नवीन लेखन...

अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन – भाग ७

मे ते सप्टेंबर पर्यंत शेतं, मक्याच्या आणि सोयाबीनच्या पिकांनी हिरवीगार झालेली असायची. मक्याची रोपं तर चांगली १०-१२ फूटांवर पोहोचणारी. कच्च्या रस्त्यावरून गाडीने जाताना, रस्याच्या दोन्ही बाजूंची वाढलेली रोपं गाडीच्या उंचीच्या वर पोहोचायची. त्यामुळे उभे आडवे रस्ते मिळणार्‍या कोपर्‍यांवर, आडव्या रस्त्यावरून येणार्‍या गाडया दिसत नसत, त्यामुळे आडवा रस्ता आला की गाडीचा वेग हळू करायचा, डाव्या उजव्या बाजूला मक्याच्या रोपांतून दूरवर नजर टाकायची आणि मगच पुढे जायचं, हे सगळ्यांच्याच अंगवळणी पडलेलं.

गावात व्हाईट नावाचं एक कुटुंब होतं. ते देखील आमच्यासारखं सू सेंटरला नवीनच रहायला आलं होतं. जीम Ph.D. होता आणि जनावरांच्या खाद्य बनवणार्‍या एका कंपनीत सल्लागार म्हणूण काम करायचा. त्याची बायको क्रिस्तीन MBA होती, परंतु तिने नोकरी न करता, घरच्या घरी मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना पाच मुलं होती. मोठया दोन मुली १२-१४ वर्षांच्या आणि तीन मुलं ४ ते १० वयातली. त्यामुळे ती मुलं आणि सिद्धार्थ यांची चांगलीच मैत्री झाली. क्रिस्तीन आणि मृणालची गट्टी जमली आणि मला आणि जीमला गप्पा मारायला समान आवडीचे विषय मिळाले. हे कुटुंब नेहमीच्या अमेरिकन कुटुंबापेक्षा खूपच वेगळं होतं. एक तर सगळी मुलं होम स्कूलिंग करणारी – म्हणजे त्यांची आईच त्यांना घरच्या घरी शिकवायची. आई वडील छानछोकीच्या गोष्टींपेक्षा पुस्तकांवर खर्च करणारे. त्यांच्या घरीच त्यांनी एक मोठीशी लायब्ररी जमवली होती. क्रिस्तीन मुलांना गाडीत घालायची आणि दूर दूरच्या ठिकाणी घेऊन जायची. कुठे नॅशनल पार्क्समधे जा, कुठे म्युझीयम बघायला जा, कुठे डायनासोरच्या हाडांचं उत्खनन चाललं असेल तिकडे जा, असा सारा प्रकार. पण त्यामुळे शाळेतलं एकसुरी, बंदिस्त शिक्षण घेण्यापेक्षा, ती मुलं आपल्याला हवं ते भरपूर वाचून, प्रत्यक्ष पाहून, करून, काही वेगळंच आणि चांगलं शिकायची.

त्या पोरांचे खेळ देखील वेगळेच असायचे. त्या मुलांना घेऊन क्रिस्तीन बरेचदा आमच्या फार्महाऊसवर यायची. मग ती आणि मृणाल एखाद्या वाचलेल्या पुस्तकावर गप्पा मारणं, ग्रीटींग् कार्डस बनवणं किंवा आजूबाजूच्या कच्च्या रस्त्यांवरून फिरणं, असं काही तरी करायच्या. डेव्हीड, स्टर्लिंग, इयान आणि सिद्धार्थ गावातल्या पोरांसारखे आमच्या आवारात खेळत बसायचे. घराला लागूनच असलेल्या फार्मच्या पाठच्या बाजूला, सुकलेल्या गवताच्या मोठाल्या गंजी लावून ठेवलेल्या असायच्या. त्यांच्यावर चढून, त्यात लपंडाव खेळणं हा त्यांचा मोठा आवडीचा खेळ होता. उन्हाळ्यात फार गरम व्हायला लागलं, की गायींना उतरवून घेण्याच्या धक्क्यावर जायचं आणि तिथे असलेल्या नळांना पाईप जोडून, ते पाणी एकमेकांच्या अंगावर उडवून, पाण्यात आणि चिखलात मनसोक्त भिजणं, हा असाच एक त्यांचा आवडता खेळ. कधी कधी घराच्या आसपासच्या सशांना पकडण्यासाठी, जमिनीत खड्डे करून ते गवताने झाकायचे आणि आजूबाजूला गाजरं टाकून ससे कधी खड्ड्यात पडतायत हे बघत लपून बसायचं, असे त्यांचे उद्योग चालू असायचे. मुंबईच्या मुलाला अशा गावरान उनाडक्या करताना बघून आम्हाला मोठी मजा वाटायची.

मैल मैल अंतरावरच्या उभ्या आडव्या कच्च्या रस्त्यांनी चौरस तुकड्यात विभागलेल्या या अफाट माळरानावर, दूर दूर अंतरावर घरं विखुरलेली असायची. घराच्या बाजूलाच बार्न (गायींचा मोठा लाकडी बंदिस्त गोठा), धान्य साठवण्याच्या उंच कणग्या (tower silos), शेतीची अवजारं ठेवायची लाकडी शेड, असा पसारा असायचा. घराच्या पुढे मागे २-३ गाडया, पिकअप ट्रक्स, ट्रॅक्टर्स, इतर मोठाली अवजारं, इतस्तत: जागा शोधून उभी असायची. घराच्या पुढे हिरवळीचा छोटासा तुकडा आणि त्याच्या सभोवती फुलझाडांची सजावट असायची. घरं तशी सुबकशी, पांढर्‍या किंवा करडया रंगाची असायची. दिवसा खिडक्यांचे जाळीदार पडदे हलत असायचे आणि संध्याकाळी घरांतील दिव्यांच्या मंद पिवळ्या उजेडाने खिडक्या उजळून जायच्या. घराच्या पुढयात एक दोन कुत्री डोळे मिटून निपचीत पडलेली असायची आणि एखादी गाडी धूळ उडवत गेली की हळूच डोळे किलकिले करून बघायची. काही घरांच्या आजूबाजूला तुटकी मुटकी फळफुटं आणि तारांच्या सहाय्याने केलेल्या साध्या सुध्या छोटया कुंपणांआड, काही डुकरं किंवा मेंढया दिसायच्या. काही घरगुती कोंबडया इतस्तत: दाणे टिपत फिरत असायच्या. या सार्‍या पसार्‍याभोंवती झाडांची भिंतशी उभारून जणू एखादी गढीच केलेली असायची. बाहेर कुंपण किंवा भिंत वगैरे प्रकार नाही. मोठया झाडांच्या खाली झुडपं आणि तण वाढलेले असायचे. झाडाझुडपांची गर्दी संपली की सरळ शेतंच सुरू व्हायची. अशी ही भर शेतातलीच वस्ती! हिवाळ्यात झाडांची पानं गळून गेली, की ही घरं आणि त्यांच्या आजूबाजूचे बार्नस, धान्यांच्या कणग्या हा सारा पसारा, निष्पर्ण फांद्यांच्या काटेरी कुंपणात बंदिस्त करून ठेवल्यासारखा दिसायचा. थंडीच्या ऐन कडाक्यात, सारा आसमंत बर्फाच्या दुलईत गुरफटून गेला, की क्षितीजापर्यंत पसरलेल्या शेतांत चमकणारा बर्फ एखाद्या अथांग दर्याची आठवण करून द्यायचा. मग निष्पर्ण वृक्षांमधे अर्धवट झाकली गेलेली ही घरं, या अफाट दर्यामधे विखुरलेल्या छोटया छोटया बेटांसारखी वाटायला लागायची.

आधीच्या मोसमात कापलेल्या मक्याचे खुंट शेतात तसेच राहिलेले असायचे. बर्फाच्या आवरणाखालून त्यांची टोकं तेवढी वरती दिसत असली म्हणजे एखादी चतुरंग सेना आपल्या लखलखत्या रणवेषात तयार होऊन सज्ज असावी, आणि त्यांच्या भाल्यांची टोकं तेवढी शिरस्त्राणांच्या वर दिसत असावीत, तसं दृश्य दिसत असायचं.

कच्च्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला, आठ दहा फूट रुंद आणि दोन तीन फूट खोल अशा पन्हळी असायच्या. उन्हाळ्यात कधी फार जोरदार पाऊस झाला तर त्यातून मातकट, लालसर पाणी वहायचं. पण त्यांचा खरा उपयोग व्हायचा तो हिवाळ्यात. जेंव्हा मोठं हिमवादळ व्हायचं तेंव्हा रस्ते, शेतं, रस्त्याच्या बाजूच्या या पन्हळी, सारं काही बर्फाने भरून जायचं. भणाणत्या वार्‍याने शेतांतला हा बर्फ रस्त्यावर लोटला जाऊन गाडयांना अडथळा होऊ नये, म्हणून या पन्हळी असायच्या. त्यामुळे वार्‍यामुळे लोटला जाणारा हा बर्फ, ह्या खड्ड्यांसारख्या पन्हळींमधे पडून रस्त्यांच्या कडेला साचत रहायचा. रस्त्यांना ना किनारी ना रोड साईन्स, त्यामुळे रस्ता कुठे संपला आणि पन्हळी कुठे सुरू झाल्या, हे समजायला काहीच मार्ग नसायचा. कुणी बेसावधपणे गाडी चालवत असला किंवा निसरडया बर्फावरून गाडी घसरली की बाजूच्या पन्हाळीमधे जाऊन पडायची.

रस्त्यांच्या बाजूला विजेच्या तारा वाहून नेण्यासाठी चक्क लाकडी खांब. अमेरिकेत सरळसोट वाढणार्‍या सूचिपर्णी वृक्षांची काही कमतरता नाही. त्यामुळे विजेचे लाकडी खांब म्हणजे चक्क या झाडांचे कापलेले गोल सरळसोट बुंधे! कच्च्या रस्त्यांच्या कडेकडेने या लाकडी उंचच उंच खांबांच्या रांगा, हे एक चहूबाजूंना दिसणारं दृश्य! हिवाळ्यात जेंव्हा रस्ते आणि कडेच्या पन्हळी बर्फाच्छादित होऊन रस्त्याची कड समजणं मुश्किल व्हायचं, तेंव्हा या खांबांच्या रांगांकडे बघूनच रस्त्याच्या कडेचा अंदाज घेत गाडी चालवायची.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..