेगळ्या विद्वानांनी तो काळ इ.स.पू. २००० पेक्षा जुना मानला आहे; तर काहीं विद्वानांनी तो त्याहून बराच प्राचीन, अगदी इ.स.पू. २५००० पर्यंत नेलेला आहे. आपण जरी ऋग्वेदाचा काळ इ.स.पू. ४५०० किंवा अगदी इ.स.पू. २००० मानला, तरीही हा काल, अति-प्राचीन, इतिहासपूर्वकालच आहे.

ऋग्वेदीय कालापासून तत्कालीन ‘वैदिक-संस्कृत’ भाषकांचे ( ही भाषा, आर्ष-संस्कृत, छांदस्, देववाणी, देवी-वाक् इत्यादी नांवांनीही ओळखली जाते) व ‘द्रविडियन’ (पुरातकालीन तमिळ?) भाषाभाषकांचे संबंध होते, व कदाचित एकात्म्यही होते, असा अभ्यासकांनी निष्कर्ष काढलेला आहे. (द्रविडीय भाषा आज आपल्याला दक्षिण भारत, व उत्तर भारताचा काही विशिष्ट भाग येथे आढळतात. बलुचिस्तानमधील काही जमातीसुद्धा ब्राहुई नांवाची द्रविडीय भाषा बोलतात!). म्हणून आपण दाक्षिणात्य भाषांमधेही डोकावून पाहू या. तमिळमधे गणेशाला ‘पिल्ले’ व ‘पिल्लइयार’ अशीही नामें आहेत. द्रविडीय (दाक्षिणात्य) भाषांमधे ‘पल्लू’, ‘पेल्ला’, ‘पेल्ल’ म्हणजे, दात किंवा हत्तीचा सुळा . म्हणजे, द्रविडीय भाषांमधेसुद्धा गणेशाचा संबध हत्तीशी जोडलेला आहे.

या सर्व विश्लेषणावरून, असे समजायला हरकत नाहीं की संस्कृत, आर्ष-संस्कृत तसेंच द्रविडीय, या सर्व भाषा-भाषक जनांमधे शतकानुशतकें वर उल्लेखलेले गणेशाचे रूप प्रचलित आहे. याचाच अर्थ असा की, गेली किमान ३५००-४५०० वर्षें तरी, किंवा त्याहूनही बर्‍याच आधीपासून, म्हणजेच इतिहासपूर्व अतिपुरातनकालापासून, गणपतीचें हें रूप भारतात सर्वमान्य आहे. (हें रूप लिखित स्वरूपात किंवा शिल्पांच्या स्वरूपात, वेदोपनिषदांनंतरच्या काळात दिसलेले असले तरी, ती मौखिक परंपरा त्याहून खूपच प्राचीन असली पाहिजे, याबद्दल कसलाही संदेह असू नये. अशी सर्वमान्य मौखिक परंपरा असल्याशिवाय, तें रूप लिखित स्वरूपात व शिल्पांमधे येणेच शक्य नाहीं). तेव्हां, गजाननाचें असें रूप सर्व जनांनी इतकी शतकें-सहस्त्रकें मानण्यामागे काहींतरी ‘लॉजिकल’ कारण नक्कीच असलेंच पाहिजे. मिथकें बाजूला सारून, तर्काधारानें यामागील विज्ञानाधारित स्पष्टीकरण शोधतां येतें कां, व तें काय असू शकेल, याचा विचार आपण करणार आहोत.

भारतीय देवच नव्हे, तर ग्रीको-रोमन संस्कृतीमधील देवही माणसाप्रमाणे वागतात; त्याचें कारण काय असावें ? एरिक फॉन डेनिकेन, चार्लस् बर्लिटझ् वगैरें लेखकांनी या विषयावर बराच अभ्यास व लिखाण केलेलें आहे. (पहा : डिनिकेन यांचे, ‘चॅरिएटस् ऑफ दि गॉडस्?’ हें पुस्तक, व बर्लिटझ् याचें ‘मिस्टरीज् फ्रॉम फॉरगॉटन् वर्ल्डस्’ हें पुस्तक ). डेनिकेन यांच्या लिखाणातील मूळ सिद्धांत असा आहे की, पृथ्वीवर अवतरलेले ‘देव’ म्हणजे परग्रहावरून आलेले अवकाशप्रवासी (अंतराळयात्री) होत. या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ त्यांनी, जगभरातल्या विभिन्न देशांमधील व विविध संस्कृतींमधील, भिन्नभिन्न कालखंडांतील, अनेक उदाहरणें प्रस्तुत केलेली आहेत. परंतु, त्यांच्या यादीत, रामायणातील पुष्पक विमान व महाभारतातील ब्रह्मास्त्र यांखेरीज अन्य भारतीय संदर्भ सहसा नसतात. अर्थातच, याचें एकमात्र कारण हेंच आहे की, त्यांनी भारतीय संस्कृतीचा पुरेसा अभ्यास केलेला नाहीं. परंतु, आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून त्या अंगानें विचार केला तर, आपल्याला त्याप्रकारची भारतीय परंपरेतील अनेक उदाहरणें सापडतात. अन्य उदाहरणांविषयी पुन्हां केव्हांतरी चर्चा करू. तूर्तास, आपण गजाननाचा त्या दृष्टीकोनातून विचार करू या.

[ कृपया नोंद घ्यावी की, यानंतरच्या सर्व विवरणात ठिकठिकाणी, हल्ली प्रचलित असलेल्या व सर्वज्ञात असलेल्या इंग्रजी संज्ञांचा वापर केलेला आहे. या सर्व संकल्पनाच आधुनिक आहेत. त्यामुळे अशा शब्दांना भारतीय भाषांमधे प्रतिशब्द असतातच असे नाहीं; किंवा निर्माण केलेले असल्यास, ते रुळलेले नसतात, आपल्या रोजच्या बोलण्यात ते येत नाहींत.]

— सुभाष स. नाईक.
मुंबई.
M – 9869002126.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..