अमेरिकेत तसं रेल्वेचे जाळं खूपंच मोठं आहे. ‘बाल्टीमोर ऍंड ओहायो’ या कंपनीने पहिली रेल्वे सेवा १८३० साली मेरीलॅंड राज्यामधे सुरू केली. १८६० सालापर्यंत सुमारे ३०,००० मैल लांबीचं रेल्वे लाईन्सचं जाळं निर्माण झालं होतं. परंतु तोपर्यंत अमेरिकेत पश्चिमेकडे विस्तार मोठया प्रमाणावर सुरू झाला नव्हता, आणि त्यामुळे बहुतेक सार्या रेल्वे सेवा, मिसीसीपी नदीच्या पूर्वेकडेच एकवटल्या होत्या. पुढच्या ४०-५० वर्षांत अमेरिकेचा झपाट्याने पश्चिमेकडे विस्तार होत गेला आणि त्याचाच परिणाम म्हणून १८७० ते १९१० या काळात आणखी सुमारे १४७,००० मैल लांबीच्या रेल्वे लाईन्सची भर पडली. १९३० च्या सुमारास अमेरिकेत रेल्वेचं जाळं आणि उपयुक्तता ऐन भरात होती. पूर्वी आपल्याकडे जशा BBCI, GIP वगैरे प्रादेशिक रेल्वे कंपन्या होत्या किंवा काही संस्थानांच्या स्वत:च्या रेल्वे सेवा होत्या त्याप्रमाणे अमेरिकेत देखील खूप कंपन्यांकडे रेल्वेची मालकी होती. साधारणत: कोणत्या कंपनीकडे किती मैल लांबीची रेल्वे लाईन आहे यावरून या कंपन्या तीन प्रकारात मोडतात.
प्रथम वर्गातल्या कंपन्या :- यांच्याकडे सर्वसाधारणपणे ३३,००० मैलांपेक्षा अधिक लांबीच्या रेल्वे लाईन्स असतात. ग्रॅंड ट्रंक वेस्टर्न रेल रोड कंपनी, बर्लिंग्टन नॉर्थ- सांता फे रेल रोड कंपनी, युनियन पॅसिफिक ही काही ठळक उदाहरणे.
विभागीय / प्रांतीय कंपन्या :- यांच्याकडे साधारणपणे ५०० ते ६०० मैल लांबीच्या रेल्वे लाईन्स असतात. स्थानिक कंपन्या :- या अगदीच छोट्या असतात. यांच्याकडे साधारणपणे ५०-६० मैल लांबीच्या रेल्वे लाईन्स असतात.परंतु १९३० च्या सुमारास ऐन भरात असलेल्या रेल्वेची पुढे घसरण सुरू झाली. १९२९ ते १९९९ मधे जवळ जवळ ५५% रेल्वे लाईन्स बंद पडल्या. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, अद्ययावत महामार्गांचं जाळं आणि मोटार वहातुकीला आलेल्या प्रचंड महत्वामुळे, रेल्वेची अधोगती होतच राहिली.
ह्या सर्व पार्श्वभूमीवर, ग्रेन एलेवेटर्स आणि रेल्वे लाईनींचं अमेरिकेच्या मिडवेस्ट मधे एके काळी असलेलं अढळ स्थान आज जरी थोडं डळमळीत झालेलं असलं, तरी या संपूर्ण भागामधे कुठेही फिरलं तरी दिसणारी जुनी ग्रेन एलेवेटर्स आणि वापरात नसलेल्या रेल्वे लाईन्स, गतकाळातल्या, ग्रामीणभागातल्या त्यांच्या महत्वाच्या स्थानाची आठवण करून देतात.
सू सेंटरच्या ६,००० वस्तीत ९९% गोरे ख्रिश्चन, आणि ५०-१०० मेक्सिकन शेतमजूर. हा सारा प्रदेश एकंदर किती प्रचंड धार्मिक आहे याची कल्पना, गावातून एक चक्कर टाकल्यावरच येत होती. या कर्मठ ख्रिश्चन वातावरणात, हजारो मैलांवरून, एक मराठमोळं, मध्यमवर्गीय, हिंदू संस्कृती आणि भारतीय रीती रिवाज, आचार विचार यांचं मनोमन पालन करणारं कुटुंब येऊन पडलं होतं. त्यामुळे गावात अजून एक भारतीय कुटंब आहे हे समजल्यावर आमच्या आश्चर्याला आणि आनंदाला पारावार राहिला नाही. दुसर्याच दिवशी सोळंकी कुटुंबाचा पत्ता शोधून काढला आणि पुढचे काही महिने तरी मुकेशभाई, रेखाबेन आणि त्यांची तीन मुलं, आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन गेले.
मुकेशभाईंना अमेरिकेत येऊन चांगली २०-२२ वर्षे झाली होती. रेखाबेन देखील १८ वर्षांपूर्वी लग्न होऊन इथे आल्या होत्या. मुकेशभाई इंजीनीयर होते आणि इंडियाना राज्यातल्या कुठल्याश्या गावी त्यांचा जॉब होता. त्यांच्या कंपनीने सू सेंटरच्या जवळच्या रॉक व्हॅली नावाच्या छोट्या गावात एक नवीन प्लॅंट सुरू केला होता आणि तिथे त्यांना व्यवस्थापनासाठी पाठवले होते. इतकी वर्षं चांगल्या मोठ्या शहरात काढल्यावर सू सेंटर सारख्या छोट्या ठिकाणी येऊन पडल्यामुळे सोळंकी कुटुंब चांगलंच खट्टू झालं होतं. आधीच्या शहरातले भारतीय मित्रमंडळ आणि नातेवाईकांचा गोतावळा सोडून, या सर्वस्वी परक्या आणि छोट्या गावात आल्यावर, त्यांना भलतंच एकाकी आणि कंटाळवाणं वाटत होतं. मुकेशभाई कामाच्या निमित्तानं व्यस्त असायचे; पण रेखाबेन दिवसभर कुढत बसायच्या आणि त्यांची मुलं तर कधी इकडून बाहेर पडतोय, याची वाट बघत असायची. त्यामुळे आम्हाला भेटून, त्यांना झालेला आनंद समजण्यासारखा होता. पुढचे सहा सात महिने एकमेकांच्या आधाराने खूपच मजेत गेले आणि त्यांनी आमच्या सुरवातीच्या दिवसांत आम्हाला मदत देखील खूप केली. पुढे मग मुकेशभाईंनी जॉब बदलला आणि ते ओहायोला गेले. सोळंकी कुटुंब गाव सोडून जातांना आम्हाला सगळ्यांनाच खूप वाईट वाटले. त्यापुढे देखील बराच काळ आमचा फोनवरून संपर्क असायचा, परंतु आता ह्या सर्वस्वी अनोळखी गावात आम्ही एकुलते एक भारतीय कुटुंब उरलो होतो.
Leave a Reply