नवीन लेखन...

गावाकडची अमेरिका – पार्श्वभूमी – १

गावाकडची अमेरिका - Gavakadchi America

भारतीयांना, निदान मध्यमवर्गीय, उच्चविद्याविभूषित भारतीयांना आता अमेरिका काही नवीन राहिलेली नाही. आज अमेरिकेत राहणार्‍या भारतीयांची संख्या सुमारे २७.७ लाख आहे. एकूण अमेरिकन लोकसंख्येच्या जरी ही केवळ ०.९% असली, तरी ह्या वाढीचा वेग लक्षणीय आहे. सन २००० मधे अमेरिकेतील भारतीयांची संख्या सुमारे १७ लाख होती, आणि केवळ पाच वर्षांत, सन २००५ मधे ती २३ लाखांच्या पुढे गेली होती. ३८% वाढीचा हा वेग, सर्व एशियन लोकांमधे सर्वात अधिक होता. अमेरिकेत बाहेरून येणार्‍या लोकांमधे, केवळ हिस्पॅनिक (मध्य आणि दक्षिण अमेरिकेतल्या विविध देशांतून येणारे स्पॅनिश भाषिक लोक) लोकांची संख्या यापेक्षा वेगाने वाढते आहे. आज अमेरिकेमधे असलेल्या एशियन लोकांमधे चायनीज (३५.३%) आणि फिलिपिनो (३०.५%) लोकांखालोखाल भारतीयांचा नंबर लागतो.

अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणं किंवा तिथे नोकरीसाठी H1B व्हिसा मिळवणं हे दिवसेंदिवस भारतीयांच्या अंगवळणी पडत चाललंय. नुसतं उच्च शिक्षणाचा विचार करायचा म्हटलं तर, ‘यु एस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन’ या संस्थेचा २००८ सालचा अहवाल पाहणं उद्बोधक ठरेल. ही संस्था अमेरिकेतील सुमारे ३००० प्रथितयश शिक्षणसंस्थांचा आढावा घेऊन आपला अहवाल तयार करते. या अहवालानुसार, २००७-२००८ साली अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ६१% विद्यार्थी एशियन देशांमधून आलेले होते. सर्वाधिक विद्यार्थी पाठवणार्‍या ५ देशांमधले – ४ देश एशियन होते – { भारत(९४,५६३ विद्यार्थी), चीन (८१,१२७ विद्यार्थी), साउथ कोरिया (६९,१२४ विद्यार्थी), जपान (३३,९७४ विद्यार्थी) आणि कॅनडा (२९,७५१ विद्यार्थी)}. विशेष म्हणजे, गेली सात वर्षे सातत्याने सर्वाधिक विद्यार्थी पाठवून, या यादीत भारताने पहिला नंबर पटकावला आहे. परंतु २०१० साली मात्र, चीनने १२७,६२८ विद्यार्थी (एकूण परदेशी विद्यार्थ्यांच्या १८%) पाठवून, भारताला (१०४,८९७ विद्यार्थी – एकूण परदेशी विद्यार्थ्यांच्या १५%) दुसर्‍या स्थानावर ढकलले आहे.

दरवर्षी दिल्या जाणार्या ६५,००० H1B व्हिसांपैकी सर्वात जास्त पदरात पडतात ते देखील भारतीयांच्याच. २००९ साली, ४८ % H1B व्हिसा भारतीयांना मिळाले होते तर दुसर्या नंबरवर असलेल्या चायनीजना मिळाले होते केवळ १०%.

अमेरिकेतील भारतीय ढोबळ मानाने दोन गटांत मोडतात. एका गटातले लोक उच्चविद्याविभूषित असून विविध क्षेत्रांमधे आपल्या कर्तृत्वाने नाव कमावत आहेत. आजमितीला अमेरिकेतील डॉक्टरांपैकी सुमारे ३८% डॉक्टर्स भारतीय आहेत. NASA मधले ३६% कर्मचारी भारतीय आहेत. विविध शैक्षणिक, संशोधन संस्थांमधे १२% शास्त्रज्ञ भारतीय आहेत. सिलिकॉन व्हॅलीमधे तर भारतीयांचे योगदान डोळे दिपवून टाकणारे आहे. मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, गुगल, इंटेलसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांमधे २५ ते ४०% कर्मचारी भारतीय आहेत. अनेक भारतीयांनी सिलीकॉन व्हॅलीमधे स्वत:च्या कंपन्या सुरू करून त्या यशस्वी करून दाखवल्या आहेत. सिटी ग्रूपचे विक्रम पंडीत आणि पेप्सीच्या इंद्रा नूयी ही अमेरिकेतील विविध क्षेत्रातील सर्वोत्तम कंपन्यांमधे सर्वोच्च स्थान आज भारतीय भूषवीत असल्याची ठळक उदाहरणे म्हणून दाखविता येतील. ह्युलेट पॅकार्डचे राजीव गुप्ता, पेंटीयम चिप तयार करणारे विनोद धाम, हॉटमेलचा निर्माता सबीर भाटीया, ए टी ऍंड टी बेल लॅबचे अरुण नेत्रावल्ली ही पटकन आठवणारी काही ठळक नावं.

दुसर्‍या गटातले भारतीय म्हणजे व्यावसायिक. हे बहुदा मोटेल किंवा गॅस स्टेशन्स चालवणारे. पण एकंदरीत भारतीय म्हणजे सुशिक्षित, मेहनती, शिक्षणाला महत्व देणारे, पैशाचा विनियोग विचारपूर्वक करणारे. याच्याच जोडीला इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व हे भारतीयांच्या भात्यातील अमोघ अस्त्र. इंग्रजी भाषेवरच्या प्रभुत्वामुळे भारतीय, इतर देशांतून येणार्‍या लोकांवर सहज मात करू शकतात. या सार्‍या जमेच्या बाजूमुळे, आज अमेरिकेतल्या इतर वंशीयांमधे भारतीयांचा आर्थिक स्तर सर्वोच्च आहे.
आपापल्या क्षेत्रातील कर्तबगारी व त्या अनुशंगाने आलेली आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य मिळवल्यावर साहजिकच पुढचे पाऊल म्हणजे सामाजिक योगदान आणि समाजकारण / राजकारणातील सहभाग. येथे येउन यशस्वी झालेल्या अनेक नामवंत भारतीयांनी सामाजिक तसेच राजकीय मंचावर देखील आपली छाप पाडली आहे. या क्षेत्रातील काही नामवंत मंडळी म्हणजे श्रीमती स्वाती दांडेकर (आयोवाच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटीवमधे २००२, २००४ आणि २००६ साली आणि स्टेट सिनेटमधे २००८ साली निवड), श्री बॉबी जिंदल (लुइसियाना राज्याचे गव्हर्नर), आणि श्रीमती निक्की हेली (साऊथ कॅरोलायना राज्याच्या गव्हर्नर).

थोडक्यात म्हणजे शिक्षण, व्यवसाय, करिअर अशा वेगवेगळ्या निमित्ताने आज भारतीयांची रीघ अमेरिकेकडे सुरू आहे. अनेकांची मुलं अमेरिकेत स्थिरस्थावर झालेली आहेत. त्यांना भेटण्याच्या निमित्ताने किंवा केवळ पर्यटनाच्या हेतूने कैकजण अमेरिका दर्शन करून येत आहेत. अर्थात बहुतेक भारतीय उच्चविद्याविभूषित असल्यामुळे आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी (engineering), कंप्युटर, मॅनेजमेंट, बॅंकिंग अशा क्षेत्रात असल्यामुळे त्यांचे वास्तव्य सहसा औद्योगिकदृष्टया प्रगत अशा राज्यांमधे किंवा मोठमोठया शहरांमधे असते. त्यामुळे अमेरिकेतील भारतीयांचे काही ठरावीक राज्यांमधे किंवा शहरांमधे मोठया प्रमाणावर एकत्रीकरण झालेले आढळून येते. सर्वाधिक भारतीय असलेली अमेरिकेतील राज्ये म्हणजे कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, टेक्सास आणि इलिनॉय. या राज्यांच्या तुलनेने थोडे कमी भारतीय असलेली राज्ये म्हणजे पेनसिल्व्हेनिया, फ्लोरिडा, मिशीगन, मेरीलॅंड, व्हर्जीनीया, जॉर्जीया आणि ओहायो. भरपूर भारतीय असलेली शहरे म्हणजे न्यूयॉर्क (शहर) , सॅन फ्रॅन्सिस्को- सॅन होजे- ओकलॅंड, सॅन डिऍगो, लॉस एंजेलीस , वॉशिंग्टन- बाल्टीमोर, फिलॅडेल्फिया, बॉस्टन, डेट्रॉइट, ह्युस्टन, डल्लास- फोर्टवर्थ, शार्लट आणि अटलांटा.

तात्पर्य म्हणजे बहुतांशी भारतीयांचे अमेरिकेतील वास्तव्य अमेरिकेच्या अतिप्रगत, अद्ययावत आणि सधन अशा भागांमधे असते. त्यांना भेटायला येणारे, कॉन्फरन्सेस किंवा बिझिनेस मिटींगच्या निमित्ताने येणारे, किंवा केवळ पर्यटनाच्या हेतूने येणारे लोक देखील या मोठमोठया अद्ययावत शहरांमधेच वावरतात. त्यामुळे अमेरिका म्हटलं की सर्वसाधारणपणे आपल्या डोळ्यांसमोर एक अद्भूत आणि मोहमयी जादूनगरीचं चित्र तरळून जातं. गगनचुंबी इमारती, स्वच्छ रस्ते, खंडप्राय देशाच्या कानाकोपर्यांना जोडणारे हायवेज आणि त्यावर सुसाट वेगाने धावणार्‍या मोटारी, भव्य शॉपिंग मॉल्स, प्रचंड मोठी दुकाने, आलिशान घरं, लहान गोष्टींचे देखील झालेले यांत्रिकीकरण (automation), सिलीकॉन व्हॅली आणि नासाचं माहेरघर, हॉलिवूड आणि डिस्नेवर्ल्डची स्वप्नमयी दुनिया, मॅक्डॉनल्ड आणि पिझ्झा हट सारख्या जगभर पसरलेल्या फास्टफूड चेन्सचं उगमस्थान, हे असं सगळं वाचून, ऐकून, प्रत्यक्षात किंवा हॉलिवूडच्या चित्रपटांतून बघून आपल्या डोक्यात अगदी पक्क बसलेलं असतं.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..