ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार श्री प्रकाश बाळ जोशी यांचे गेटवे हे पुस्तक म्हणजे शहरी जीवनावर मार्मिक टिपणी करणाऱ्या मराठी शब्दचित्र व रेखाचित्रांचा संग्रह आहे. या पुस्तकातील कथा आता मराठीसृष्टीवर क्रमश: प्रकाशित करत आहोत.
मुंबईत आलो त्यावेळी पेन आणि पेन्सील दोन्ही बरोबर घेऊन आलो. सर्वच गोष्टी नवीन होत्या घराबाहेर पडल्यावर असंख्य प्रकारचा जीवन संघर्ष बघायला मिळतो. मुंबई महानगर हे एक मायाबाजार आहे. त्यात सत्य काय आणि आभास कोणता हे कळणं जवळजवळ अशक्यच आहे.
पत्रकारिता करीत असल्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यात फिरण्याची संधी मिळाली. प्रत्येक वेळेला वेगळा रंग, वेगळा आशय जाणवला. तो लिहिणं शक्य नव्हतं. त्यामुळे ज्या काही गोष्टी, व्यक्ती, प्रसंग अतिशय प्रकर्षाने जाणवले ते त्यावेळी लिहून ठेवले. ते शब्दांचे पुंजके होते. त्याला आकार नव्हता. काही वेळी तर आशय सुध्दा नव्हता.
लिहिता लिहिता लेखणी स्तब्ध व्हायची आणि जे शब्दात मांडता येत नव्हतं ते अलगदपणे चित्रांच्या माध्यमातनं कागदावर अवतरायच. चित्र म्हणण सुध्दा थोडस अतिशयोक्ती वाटेल अशा केवळ काही ठळक रेषाच कागदावर आलेल्या असायच्या. शब्द केव्हा थांबत आणि रेषा केव्हा सुरु होते हे कळायचसुध्दा नाही.
हे सगळं टिपण करत राहिलो. पण ते स्वत: पुरतंच मर्यादित होत. पण त्यातही सातत्य होतं. तसं पाहिलं तर मुंबई रोजच बदलत असते. नवीन लोक येतात. अगदी स्टेशनच्या बाहेर उभ राहून पाहिल्यास रोज काही ना काही बदल दिसल्याशिवाय रहात नाही.
लेखणी आणि पेन्सील यांच्या सहाय्याने जे काही दिसलं, जाणवलं आणि शब्दांकित करावस वाटले ते करीत गेलो.
त्यामुळे आधी लेख लिहिला आणि मग त्यासाठी चित्र काढले अस कधी घडल नाही. शब्द आणि चित्र एकाच झपाटयात कागदावर उतरली. खर तर माझ्या मनात शब्द संपून रेखाटण केव्हा तयार झाल याची जाणीवही झाली नाही. शब्द सुध्दा एका माळेतून ओघळावेत तसे कागदावर उतरले आणि त्यातूनच पुढे रेषा तयार होत गेली.
तसा चित्रकलेचा माझा काही अभ्यास नाही. पण समजायला लागल्यापासून रेषा, तिचा वेग, वळण यांच्या प्रेमात पडलोय. तसे पाहिल तर मराठीत रेखाचित्र ही एक स्वतंत्र विकसित झालेली पण सध्या कुठंतरी थांबलेली कला आहे. दिवाळी अंकात केवळ कथा लेखांना पूरक चित्र काढून त्याचा अंक सजविण्यापुरता उपयोग करणे एवढयावरच हा प्रकार थांबत नाही. तर कलात्मक रेखाचित्रकारांसाठी खास पान राखून ठेवण्यात येतं. या छोटया लेखांसोबत आलेल्या या रेषांचा या रेखाचित्रांशी जवळचा संबंध आहे. खरंतर कपिल पाटील मागे लागल्यामुळे हा सगळा शब्दरेषांचा खेळ गेटवे नावाच्या स्तंभातून प्रसिध्द झाला. नाही तर तो माझ्या पोतडीत तसाच बंदिस्त राहिला असता.
गेटवे च्या पहिल्या आवृत्तीला चांगला प्रतिसाद मिळाला आणि अनेक परिचितांना माझ्या चित्रकलेविषयी थोडीफार माहिती झाली. विसाव्या शतकातील शेवटच्या दशकात मुंबई शहरात अनेक बदल झाले. त्याचे प्रतिबिंब गेटवे पुस्तकात पडलेले होते. पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात कवी मंगेश पाडगावकर, माझे मित्र भारताचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक आणि खासदार भारतकुमार राऊत यांनी पुस्तकाचे भरभरुन कौतुक केले.
या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर माझ्यातला चित्रकार जागा झाला आणि रंग आणि कॅनवासद्वारे अभिव्यक्ति केली पाहिजे याची सातत्याने जाणीव झाली. लोकमत वृत्तपत्राचे संपादक राजेंद्र दर्डा यांना ‘गेटवे पुस्तकामधील रेखाचित्रे फारच आवडली आणि ‘या रेखाचित्रांचे प्रदर्शन भरवा ही सुचनाही त्यांनीच केली. ‘गेटवे’ मधील रेखाचित्रे आणि काही पेंटींग्स असे एकत्र करुन ‘गेटवे’ याच नावाने माझ्या चित्रांचे पहिले प्रदर्शन ‘आर्टिस्ट सेंटर मध्ये भरविण्यात आले. त्याचे उद्घाटन त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर मी शब्दांच्याऐवजी रंग आणि कुंचला वापरुन बरेच काम केले आणि त्याला देशात आणि परदेशातही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अमेरिका, स्पेन, पोर्तुगाल, स्विझर्लंड, तुर्कस्थान, भूतान अशा विविध देशात ही प्रदर्शने भरली. त्यातील उत्स्फूर्तता लोकांना भावली पण या जागतिक प्रवासाची सुरुवात ‘गेटवे’ या पुस्तकापासून झाली हे मला विसरता येणार नाही.
आमदार कपिल पाटील, दिशा जोशी, अंबरीश मिश्र, इंदरकुमार जैन, रामदास बिवलकर, श्रावण मोडक, तुषार जोशी यांचे सहकार्य दुसरी आवृत्ती काढतांना मिळाले. माझे मित्र आणि चित्रकलेतील सहप्रवासी किशोर साळवी यांनी मनावर घेतल्यामुळे ही दुसरी आवृत्ती आपल्या हातात पडत आहे. माझ्या पेंटिंग्जवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि मला सतत प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या असंख्य मित्रमंडळींचे आभार..
-प्रकाश बाळ जोशी
Leave a Reply