पूर्वीच्या काळात चार आण्याला आगपेटी मिळायची. अजूनही ती मिळते पण आता तिचा वापर फारसा होत नाही, कारण घरोघरी गॅस पेटवण्यासाठी आपण गॅस लायटरचा वापर करतो.
गॅस लायटर हे साधन तसे सुटसुटीत व बहुपयोगी आहे यात शंका नाही. हे गॅस लायटर काम करतो तो पिझो इलेक्ट्रीक इफेक्टच्या तत्त्वावर. हा परिणाम साध्य करणारे जे स्फटिक असतात त्यांना पिझो इलेक्ट्रीक क्रिस्टल असे म्हणतात.
पिझो इलेक्ट्रीक परिणाम हा १८८०-८१ च्या सुमारास पिअर क्युरी यांनी टरमॉलिन, साखर, व क्वार्ट्झ यांचा अभ्यास करीत असताना शोधून काढला होता. या स्फटिकांच्या एका अक्षावर दाब दिला गेला तर व्होल्टेज निर्माण होते पण त्याची दिशा मात्र छेदिकेला समांतर असते.
या स्फटिकाला आपण व्होल्टेज दिले तर उलट परिणाम घडून आडव्या दिशेने स्फटिक भंगतो. आजच्या काळात पिझो गुणधर्म असलेले अनेक पदार्थ शोधून काढण्यात आले आहेत, ते पूर्वीच्या स्फटिकापेक्षा जास्त चांगले काम देतात. झेड कट स्फटिक हा जास्तीत जास्त उपकरणांमध्ये वापरला जातो. अतिशय उच्च यांत्रिक व रासायनिक स्थिरता लाभलेले हे स्फटिक अधिक अचूक अशा दोलकांमध्ये (ऑसिलेटर) वापरले जातात. हे ऑसिलेटर्स क्वार्ट्स घड्याळे व गॅस लायटरमध्येही वापरले जातात.
गॅस लायटरमध्ये पिझो इलेक्ट्रीक सेरॅमिक्स म्हणजेच झिरकोनेट टिटॅनेट हा पिझो इलेक्ट्रिक घटक म्हणून वापरला जातो, स्वस्त व अतिसंवेदनशील असतो. अतिशय अचूक मापने गरजेचे असतात अशा उपकरणात पिझो स्फटिकांचा वापर केला जातो.
गॅस लायटरमध्ये स्प्रिंग लावलेला एक हातोडा आपण वापरत असतो. आपण गॅस लायटर वापरतो तेव्हा त्यातील पिझो इलेक्ट्रिक स्फटिकावर आघात होतो. त्या दाबामुळे उच्च व्होल्टेज निर्माण होते व त्याची क्षमता जास्त असते. या गॅस लायटरमध्ये अशी रचना असते की, ज्यामुळे दोन धातू बिंदूंच्या मधील पोकळीला हे व्होल्टेज मिळते व ठिणगी पडते, त्यामुळे गॅस लगेच पेट घेतो.
गॅस लायटर ५० ते ८० रुपयांपर्यंत उपलब्ध असतात. पण आता गॅस लायटर वापरावा लागत नाही, अशा गॅसच्या शेगड्या निघाल्या आहेत, त्यात काहीसा धोका मात्र आहे कारण बटन फिरवतानाच गॅस पेटवण्याची व्यवस्था त्यात आहे, त्यामुळे घाईगर्दीत चूक होऊ शकते.
Leave a Reply