‘मराठी सृष्टी’ वेबसाईटवर मृदुला बर्वे यांचा, दिव्याच्या अवसेबद्दलचा लेख वाचला. माहितीपूर्ण आहे. हल्लीच्या पिढीला , घाईगडबडीच्या जीवनात आपल्या सणांची विशेष माहिती नसते. त्यांच्यासाठी एक सांस्कृतिक माहिती म्हणून हा लेख नक्कीच उपलब्ध आहे.
या वर्षीं, २३ जुलैला दिव्याची अमावास्या होती. हा बाळ गंगाधर टिळक यांचा जयंती-दिवसही आहे. त्याच्या just आधी , २१ तारखेला संत नामदेव महाराज पुण्यतिथी , व २२ जुलैला संत सावता माळी पुण्यतिथी होती. हा सर्व दुग्धशर्करायोगच म्हणायचा.
पण, या दिव्याच्या अमावास्येला ‘गटारी’ अमावास्या कां म्हणतात, असा प्रश्न पडतो. मराठी विकिपीडियावरही , फक्त दिव्याच्या अमावास्येची माहिती ( आणि, फक्त तेवढीच ) उपलब्ध आहे. ‘गटारी’या नांवाचा उल्लेख आहे, पण तें नांव कां-कसें पडलें, याबद्दल माहिती दिलेली नाहीं. कदाचित, मराठी संस्कृतीचा, मराठी सणांचा इतिहास ज्यांत दिलेला आहे, अशी पुस्तकें यावर कांहीं प्रकाश टाकूं शकतील. ती मी पाहिलेली नाहींत. पण, माझ्या विचारांमधून जें analysis आलें , तें येथें देत आहे.
‘गटार’ हा शब्द इंग्रजीतून आला हें उघड आहे. याचा अर्थ असा की इंग्रजी राजवट सुरूं झाल्यानंतरच ‘गटारी’ अमावास्या असें नांव रूढ झालें असणार , म्हणजेच १८५७ नंतर, आणि बहुश: १९व्या शतकाच्या अखेरच्या काळात किंवा २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात.
जसें की सर्वांना माहीत आहे, इंग्रजीत हा शब्द gutter असा आहे. Oxford English-Marathi Dictionary (सं. – रमेश वा. धोंगडे) या शब्दाचा अर्थ असा देते : पन्हळ, रस्त्याच्या बाजूचें पावसाचें पाणी वाहून नेणारे गटार ; निकृष्ट जीवन, हलाखी .
[ मात्र, आज गटारें कायमच घाण पाण्यानें भरलेली असतात ; ती कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, कागदांचे बोळे वगैरेंनी भरून गेलेली असातात. पण, १००-१२५ वर्षांपूर्वी तसें खचित नसणार. ]
दिव्याची अवस जर आपलें जीवन उजळून टाकते, तर मग हा ‘गटाराचा’ उल्लेख कशासाठी ? याचें स्पष्टीकरण शोधतांना, मला एक उदाहरण सुचतें, तें असें : उदाहरण आहे होळी या सणाचें. होळीचा सांस्कृतिक-धार्मिक संदर्भ सर्वांना माहीतच आहे, तो विशद करून सांगायची जरूर नाहीं. पण होळीला आणखीही कांहींतरी घडण्याची परंपरा आहे ( ती चांगली की वाईट, याची चर्चा आपण तूर्तास करत नाहीं आहोत). ती परंपरा म्हणजे, ‘बोंब’ मारणें, शिव्या देणें, व दारूपान करणें. बोंब व शिव्या यांचें यांचें एक (psychlological) कारण असें असावें की त्यामुळे मनातली frustrations दूर व्हायला वाव मिळतो, व पुन्हां माणूस नव्या जोमानें , normal वाटून, जीवनाला तोंड द्यायला सज्ज होतो. असो. आपण होळीची चर्चा करत नसून, ‘गटारी’च्या चर्चेसाठी तें एक उदाहरण म्हणून घेतलें आहे.
जसें आपण होळीचें पाहिलें, तसा कांहीं दडलेला अर्थ ‘गटारी’ या नांवात आहे काय ?
पहिली शक्यता म्हणजे : दिव्यांनी आपलें जीवन उजळून टाकलें जातें, याचा अप्रत्यक्ष अर्थ आहे की, आपलें जीवन त्याआधी अंधारें, निकृष्ट असतें. आपण आधी पाहिलेंच आहे की, gutter याचा एक अर्थ, निकृष्ट जीवन, हलाखीची परिस्थिती, असा होतो. तर, अशा या ‘निकृष्ट’ जीवनाच्या संदर्भात, या दिव्यांनी उजळून टाकणार्या रात्रीला ‘गटारी’ असें संबोधलें असेल काय ?
दुसरी एक शक्यता अशी : गटारें जशी अतिरिक्त पाणी वाहून नेतात, तशी ‘गटारी’ (अमावास्या) मनात साचलेल्या, भरून वाहणार्या ‘अपायकारक भावने’चा निचरा करायला उपयुक्त असेल काय ? अशा , त्याकाळच्या ‘अपायकारक भावना’ म्हणजे, राज्यकर्त्या इंग्रजांविरुद्धचा राग, त्यांच्याविरुद्ध कांहींही न करूं शकण्याबद्दलची हतबलता व frustration, आणि त्यामुळे आलेली असुरक्षिततेची भावना. ध्यानात घ्या, हाच तो काळ की ज्या काळी इंगजी साम्राज्यावर सूर्य मावळत नसे. तर मग, साधारण माणूस त्यांच्याविरुद्ध काय लढणार ? मात्र, लढतां आलें नाहीं तरी, इंग्रजांच्या नांवानें बोटें मोडणें, हें तर शक्य होतेंच.
त्याव्यतिक्त असा अर्थही असूं शकेल की , जसें गटारातून वाहून जाऊन पाण्याचा निचरा होतो, तसेंच, या इंग्रजांचें राज्य वाहून जाऊन निचरा व्हावा.
या ‘गटारी’ नांवावर कुणी आणखी प्रकाश टाकला, किंवा कांहीं वेगळी theory, वेगळी माहिती पुरवली, तर तें नक्कीच उपयुक्त ठरेल.
– सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
Leave a Reply