नवीन लेखन...

गावाकडची खाद्य संस्कृती

आजकाल प्रत्येक गृहिनीला संध्याकाळी कोणती भाजी करावी. किंवा कोणता स्वयंपाक करावा हा मोठा प्रश्न असतो.शहरात तर सुट्टी असेल तर सर्रास लोक ढाब्यावर जेवायला जातात. त्यात मीही एक.

ढाब्यावर जायला नकोच वाटते.त्याच त्या पनीरच्या भाज्या?? कोल्हापुरी व्हेज,व्हेज तिरंगा,स्टार्टरला पनीर चिल्ली,सोयाबीन चिल्ली,मसाला पापड. … . नुसता विचार जरी आला तरी असलेली भुक निघुन जाते.परंतु घराच्या किंवा मित्रांच्या आग्रहामूळे जावेच लागते.

पूर्वी लोकांना खायला नीट मिळत नव्हते.आणि आता सुग्रास ? भोजन असूनही भुक लागत नाही.

एकदा असाच निवांत बसलो असता लहानपनाच्या अनेक आठवणी डोळ्या समोरून तरळून गेल्या.

मला आठवतंय ग्रामीण भाग तेव्हा स्वयंपूर्ण होता.आमच्या कडे भाताची व नाचणीची लावणी झाल्यावर लोक बऱ्या पैकी निवांत असायचे. गणपती मध्ये पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला असायचा.माझा नाना व इतर गावातील लोक मुरमाड असलेली किंवा डोंगर उतारावरील जमीन नांगरून त्यामध्ये हूलगे पेरत असत.कुणी उडीद,खुरासनी (काळे तीळ),भुईमुग पेरत असत. तर भात निघाल्यावर हरभरा,वाटाणा,मसूर,गहू पेरत असत.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे भाता बरोबरच भरपूर कडधान्ये होत असे.

गावाकडे हूलग्याच्या पिठापासून शेंगोळी सर्रास बनवली जात असत.माझी आई परातीच्या बूडावर खुप छान शेंगोळीचे वेढे बनवत असे.शेंगोळीच्या वेढ्याचे झणझणीत कालवण,भाकरी व कांदा ही एक वेगळीच फर्माईश असे.शेंगोळयाचा रस्सा भाताबरोबरही तितकाच चविष्ट लागत असे.दोन घास सरस अन्न पोटात जात असे.

हूलग्याचे कढाण (वरण) नुसते मीठ टाकून देखील छान चव लागायची.

अजून एक चविष्ट पदार्थ गावाकडे हमखास असायचा.तो म्हणजे हरबरा डाळ भिजत घालायची.नंतर पाट्यावर सरभरीत वाटायची.तव्यावर त्याचे छोटे छोटे सांडगे थोड्या तेलात परतायचे. नंतर त्याचे कालवण (रस्सा) बनवायचे.खूपच अप्रतिम चव असायची.

शेतातील कामासाठी जर माणसे असतील तर दुपारच्या जेवणाची मोठी लगबग असायची.मसूराची झणझणीत घट्ट आमटी,नाचणी किंवा तांदळाच्या भाकरी,गावाकडील बनवलेले पापड,कांदा आणि खडक्या किंवा रायभोग तांदळाचा भात हे जेवण मोठ्या पाटीतून शेतातील झाडाखाली आणले जाई.

लोक काम थांबवून ओढ्यात हातपाय धुऊन झाडाच्या थंडगार सवलीत पंगती करुन बसत असत.पितळीमध्ये भरपूर आमटी वाढली जाई.सोबतीला कांदा,लसणाची चटणी,पापड असे.लोक आमटीत भाकरी चुरुन खात असत.शेतात झाडाच्या सावलीला पंगतीत जेवण्याची मजा काही औरच असायची.

त्या काळी गरिबी असल्यामूळे अनेक महिला घरात अगदीच काही नसल्यास नुसत्या कांद्याचे (कांदवणी) कालवण करत असत. काही लोक मुद्दाम घरधनीनला आठवण करुन देत असत.आज कांदवणी कर बरका !.कांदा चिरायचा. तो तेलात तळायचा. त्यात मीठ मसाला घालायचा. पाणी घालायचे दोन उकळ्या आल्यावर कालवण तयार.तर मला हे कांदवणी खूपच आवडायचे.

हरबरे भिजत घालून ते भिजले की तव्यावर मीठ घालून परतायचे. चांगले खरपूस भाजायचे. हे भाजलेले हरबरे खाताना खुप चविष्ट लागायचे. खाक्या चड्डीच्या खिश्यात हारबरे भरून मी चवीचवीने हारबरे खात असे.

हे हरबरे खाता खाता मोठ्या माणसांच्या गप्पांच्या मैफली रंगत. त्यात रात्री भुतांच्या गप्पा ऐकताना मी भेदरुन जात असे. तरीही भुतांच्या गप्पा संपूच नयेत असे वाटे.

गावी रात्री आम्ही खेकडे पकडायला जात असू.नदीच्या किंवा ओढ्याच्या भल्या भल्या काळ्या खेकडी आम्ही आणत असू. काही खेकडाच्या कुड्या व नांगोडे तव्यात मिठाच्या पाण्यात शिजवून आम्ही सर्वजण त्यावर ताव मारत असू.ह्या कुड्या नांगोड्याची अप्रतिम चव अद्यापही जशीच्या तशी आहे.

नागपंचमीला महिला वरईच्या पीठाचे गुळाचे पाणी घालून लाडू करत. हे लाडू सुध्दा खुप चविष्ट लागत असत.

सर्वात आवडता पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे पेजवळया. (घावने) तांदूळ भिजवून सावलीत वाळत घालायचे.नंतर ते जात्यावर दळायचे.पेजवळ्या करण्यासाठी एक खास लोखंडी भांडे असायचे त्याला कहाल म्हणत असत. या कहाली मध्ये पेजवळ्या बनवल्या जाई. मटणाचा रस्सा बोंबील किंवा वाकटीचे कालवण पेजवळ्यां बरोबर खूपच छान लागत असे. काही लोक गुळवण्या बरोबर पेजवळ्या खात असत.

गावाकडे त्याकाळी अनेक देवलशी असत.कुणावरूंन तरी बकरे कोंबड्या ठरलेल्या असत. शिवाय लोक देवाला,शेतात किंवा रानात दरवर्षी कोंबड्या,बकरे कापत असत. रात्री बेरात्री आम्ही त्याठिकाणी जात असू.

भगताच्या अंगातील देव लोकाना सूचना देत असे. त्याप्रमाणे उतारा ठेवला जाई. पोटात भुकेचा डोंब उसळे. कधी एकदा जेवतोय असे होई. सर्व आटोपल्यावर पंगती बसत.त्या भयाण अंधाऱ्या रात्री नीरव शांततेत आम्ही मटणाचा रस्सा भरपूर मटनासह भाताबरोबर खात असू.काय सांगू? या रानातल्या रश्शाची चव काही औरच असायची.

गावाला सगळ्याकडे बोंबील,वाकट,सुकट,ढोमेली व खारामासा हे सर्रासअसायचे. दर आठवडयाला काही बाया हे सर्व विकायला घेऊन येत असत. हे सर्व भातावर खरेदी केले जाई.

बोंबलाची चटणी खुपच टेस्टी असायची.आम्ही बोंबलाचे तुकडे चुलीतल्या आहारात भाजून खात असू.शिवाय तव्यावर तळलेला खारामासा भाकरी बरोबर खाताना वेगळीच चव रेंगाळत असायची.

लसणाची चटणी हा एक फेवरेट atam असायचा. लसणाच्या पाकळ्या व लाल मिरची व मीठ पाट्यावर बारीक वाटून ते मिश्रण अगदी थोड्याशा तेलात तव्यावर तळायचे. झाली लसणाची चटणी तयार.खूपच छान चव होती.

गावात लग्न किंवा पूजा असेल तर आमटी भात व जोडीला शाकभाजी असायची. गावठी हारबरे,वाटणे,बटाट्याच्या फोडी इत्यादी पासून बनवलेली शाकभाजी आमटी भाताबरोबर छानच लागायची.

तव्यावर केलेली डाळीच्या पिठाची वाटोळी भाजी तांदळाच्या भाकरी बरोबर खाताना वेगळीच मजा यायची.

उखळ।त काळे तीळ,लाल मिरची व मीठ कुटून बनवलेली कोंड तोंडी लावण्यासाठी छानच असायची.

तव्यावर केलेले मोकळं (सुक्क) बेसन हा एक अप्रतिम चवीचा पदार्थ असायचा.

उकडलेल्या अंड्यांचे कालवण सुध्दा beshच असायचे.

पूर्वी दुपार नंतर कातकरनी नदीचे मासे गावात विकायला घेऊन यायच्या. छोट्या पानावर वाटा असायचा. त्यावर नदीचे छोटे छोटे (चिंगळया) मासे असायचे. हे मासे तव्यावर बनवले जात असत. या माशांची चटणी भाकरी बरोबर छानच लागत असे.

हळद मीठ लाऊन मडक्यात मुरत ठेवलेल्या कैऱ्या भाकरी बरोबर खाण्यात वेगळीच खुमारी होती.

गावाला अनेक भाज्या केल्या जात असत.कौदरीच्या सोंडग्याची भाजी,भोकरीच्या कोवळ्या पानांची मुटकी,कुर्डूची भाजी,वाळवलेल्या भोकराची भाजी,चिलुची भाजी,सायरीच्या फुलांची भाजी,ते-याची भाजी,चैताची भाजी अशा अनेक रानभाज्याची चव छानच असायची.

गावात लहान मुलाचे नाव ठेवायच्या वेळी किंवा वीर (देव) नाचवायच्या वेळी मीठ घालून उकडलेले गहू सुध्दा छानच चवदार लागायचे.

पूर्वी लोक घराच्या पाठीमागे भाज्या लावत.अळू,डांगर भोपळा,दोडका,कारली,घोषाळी,काकडी यांचे बी पेरत.यापैकी कोवळया काकडीचे कळे खायची मजा औरच असायची.शिवाय भोपाळघारी,भोकाचे वडे,काकडीचा गर तांदळाच्या पिठात गुळ कालऊन हाळदीच्या पानात बनवलेले पातोळे खुपच छान असायचे.

फास्ट फूडच्या जमान्यात मात्र हे सर्व पदार्थ नामशेष झाले किंवा होत आहेत.त्यामुळे मात्र हार्ड,रक्तदाब,बद्धकोष्ठ,शुगर अपचन वेगवेगळे पोटाचे आजार मात्र ओढऊन घेत आहोत. कळतंय पण वळत नाही.असेच म्हणावे लागेल.

श्री.रामदास तळपे मंदोशी

Avatar
About रामदास किसन तळपे 10 Articles
ग्रामीण संस्कृती
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..