महाभारतामध्ये ‘अभिमन्यू’ ची भूमिका सर्वांना माहितच असेल. गर्भामध्ये राहून चक्रव्यूहचे ज्ञान घेणारा हा अभिमन्यू आपण कसा विसरू शकतो. जन्माला येण्यापूर्वीच इतकी मोठी विद्या आत्मसात करू शकतो. हे कधी-कधी नवलच वाटायचे, पण आज हे सत्य आपण सर्वांनाच समजून चुकले आहे. संस्कारांचे बीजारोपण जन्मानंतर नाही परंतु जन्मापूर्वीच आपण करावे व ते कसे करावे, त्याचे महत्व आपण जाणून घ्यावे.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये संस्काराचे महत्व आहे. जसे संस्कार तसा स्वभाव, व्यवहार आणि त्यानुसार जीवन दिसून येते. आपण बघितले असेलच की घरामध्ये जितके सदस्य आहेत प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे आहेत. लहानपणापासून आई-वडील आपल्या मुलांवर एकसारखे संस्कार देतात तरीसुद्धा प्रत्येकाचा व्यवहार, विचार करण्याची पद्धती, आवड-निवड….. निराळी असते. आज समाजामध्ये गर्भ-संस्काराचे खूप महत्व आहे. सर्वप्रथम आपल्याला हे समजून घेणे गरजेचे आहे की हे संस्कार नक्की कोणावर घडवले जातात. शरीरावर की शरीरामध्ये असलेल्या आत्म्यावर ज्याला विज्ञानाने ‘soul’ ‘energy’ ह्या नावाने संबोधले आहे.
शरीर हे एक साधन आहे ज्याला ‘आत्मा’ ही शक्ती चालवते. प्रत्येक जन्मामध्ये जे आपण अनुभवले, त्या जन्मीचे जे जन्मदाता मिळाले त्याचे संस्कार, परिस्थिती अनुसार जो स्वभाव बनला, ज्या प्रकारच्या सवयी स्वतःला लावल्या…… असे खूप काही आत्मा मरणोत्तर स्वतः बरोबर घेऊन जाते. फक्त एका जन्माचे नाही पण कितीतरी जन्मांचे संमिश्रण प्रत्येकामध्ये आहे. जन्मानंतर मृत्यू आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म अशा चक्रामध्ये सर्वच बांधले गेले आहेत. पण एखादी गर्भवती महिला जेव्हा नव्याने त्या आत्म्याचे स्वागत करते तेव्हा अनेक प्रकारची काळजी त्या जन्मप्रसंगासाठी घ्यावी लागते.
शरीराचे अवयव छोटे असले तरी त्या आत्म्यामध्ये पूर्वजन्माचे खूप काही भरलेले असते म्हणून लहान मुलांना आपण विनाकारण हसताना किंवा रडताना बघतो. जन्माला आल्यानंतर खूप काही शिकवण्यापेक्षा गर्भामध्ये असतानाही संस्कार घडवावे ही खूप चांगली समज आज पालकांमध्ये जागृत होत आहे.
खूप वर्षाचा प्रवास करून आत्मा गर्भामध्ये प्रवेश करते. त्या आत्म्याचे जसे कर्म, संस्कार असतील त्या अनुसार त्या शरीराची रचना होते. म्हणूनच काही मुले जन्मताच आंधळे, बहिरे, पांगळे, मंदबुद्धी ….. जन्माला येतात. त्यापाठीमागे काही कारणे बनतात परंतु आत्म्याचे कर्म काम करतात हे मात्र गूढ सत्य आहे. त्या आत्म्याने गर्भामध्ये प्रवेश केल्यानंतर आईला सुद्धा स्वतःच्या विचारांवर, मनोदशेवर (mood), जेवणावर …… लक्ष्य द्यावे लागते. विचारांची ऊर्जा सतत त्या बाळापर्यंत पोहोचत असते. जर ती कोणाविषयी नकारात्मक असेल तर त्या बाळामध्ये सुद्धा त्या व्यक्तीबद्दल तसेच विचार निर्माण होतात. बाळ जन्माला येण्याच्या आधीच गर्भामध्ये बसून बाहेरचे वातावरण, होणारी चर्चा ह्या सर्वांना अनुभवत असतो. म्हणूनच प्रत्येक संबंधांप्रति त्याच्यामध्ये जिव्हाळा, आपुलकी, प्रेम निर्माण करण्याची हीच वेळ आहे. त्याचबरोबर पूर्वजन्माचे कोणतेही संस्कार असो जर नियमित काही चांगले विचार त्या बाळापर्यंत पोहोचवले तर त्याला समजण्याची क्षमता ही त्यावेळी त्या आत्म्यामध्ये असते.
आज parenting हा सर्वात मोठा जॉब आहे. सर्व पालकांची ही तक्रार आहे की मुलं ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, खूप तुफानी आहेत….. मला जर माझं बाळ गुणी हवं असेल तर त्याला रोज ‘ तू शांत आहेस … गुणी आहेस …. माझी प्रत्येक गोष्ट तू ऐकत आहेस …… मी जे तुला सांगेन ते सर्व काही तू करत आहेस……..’ असे विचार त्याला रोज देण्याची आवश्यकता आहे.
कधी-कधी असे ही जाणवते की आईचा जो मनपसंद पदार्थ आहे पण त्या दिवसांमध्ये नावडता पदार्थ खाण्याची इच्छा वारंवार होते म्हणजेच त्या बाळाची अर्थात त्या आत्म्याची ती पूर्वजन्माची आवड असेल म्हणूनच ते खाण्याची जबरदस्त इच्छा होते. कारण आपला स्वभाव आणि येणाऱ्या बाळाचा स्वभाव वेगळा असू शकतो. आपल्या घरामध्ये येणारा हा नवीन पाहुणा आपल्या वातावरणामध्ये ढळण्यासाठी विचारांची सकारात्मक ऊर्जा वेळोवेळी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. जो दृष्टिकोन घेऊन आपण जगतो त्या दृष्टिकोनानेच ते बाळ ही जीवनाला बघू लागते. भले कितीही दुःख पुनर्जन्मामध्ये त्याने सोसले असतील पण आपण त्याची खूप देखभाल करणार आहोत, खूप प्रेम त्याला आपण देणार आहोत अशी निश्चिन्तता त्याला करून द्यावी जेणेकरून त्याची मानसिक आणि शारीरिक वाढ होण्यास मदत मिळेल.
शारीरिक पोषणाबरोबर मानसिक पोषणावर ही ध्यान असावे. आपली मानसिक स्थिति त्या बाळाच्या संपूर्ण जीवनावर effect करते. आपण खुश तर आपले बाळ ही खुश राहिलं हे लक्षात ठेवावे. एक आत्मा नव्याने जीवन सुरु करण्यासाठी माझ्याकडे जन्म घेत आहे. सर्व प्रथम त्याचा प्रेमाने स्वीकार करावा. मुलगा असो वा मुलगी मला पसंद आहे. ही विचारांची ऊब मिळत राहिली तर जन्म ही स्वाभाविक आणि सहज होईल. गर्भसंस्कार म्हणजेच बीजारोपण. शक्तिशाली, प्रेमळ, सकारात्मक विचारांचे खतपाणी त्या आत्म्याला देण्याची वेळ. ह्या कार्याला मनापासून स्नेहाने पार पाडा.
— ब्रह्माकुमारी नीता
Leave a Reply