मृदंग घुमतो , घुंगुरनादीं वीणेचा झंकार
नगराजावर गणरायाचा विलसे नृत्यविहार ।।
खलनिर्मूलन विघ्ननिवारण पळभर ठेवुन मागे
श्रीगणनायक बह्मांडाचा-पालक नाचूं लागे
पदन्यासातुन युगभाग्या करि जागृत जगताधार ।।
नाचतसे वक्रतुंड , नाचे अंग अंग त्याचें
नाचतात पद, भुजा नाचती , विशाल तन नाचे
नयनांमधुनी उल्हासाचा नर्तन-आविष्कार ।।
सुपासारखे कान नाचती, पुष्ट नाचते सोंड
ओठ नाचती, गाल नाचती, झुलत नाचते दोंद
पीतांबर उत्तरीय गिरक्या घेती गोलाकार ।।
शंख, दंत-क्षत, पाश, गदा, शर, परशू, अंकुश, शूल,
बाहुबंध, मुद्रिका, गळ्यातिल नाचे फूल-न्-फूल
कर्णभूषणें, मेखला नि रक्तिम-रत्नांचा हार ।।
–
वरदहस्त-स्थित लोंबीसह मोदक-पात्रें उदंड
भाळीं गंध नि देहीं चंदन-उटी नाचती थंड
मुगुट नाचतो माथीं, नाचे दाट केशसंभार ।।
भान हरपुनी मग्न नर्तनीं सरस्वतीचा पती
स्वत:स विसरुन नाचत गण, मूषक-वाहन संगती
क्षणाक्षणाला करत अलंकृत नवनव नृत्यप्रकार ।।
नाचत पानें, पुष्प, लता, तृण, तरू, नद्या, निर्झरऽ
भू, सिंधू, पशु-पक्षि मत्स्य , रवि-शशि तारे अंबरऽ
सप्तलोक-दशदिशातुनी ओंकार घेइ आकार ।।
करतो नर्तन गिरिजानंदन सदाशिवाचा पुत्र
पाहत राही जगत् अचंबित, थांबत दिवस नि रात्र
दर्शन अनादि-अनंत यांचें हर्षद अपरंपार ।।
अनुभव असा अलौकिक हा, अस्तित्वच होई झंकृत
जागतसे शब्दांच्याही पलिकडला नाद-अनाहत
नाचे जेव्हां ब्रह्म निर्गुणी, बनुन सगुण-साकार ।।
– – –
नगराज : हिमालय पर्वत
–
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply