तांबडं फुटताच गाडी
यायची आमच्या फाट्याला
सुरूवात व्हायची सडा सारवणाला
अन् वेग यायचा जात्याला
लहानपणी मांडीवर बसल्यामुळे
तिकिट नाही काढायचे
शिटावर बसण्यासाठी
आम्ही मात्र रडायचे
गरीब श्रीमंत करीत
नव्हती कसलाच भेदभाव
मार्गावरला एकही सुना
सोडत नव्हती गाव
वृद्ध ,अपंग व महिलांना
जागा असायची राखीव
आदर करावा सर्वांचा
करून द्यायची जाणीव
माळरान,डोंगरदऱ्या तुडवीत
जायची सुखरूप घेऊन
पडत्या पावसात बिचारी
स्वतः निघायची न्हाऊन
लालपरीच एकमेव
होती गरीबाची गाडी
खिडकीतून बघितल्यावर
दिसायची पळणारी झाडी
अर्ध्यातिकिटामध्ये तिनं
प्रवास केला सुखाचा
पाहुण्यांच्या घरी राहण्याचा
आनंद दिला मुक्कामाचा
तू येत नसल्यामुळे आता
वेग जात्याला येत नाही
फुटलं जरी तांबडं
वेळ माञ कळत नाही..!
— सुभाष ञ्यंबक दुष्यंत.
Leave a Reply