नवीन लेखन...

अमेरिकेतील छोटी गावे – भाग २

Gavakadchi America Small Towns in America Part 2

नॉर्थईस्टमधे, पेनसिल्व्हेनियामधे, झाडांची काही कमतरता नाही. त्यामुळे लाकडाचं कुंपण बर्‍याच घरांभोवती आढळतं. झाडांचा जळाऊ लाकूड म्हणून देखील सर्रास उपयोग होतो. अनेक अद्ययावत घरांमधे दिवाणखान्यात किंवा फॅमिली रूम मधे एखादी शोभिवंत Fire place असणं हे मोठं कौतुकाचं आणि फॅशनेबल मानलं जातं. अर्थातच ही घरं अद्ययावत पद्धतीने हिवाळ्यात गरम केली जातात आणि Fire place चा उपयोग केवळ शोभेसाठी किंवा मजेसाठी, खास मेजवानी प्रसंगी किंवा मित्रमंडळी जमली असताना केला जातो. गावाकडे मात्र शेतातल्या किंवा वस्त्यांवरच्या घरांत लाकडं जाळून घरं उबदार ठेवावी लागतात. त्यासाठी घराच्या बेसमेंटमधे किंवा घराला लागूनच एखादी भट्टीसारखी चांगली मोठी Fire place असते.

ऍपलेशन पर्वतराजीच्या शाखा उपशाखा सार्‍या नॉर्थईस्ट, न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया, व्हर्जिनिया वगैरे भागांत फैलावलेल्या असल्यामुळे बराचसा भाग टेकड्या, डोंगरांनी भरलेला आहे. त्यामुळे दगडा, धोंड्यांची वानवा नाही. या प्रदेशातल्या ग्रामीण भागात त्यामुळे बर्‍याच घरांभोवती दगडांची कुंपणं आढळतात. कुंपणं पक्की बांधलेली नाहीत, नुसते लहान मोठे दगड, कपच्या एकमेकांवर व्यवस्थित रचून केलेली ही कुंपणं अगदी दापोली, लांजा, देवरुख, संगमेश्वरची आठवण करून देतात. उन्हाळ्यामधे पाऊस पडल्यामुळे या दगडी कुंपणांच्या पायदळी गवतात रानटी फुलं उगवतात. कधी कधी बाजूच्या बिळांमधून बाहेर आलेले ससे त्यांच्या आडोशाने बसलेले दिसतात. हिवाळ्यात हिमवर्षाव झाला की कुंपणांवर रातोरात पांढरे शुभ्र कठडे बांधल्यासारखं वाटतं. परसदारात ठेवलेल्या लाकडांच्या मोळ्यांवर बर्फ पडून राहिलेलं असतं.

छोट्या गावांमधे घरे सहसा कोणी बंद करत नाही. (हा प्रकार मिडवेस्ट मधे अधिक प्रकर्षाने दिसला). गाड्यांमधे देखील चाव्या तशाच ठेवून देण्याची पद्धत असते. विशेषत: हिवाळ्यामधे, दुकानात, बॅंकेत वगैरे जाऊन थोडंस काम करायचं असलं तर फारसं कुणी गाड्या बंद करतच नाहीत, बाहेर गाडी चालूच असते आणि आत माणसं आरामात आपली कामं आटोपत असतात.

बहुतेक शेतकरी आपल्या शेतजमीनीच्या आसपास किंवा डेअरी फार्मच्या जवळपास रहाणं पसंत करतात. त्यामुळे परसदार ओलांडलं की शेतात पाय किंवा घरापासून हाकेच्या अंतरावर डेअरी फार्म अशी परिस्थिती. घरं तशी सुबक आणि नीटनेटकी. त्यांच्या पुढे मागे चांगली हिरवळ आणि फुलझाडं राखलेली. घरांच्या आसपास ट्रॅक्टर्स, अवजारं, गाड्यांची गर्दी. थोड्या अंतरावर जनावरांच्या धान्याच्या उंच कणग्या असतात. शेतकरी, त्याची तरणी ताठी मुलं, नातवंडं, कामगार आपल्या कळकट जीन्स, जाडे भरडे रंगी बेरंगी शर्टस, मळकट डागाळलेल्या हुडीज किंवा जॅकेट्स आणि डोक्यावर बेसबॉल कॅप्स घालून आत बाहेर करत असतात.

सगळ्यांच्या पायात माती चिखलाने भरलेले मोठे फार्म शूज किंवा गमबूट. कुणी भल्या पहाटे तीन चार वाजता उठून लगतच्या आपल्या डेअरी फार्मवर जाऊन गायींचं दूध काढतोय तर कुणी उजाडता उजाडता ट्रॅक्टरवर बसून शेतात जातोय. कुणी गावातून बिघडलेल्या अवजारांची दुरुस्ती करून घेऊन येतोय. कुणी बी-बियाण्यांच्या पोत्यांची थप्पी लावतोय. तर कुणी गवताच्या गंजांच्या राशी लावतोय. सगळे हट्टे कट्टे. आरडा ओरडा नाही की गडबड गोंधळ नाही. प्रत्येकजण आपापलं काम चोखपणे करतोय. मधेच शेतकर्‍याची बायको किंवा मुलगी देखील घरापासून फार्मवर लगबगीने येरझार्‍या घालत असते. कुठे वासरांना दूध पाजायचं असतं, कुठे फार्मवर आलेल्या दुधाच्या टँकरच्या ड्रायव्हर बरोबर पैशाचा हिशोब करायचा असतो, कुठे एखाद्या अडलेल्या गायीसाठी डॉक्टरला फोन करायचा असतो, एक ना दोन ! हजारो कामे उभी असतात आणि सारं कुटुंब झटून त्यांचा फडशा पाडत असतं.

कामाच्या रगाड्यातून वेळ काढून जसं ज्याला जमेल तसं न्याहारी, जेवण वगैरे चालू असतं. अंडी, दूध, चीज, बेकन, बीफ असा भरभक्कम आहार असतो. आधीच सर्वसाधारण अमेरिकन्सना भाज्या, कडधान्य या प्रकारांचं वावडं. त्यात गावाकडच्या काबाडकष्टाची काम करणार्‍या लोकांना तर भाज्या वगैरे दृष्टीसमोर देखील नको असतात.

फार्मवर काम करणार्‍या या लोकांचं तंबाखूचं व्यसन पाहून मला सुरवातीला आश्चर्य वाटलं होतं. आपल्याकडे तंबाखू मळणारे, दाढेखाली तंबाखूचा बार भरून त्याच्या तारेमधे काम करत रहाणारे, पचापचा थुंकणारे लोकं आपल्या अंगवळणी पडलेले असतात. पण इथे हे गोरे अमेरिकन्स देखील तोंडात तंबाखूचा बार भरत काम करताना पाहून मला अचंबा वाटला. बर्‍याचजणांच्या दाढेखाली, खालच्या ओठाआड भरलेल्या तंबाखूच्या बारामुळे खालचे ओठ सुजल्यासारखे मोठे झालेले, त्यातून लाळ संभाळत केलेलं संभाषण, शिवराळ भाषा, इथे तिथे पचापचा थुंकणं, काही म्हणता काही फरक नाही. मला तर बरेचदा तळेगावच्या घोड्यांच्या फार्मवर अस्सल मावळी शेतकरी कामकर्‍यांबरोबर किंवा गुजराथमधल्या आणंद, खेडा, नडीयादच्या खेडूतांबरोबर काम करतोय की काय असा भास व्हायचा.

 

डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..