भारतीय संगीत ग्रामोफोनवर उमटवणारी पहिली गायिका गौहरजान यांचा जन्म २६ जून १८७३ रोजी आझमगढ येथे झाला.
भारतीय संगीत ग्रामोफोनवर उमटविणारी प्रथम गायिका हा सन्मान गौहर जानला लाभला. ती भारताची पहिली गानकोकीळा ठरली. गौहर जान यांची आजी हिंदू होती आणि आजोबा ब्रिटीश, वडील एमेनियन ख्रिश्चन. त्यांचे खरे नाव इलिन अँजेलीना इव्हॉर्ड. नंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि आयुष्यभर इस्लामच्या पाइक बनून राहिल्या. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख होती. त्या जरी मुस्लीम असल्या तरीही त्यांच्या बहुतेक रचना कृष्णभक्तीवर आधारित आहेत आणि त्यात इतरही भक्तीगीतांचा समावेश आहे. गौहर जान जेंव्हा सहा वर्षांच्या होत्या तेंव्हा त्यांचे आईवडील वेगळे झाले, त्यानंतर त्या आपल्या आईबरोबर बनारसला राहायला गेल्या. तेव्हा त्यांची आई, व्हिक्टोरिया येवॉर्ड यांनी इस्लाम धर्म स्वीकारला, धर्मांतरण केले आणि ‘बडी मालका जान’ असे नाव घेतले. अशाप्रकारे लहानगी इलिन बनली गौहर जान. त्यांची आई’ बडी मालका जान लोकप्रिय कथक नृत्यांगना होती. बनारससारख्या सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असणाऱ्या शहरामध्ये राहिल्यामुळे लहानग्या गौहर जानला नृत्य साहित्य आणि संगीत ह्या सगळ्यात निपुण होण्यास मदतच झाली.
त्यानंतर ते कलकत्त्यात स्थायिक झाले, त्यांना नवाब वाजिद अली शाहच्या दरबारात आश्रय मिळाला. नवाब वाजिद अली शाह स्वत: उत्कृष्ट संगीतकार आणि गीतकार होते. गौहर जान वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या पहिल्या संगीत मैफिलीत दरभंगा राज (बिहार) च्या शाही दरबारात गायल्या. त्यांची पहिलीच अदाकारी इतकी उत्तम होती की त्यानंतर त्यांना वारंवार अशा शाही मैफिलींसाठी आमंत्रित केले जाऊ लागले आणि त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि त्यांना सगळे ‘गौहर जान कालकत्तावाली’ ह्या नावाने ओळखू लागले. गौहर जान यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध संगीत प्रवासात अनेक भाषेत गाणी गायली. ह्याव्यतिरिक्त ठुमरी, दादरा, कजरी, होरी, तराना, रवींद्र संगीत आणि भजन ह्यातही त्या निपुण होत्या. त्यांची राग भैरवी वर आधारित प्रसिद्ध ठुमरी- ‘ रसके भरे तोरे नैन’ ही प्राचीन रचना खूप गाजली इतकी ती मंत्रमुग्ध करणारी होती. १९०२ साली, एका ब्रिटिश ग्रॅमोफोन कंपनीने सहा महिन्यांसाठी स्थानिक कलाकारांची गायकी रेकॉर्ड करण्याचा प्रयोग केला. तेव्हा अमेरिकन साउंड इंजिनियर फ्रेड गयसबर्ग यांनी गौहर जान यांना ७८ आरपीएम डिस्क रेकॉर्ड करण्याची संधी दिली आणि अशा प्रकारे भारतीय संगीत ग्रामोफोनवर उमटविणारी प्रथम गायिका हा सन्मान गौहर जानला लाभला. ती भारताची पहिली गानकोकीळा ठरली. त्यांनी इंग्रजी, फ्रेंच आणि पश्तोसह १० पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी जवळपास ६०० गाणी रेकॉर्ड केली.त्यामुळे त्यांना ‘द ग्रॅमोफोन गर्ल’ ही उपाधी दिली गेली. त्यांना ७८ आरपीएम डिस्कच्या रेकॉर्डिंगसाठी तासभराचा खयाल ३ मिनिटांत सादर करायचा होता. त्यासाठी त्यांनी एक अनोखी शैली शोधली आणि आपल्या पहिल्या रेकॉर्डिंगसाठी, राग जोगिया गाण्याचा निर्णय घेतला आणि सुंदर रीतीने फुलवला. प्रत्येक ध्वनीमुद्रीकेच्या शेवटी त्या ठसक्यात म्हणायच्या, “गौहर जान म्हणतात मला!” ख्यालसंगीतची खोली आणि विस्तार लक्षात घेता असा तीन मिनिटांचा शॉर्टकट वापरून रेकॉर्डिंग केले गेले म्हणून तेव्हाच्या प्रस्थापित गायकांनी ह्यावर सडकून टीका केली, परंतु गौहर जान ह्यानी तिकडे मुळीच लक्ष दिले नाही.
त्यानंतर प्रसिध्द सरोद वादक उस्ताद अमजद अली खान सहित इतर अनेक संगीतकारांनी ह्याचा स्वीकार केला. गौहर जान ह्यांनी ज्या प्रकारे सर्व रागांना एकत्र बांधून सादर केले त्या त्यांच्या खास शैलीचे कौतुक ‘मास्टर्स ऑन मास्टर्स’ ह्या त्यांच्या पुस्तकात वाचायला मिळते. त्याकाळी भारतीय शास्त्रीय संगीतात ज्यांचे वर्चस्व होते अशा पुरुषांनी संगीत क्षेत्रात रेकॉर्डिंग करणे म्हणजे कलेच्या प्रांतात तांत्रिक हस्तक्षेप मानून रेकॉर्डिंगचा तिरस्कार केला, परंतु तवायफ आणि इतर दरबारी पुढे आले आणि त्यांनी ह्या तंत्राचा खुल्या दिलाने स्वीकार केला.
ज्या काळात सरकारी नोकरांचा महिन्याचा पगार पाच रूपये होता तेव्हा गौहर जान यांना एका संस्थानिकाने गाण्याच्या एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असताना दिलेली बिदागी होती एक लाख रूपये. शेवटी त्या म्हैसूर दरबारची राजगायिका होत्या. त्यांना त्या काळी ५०० रूपये मासिक वेतन होते. गौहर जान यांची उच्च राहणी आणि आणि महागडी जीवनशैली होती. ती नंतर मात्र कमी होत गेली कारण, त्यांचे सेक्रेटरी अब्बास ह्यांच्याशी त्यांचा चाललेला कायदेशीर लढा. अब्बास ह्यांनी फक्त आणि फक्त संपत्तीसाठी गौहरजान ह्यांच्याशी लग्न केले होते. ही कायदेशीर कारवाई बराच काळ चालली आणि त्यातच त्यांची संपूर्ण संपत्ती खर्च झाली. दरम्यान त्यांना लैंगिक छळाचाही सामना करावा लागला.
“माई नेम इज गौहर” या पुस्तकाचे लेखक विक्रम संपथ यांनी साकारलेले त्यांचे इंग्रजी चरित्र चटका लावून जाते. अनुवादक सुजाता देशमुख यांनी त्याचा केलेला मराठी अनुवाद इतका सरस आहे की हे मूळ पुस्तकच मराठी आहे असे वाटते. सुजाता देशमुख यांना त्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार लाभलेला आहे.
गौहर जान यांचे १८ जानेवारी १९३० रोजी निधन झाले.
गौहर जान यांच्या सुरस कथा.
स्वत: महात्मा गांधी तिला भेटले आणि त्यांनी तिला स्वातंत्र्य चळवळीसाठी निधी जमवण्यासाठी तिचा कार्यक्रम मागितला, तिने एका अटीवर हा कार्यक्रम दिला, स्वत: गांधीजींनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे.
तिच्या कार्यक्रमाला तोबा गर्दी लोटली. तब्बल २४ हजारांचा निधी जमा झाला. अचानक उद्भवलेल्या एका तातडीच्या कामामुळे गांधीजी या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. ती चिडली, तिनं निम्मेच पैसे गांधीजींच्या दूताकडे दिले.
एका राजाने तिला कार्यक्रमाला बोलावले, तिने एकटीसाठी आख्खी रेल्वेगाडी बूक करायला लावली. तिला एकटीला घेऊन अकरा डब्यांची ही स्वतंत्र रेल्वेगाडी कार्यक्रमाला गेली. तिचा ताफा १२० लोकांचा असायचा.
तिनं आपल्या लाडक्या मांजराच्या बारशाला त्या काळी २२ हजार रूपयांची पार्टी दिली होती. गवर्नर जनरलची घोडागाडी कलकत्याच्या रस्त्यावरून जाताना इतरांना त्या रस्त्यावरून घोडागाडी न्यायला बंदी होती. फक्त उच्च ब्रिटीश अधिकारी आणि संस्थानिक यांनाच या शहरात घोडागाडीतून फिरण्याची परवानगी होती. ती मुद्दाम घोडागाडीतून फिरायची. त्यासाठी तिला एका वेळी एक हजार रूपये दंड केला जायचा. ती दररोज हा दंड भरायची. त्याकाळी त्या एका रेकॉर्डिंगमागे सुमारे तीन ते चार हजार घेत असत. त्यांचे राहणीमान आणि आयुष्य असे होते की असे जगणे इतर स्त्रियांसाठी केवळ स्वप्नातच शक्य होते. गौहर जान यांच्या अंगावर हजारो रूपयांचे हिऱ्याचे दागिने असायचे. राहणीमान अतिशय भपकेबाज होते. शेवटी त्यांना दवाखान्यात अकाली मृत्यू आला तेव्हा ते बिल भरायला तिच्याकडे पैसे नव्हते.
Leave a Reply