२००९ वर्षाची सुरुवात ‘गानहिरा’ या सुगम संगीत स्पर्धेच्या परीक्षणाने झाली. दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. परीक्षक म्हणून माझ्याबरोबर संगीतकार कौशल इनामदार होता. ‘अरे, तुझ्याबरोबर एका महत्त्वाच्या प्रोजेक्टबद्दल बोलायचे आहे. स्पर्धेनंतर जेवायलाच जाऊ या.’ कौशल म्हणाला. ‘मराठी अस्मिता’साठी कौशल ‘मराठी अभिमान गीत’ रेकॉर्ड करणार होता. ख्यातनाम कवी सुरेश भट यांचे शब्द होते ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.’ मराठी आणि हिंदीतले अनेक मान्यवर गायक यात एक-एक ओळ सोलो गाणार होते आणि बराच मोठा कोरस असणार होता. ‘या रेकॉर्डिंगमध्ये तुझा आवाज मला हवा आहे.’ कौशल म्हणाला. ‘नक्कीच मी गाणार! पण मला सांग, या एवढ्या मोठ्या रेकॉर्डिंगचा खर्च कसा करणार?’ मी विचारले. ‘अनिरुद्ध, तू फक्त गाताना भावनिक असतोस. गाणे संपले की लगेच व्यवहारी विचार करायला लागतोस!’ कौशलने मला हाणले. ‘पण तुझा प्रश्न बरोबर आहे. यासाठी मी प्रत्येकाकडून ५०० रुपये घेणार आहे. त्याबद्दल त्यांना या रेकॉर्डिंगची सीडी घरपोच पाठवली जाईल. या सीडीला कोणीही प्रायोजक असणार नाही. मराठीचा रास्त अभिमान बाळगणाऱ्या मराठी रसिकांच्या पाठिंब्यावरच ही सीडी बनेल.’
कौशलने उत्तर दिले. मला माझ्या या संगीतकार मित्राचा अभिमान वाटला. एका वेगळ्याच दिशेने विचार करण्याची क्षमता कौशलमध्ये आहे. ‘मराठी अभिमान गीताआधी मला तुझाच अभिमान वाटतो आहे. हे माझे ५०० रुपये. रेकॉर्डिंगला कधी येऊ?’ मी विचारले. ‘रेकॉर्डिंगच्या आधी रसिकांकडून सीडीचे पैसे घेणारा आणि गायकाकडून रेकॉर्डिंगचे पैसे घेणारा संगीतकार पाहिला आहेस का कधी?’ कौशलने हसत हसत विचारले. ‘असा प्रोजेक्ट हातात घ्यायला हिंमत लागते. असा हिंमतबहाहर संगीतकार रोज रोज थोडा पहायला मिळणार?’ आम्ही दोघेही हसायला लागलो. काही दिवसांनीच मी ‘गर्जते मराठी’चे रेकॉर्डिंग केले. एकूण ७३ मान्यवर कलाकार यासाठी गायले. नंतर मुंबईच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये ३५० जणांचा कोरस रेकॉर्ड करण्यात आला. यामध्ये आमच्या ‘स्वर-मंच’ ॲकॅडमीचे चाळीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गायले. हा सर्वच एक विलक्षण अनुभव होता. यासाठी कौशलला धन्यवाद!
यानंतर एक आगळावेगळा कार्यक्रम मला मिळाला. ॲकॅडमीत मी गाणे शिकवत असताना माझी पत्रकार विद्यार्थिनी तृप्ती दोंदे हिचा फोन आला.
“सर, आमच्या साम चॅनलसाठी एक कार्यक्रम कराल?” तिने विचारले. “जरूर, पण तुमचे चॅनल मराठी आहे, तेव्हा मराठी गजल, भावगीते की अभंग? ” मी विचारले.
“सर, कार्यक्रम गाण्याचा नाहीये. गुंतवणूकविषयक आहे. ‘घरगुती खर्चाचे नियोजन’ या विषयावर फोनवरून प्रेक्षक थेट प्रश्न विचारतील, एक आर्थिक गुंतवणूकतज्ज्ञ म्हणून त्याची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत.” तृप्ती म्हणाली. आत्तापर्यंत आर्थिक गुंतवणूक क्षेत्रात मी भरपूर काम केले होते. या विषयावर भाषणेही दिली होती. पण आता प्रेक्षकांकडून थेट प्रश्न येणार होते. काम अवघड होते. मी संमती दिली. या विषयावर भरपूर वाचन केले. प्रेक्षकांनीही अनेक प्रश्न विचारून माझी परीक्षाच घेतली. पण मी त्यांना समाधानकारक उत्तरे देऊ शकलो. एक मात्र मान्य करतो की गाण्याच्या कार्यक्रमापेक्षा बरेच जास्त टेन्शन मला आले होते. कार्यक्रम छान पार पडला. दुःख एकच होते की हा कार्यक्रम मी गाण्याच्या कार्यक्रमात मोजू शकणार नव्हतो.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply