आत्तापर्यंत संपूर्ण देशभर हिंडून मी गायलो होतो. भारताबाहेर कार्यक्रम सादर करण्याची माझी इच्छा होती. त्या दृष्टीने मी प्रयत्नही केले होते, पण एक अडचण येत होती. काही कार्यक्रमाचे दौरे काही महिन्यांचे होते. इतके दिवस कंपनीची कामे थांबवून देशाबाहेर राहणे मला अशक्य होते. गायिका रंजना जोगळेकरबरोबर अमेरिका दौऱ्याची संधी देखील आली होती. पण तो दौराही अडीच महिन्यांचा असल्याने मला जाता आले नव्हते. कारणे काहीही असोत, पण अजूनपर्यंत मी परदेशात गायलो नव्हतो, ही गोष्ट खरी होती. ‘मुक्काम पोस्ट एक हजार’ या प्रोजेक्टमध्ये काही कार्यक्रम तरी परदेशात व्हायलाच हवे होते. नाही तर कार्यक्रमांची भौगोलिक व्याप्ती साधणार नव्हती. माझे एक हजार कार्यक्रम मी संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेरील विविध देशात सादर करीन, असे मी प्रोजेक्टमध्ये लिहिले होते, पण तसे घडले मात्र नव्हते. अशा वेळी एअर इंडियाचे अधिकारी श्री. कुलकर्णी यांचा फोन आला. यापूर्वी एअर इंडिया एक्झीक्युटीव्ह क्लबसाठी त्यांनी माझा कार्यक्रम केला होता. सिंगापूरमधील आयोजकांच्या मदतीने सिंगापूरमध्ये दोन कार्यक्रम करण्याचा प्रस्ताव होता. कार्यक्रम करून एका आठवड्यातच परत यायचे होते. मी अगदी आनंदाने होकार दिला. माझ्या मनातील इच्छाच कुलकर्णीसाहेब पूर्ण करीत होते. मी कशाला नाही म्हणेन? वादक कलाकार सिंगापूरमधीलच असणार होते. कुलकर्णीसाहेब स्वतः माझ्याबरोबर येणार होते. लवकरच आम्ही सिंगापूरला निघालो. हा माझा पहिलाच परदेश प्रवास आणि गाण्याचा पहिलाच परदेश दौरा होता. परदेशातील वादक कलाकारांबरोबर गाणे हा सुद्धा एक नवीन अनुभव होता.एक कार्यक्रम हिंदी गज़लचा, तर दुसरा हिंदी भजनांचा होता. दोन्ही कार्यक्रम छान झाले. संपूर्ण सिंगापूर हिंडणे झाले. एकंदर पहिला परदेश दौरा एकदम यशस्वी झाला.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply