एकाएकी वारा सुटला आणि थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला. ही बुधवारी सायंकाळी घडलेली गोष्ट. मी बैठकीत बसले होते. नातू आला म्हणून मी त्याला विचारले पाऊस पडत आहे ना? तो म्हणाला तुला कसं कळलं की पाऊस पडत आहे तो. अरे! वास बघ किती छान येतो आहे ना म्हणून मला समजले. पाऊस आणि मला येणारा वास त्याला काहीच समजले नाही म्हणून तो निघून गेला. आणि मी त्या मातीच्या वासात मस्त धुंद होऊन आनंद. समाधान व तृप्त झाले होते. चैत्र महिन्यात गौर बसल्यावर असा पाऊस पडला की म्हटले जायचे गौरीला डोहाळे लागले आहेत..
आता ही थोडं हसण्यावारी नेण्याची बाब आहे तरीही अगदी खरं आहे. बघा आता काही बायकांना असा मातीचा वास आवडतो. तर काही जणी माती खातात. माती. पेन्सिल भस्म. गहू निवडायला त्यातील मातीचे खडे खातात. हे मी पाहिलं आहे. त्यामुळे घरात लेकी सुनांना दिवस गेले की चुलीला पोतेरे म्हणजे पूर्वी एका मातीच्याच ओट्यावर असलेल्या मातीची चूल. शेगडी यावर स्वयंपाक झाला की त्याची स्वच्छता करण्यासाठी एक ठराविक ठरलेले पसरट तोंडाचे पातेले त्यात माती घालून पाण्यात भिजवून एका फडक्याने ते ही ठरलेलेच त्याला पोतेरे म्हणतात. ते पोतेरे भिंतीवर अर्धगोलाकार. चूल शेगडी. ओटा सगळे सारवून वरुन रांगोळी हळद कुंकू लावून ठेवली जायचे. कारण त्या मातीच्या वासाने गर्भवतीला एक वेगळाच अनुभव येतो. घरातील मोठय़ा बायकांना हे अनुभवाने माहिती होते म्हणून. तसेच तिच्या चवीनुसार पदार्थ करुन घालणे. कच्च्या चिंचा. आवळे. बोरं कैरी हे ही घरात आणून ठेवले जायचे. आणि तिलाही ते समजायचे म्हणून ती कुणाच्याही नकळत मीठ लावून खाऊन तृप्त व्हायची. हा कौतुक सोहळा तिच्या नकळत मोठी माणसं तृप्ततेने बघत असत..
आता मला दोन काल्पनिक चित्र रंगवायची इच्छा झाली आहे म्हणून मी जे लिहिले आहे ते वाचताना ते सगळे डोळ्यासमोर उभे करा आणि सांगा कशी काय आहेत.
1) कारभारीण पोटात आणि डोक्यावर जेवण्याची टोपली याचा भार सहन करत मंद मंद पाऊले टाकत बांधावरून येत असलेली पाहून कारभारी एका डेरेदार सावलीत झाडाखाली घोंगडी अंथरुन. पाण्याची डेचकी भरून ठेवून ती आली की लगबगीने तिच्या डोक्यावर पाटी खाली ठेवून. कच्च्या चिंचा किंवा कैऱ्या दगडफेक करून पाडून पाटाच्या पाण्यात स्वच्छ धुवून खुरप्याने जसे जमेल तसे फोडी करून थाळीत ठेऊन. हां बघ आलोच असे म्हणत कामात गुंतलो आहोत असे भासवणार तर ही पाटीतील मीठाची पुरचुंडी काढून ते अगदी मनापासून खात राहणार. पण आपला धनी किती काळजी घेतो आहे याचा आणि त्या पदार्थाचे खाण्यात. हे सगळे तो बघतोय. आजुबाजुला काम करत असलेल्या बाया पाहून डोळे मिचकावून एकमेकींना खुणावत हसतात. तर तिकडे धनी मात्र तिच्या वेडेवाकडे तोंड बघून गालातल्या गालात हसत मनाच्या कॅमेरात एक गोड क्लिक..
2)एका मोठ्या शहरात अलिशान घरातील नवऱ्याला ती म्हणते. आता ती काय म्हणते त्याला आम्ही मागासलेले आहोत म्हणून तुम्हीच ठरवा. या पदार्थाची मागणी करते. तो लिफ्टने. कारने मंडईत जाऊन आणणार येताना आईला सांगणार. अरे तिला डोहाळे लागले आहेत. मग याचे काय करायचे मला माहित नाही. आईच्या सांगण्यानुसार तो ती कैरी स्वच्छ धुवून चाकूने चिरुन (कापून नव्हे) डिशमध्ये सजवून टेबलावर ठेवणार. बाजूला मीठाची कुपी असतेच. आईने सांगितले होते की ती खाताना समोर राहू नये. म्हणून तो आडबाजूला थांबतो ती मस्त पैकी मीठ घालून खायला सुरुवात करते. तिचे वेडेवाकडे तोंड बघून हसतो आणि मनातल्या मनात हॅपीबर्थडे च्या तालावर कॅमेरात क्लिक..
आता डोहाळे हे कालमानाने बदलून गेले आहेत. ऑनलाईन सगळे पदार्थ येतात. काही असो पण डोहाळे पुरवले गेले की गर्भवतीला आनंद होतो. ती तृप्त होते म्हणून लाडक्या राणीला डोहाळे लागले की तिचे सर्व सोहाळे पुरवावे लागतातच राजाला..
धन्यवाद.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply