जितकं आत छोट्या गावांमधे जावं तितकं पुरुषांचं आणि स्त्रियांचं वर्तन आणि कामाची वाटणी अधिकाधिक काटेकोर होत जाते. मोठ्या शहरांमधल्या स्त्रिया अधिक स्वतंत्र, मोकळ्या ढाकळ्या आणि पुरुषांशी बरोबरी करणार्या असतात. त्यामानाने गावाकडच्या स्त्रिया थोड्या सौम्य आणि स्त्रियांची पारंपारिक कर्तव्ये पार पाडणार्या असतात. गावाकडे ‘घर हे स्त्रीचं साम्राज्य आणि घराबाहेर पुरुषाचा शब्द मोठा’ ही विभागणी अधिक प्रकर्षाने जाणवते. गावाकडच्या स्त्रियांच्या आयुष्याचा गाभा, मुख्यत्वे कुटुंबसंस्था असावा असं वाटतं. तरूण मुलींचा देखील, लवकर लग्न करून स्वत:चं घर घेऊन फॅमिली सुरू करावी, मुलांना वाढवावं, याकडेच अधिक ओढा. गावाकडच्या बायकांच्या आवडी किंवा छंद देखील थोडे स्त्रीसुलभ असतात आणि घरकाम, बागकाम, स्क्रॅपबुकींग, शोभिवंत कार्डस बनवणे, विणकाम करणे किंवा शोभिवंत गोधड्या (quilts) बनवणे, स्वयंपाक अशा गोष्टींमधे अधिक पारंगत असतात. पुरुषांच्या दृष्टीने, घराची आणि लहान मुलांची जबाबदारी घरच्या स्त्रीवर सोपवली की शेती, अवजारं, जनावरं, गाड्या वगैरे सर्व बाहेरच्या गोष्टींवर त्यांना लक्ष केंद्रित करता येतं. गावाकडच्या पुरुषांचं दाढी मिशा वाढवणं देखील सर्रास असतं. पुरुष अधिक धष्टपुष्ट आणि शारीरिक काम करून आणि उन्हातान्हात वावरून कमावलेल्या शरीराचे आणि रापलेले असतात. बहुतेक जण पिक-अप किंवा गाड्यांच्या छोट्या मोठ्या दुरुस्त्या करणे, घराच्या आवारातील कामे करणे, घरातली किंवा घराबाहेरची छोटी मोठी गवंडी, सुतार किंवा प्लंबिंगची काम करणे यात पारंगत असतात. आधीच अमेरिकन्स स्वावलंबी, त्यात हे छोट्या गावातले लोक, त्यांना फारसं कुणावर अवलंबून रहाणं शक्य नसल्यामुळे अधिकच स्वावलंबी झालेले असतात.
अशा छोट्या गावांतल्या वातावरणात वाढलेल्या मुली पुढे जेंव्हा कॉलेज किंवा नोकरीच्या निमित्ताने मोठ्या शहरात जातात तेंव्हा त्यांना तिथली मुलं मोठी नखरेल, नाजूक आणि आत्मकेंद्रीत वाटतात. छोट्या गावांत वाढताना या मुलींनी आजुबाजूची मुलं म्हणजे फाटक्या मळक्या कपड्यात वावरणारी, कष्टाची कामं करून हाताला घट्टे पडलेली, मोठ्ठाले चिखलाने माखलेले बूट घालून बिनदिक्कत बॅंकेत, दुकानात न बिचकता शिरणारी अशी पाहीलेली असतात. त्यामानाने शहरी मुलं म्हणजे branded कपडे घालणारी, केसांची व्यवस्थित काळजी घेऊन नवनवीन फॅशन करणारी, मोठ्या आणि गंजलेल्या पिक-अप ट्रक ऐवजी ऐटदार sports car चालवणारी असतात. मग अशा मुली जेंव्हा ह्या शहरी मुलांना आपल्या छोट्या गावी घेऊन येतात तेंव्हा घडणारे किस्से मोठे मजेदार असतात. एकतर ह्या शहरी मुलांना शेतांचा, जनावरांचा जो एक विशिष्ट वास येतो त्याची अजिबात सवय नसते. त्यामुळे गावाकडे येतानाच आसपासच्या ओल्या मातीच्या, डेअरी फार्मवरच्या शेणाच्या, डुकरांच्या फार्मवरच्या अशा अपरिचित वासांनी त्यांचं डोकं उठून जातं. त्यातून मग ट्रॅक्टरवर बसून शेतात जाणं किंवा वासराला पकडून औषध पाजणं वगैरे गोष्टी तर दूरच राहिल्या. आजूबाजूला कुठे मॉल नाही, बार नाही, चांगली रेस्टॉरंट्स नाहीत म्हटल्यावर तर त्यांना वेळ कसा घालवावा हेच समजत नाही. मग रात्री ओढ्याच्या बाजूला कॅंपींगला जायच्या गप्पा निघतात. त्यात कुणी बंदूक उशाशी ठेवून झोपायची गोष्ट काढतो. कुणीतरी हळूच कधीतरी काळी अस्वलं किंवा कोल्हे, कायोटीसारखे प्राणी दिसण्याचा उल्लेख करतो आणि शहरवासियांची पांचावर धारण बसते. एकदा हा असा अस्सल गावरान अनुभव घेतला की हे शहरी बाबू परत फारसे कधी गावाकडे वळायचं धाडस करत असतील असं वाटत नाही.
छोट्या गावांमधे शाळा हा एक महत्वाचा केंद्रबिंदू असतो. अगदी छोट्या गावांमधे प्रायमरी, मिडलस्कूल असतात; तर चार पाच छोट्या गावांना मिळून एखादी हायस्कूल असते, पण पाच सहा हजार वस्तीचं गाव असेल तर मात्र गावात दोन तीन शाळा आणि हायस्कूल असते. शाळेत मुलं देखील फार नाहीत, एका एका इयत्तेमधे (वर्गात नव्हे) ६०/७० मुलं. त्यामुळे शिक्षक सगळ्या मुलांना नावानी ओळखणार. दुकानात पालक भेटले तर आवर्जून थांबून गप्पा मारणार, वर्गातल्या विद्यार्थ्यांजवळ त्यांच्या पास होऊन गेलेल्या मोठ्या भावंडांची आपुलकीने चौकशी करणार. या शाळांमधल्या काही शिक्षकांना पाहून, पु.लं च्या ‘चितळे मास्तरांची’ किंवा आमच्या बालमोहन विद्या मंदिरातल्या काही शिक्षकांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
— डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply