नवीन लेखन...

गावाकडची अमेरिका – पार्श्वभूमी – ४

Gavakadchi America - Village life in America - background-4

पुढे मुंबईलाच परळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात (Bombay Veterinary College) १९८० ते १९८४ मधे पशुवैद्यक पदवी शिक्षण पूर्ण केले. या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे वैशिष्ठ्य म्हणजे हे एशिया खंडातले सर्वात जुने (१८८६ साली ब्रिटीशांनी सुरु केलेले) पशुवैद्यकीय महाविद्यालय. त्याला जोडूनच असलेले सुसज्ज पशु इस्पितळ. जुन्या दगडी इमारती आणि भरपूर झाडीने भरलेल्या या महाविद्यालयाच्या प्रांगणामधे (Campus) आल्यावर आपण मुंबईत आहोत यावर चटकन विश्वास बसत नाही. पूर्वी हे कॉलेज मुंबई विद्यापीठाशी संलग्न होते. कृषी विद्यापिठांची स्थापना झाल्यानंतर हे कॉलेज दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न झाले.

पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे कृषी / पशुवैद्यक या शाखांना येणारा विद्यार्थी वर्ग हा प्रामुख्याने ग्रामीण भागातून येणारा. बर्‍याच जणांकडे थोडी बहुत शेती असायची. बहुतेकांच्या घरी शेतीच्या कामासाठी बैल आणि थोडया फार गायी, म्हशी वगैरे जनावरे असायची. काही जणांचा कोंबडयांचा व्यवसाय असायचा. बहुतेकांनी ग्रामीण भागातलं पशुवैद्यकाचं जीवन जवळून बघितलेलं असायचं. या सगळ्या पार्श्वभूमी लाभलेल्या विद्यार्थ्यांमधे आमच्यासारखी नावापुरती थोडी शहरी मुलं / मुली असायची. पूर्वी पशुवैद्यक शाखेकडे जाणार्‍या मुलींचा कल फारच कमी होता. ७५ विद्यार्थ्यांच्या बॅचमधे क्वचित असली तर एखाद दुसरी मुलगी असायची. आमच्या आधीच्या बॅचमधे आणि आमच्या बॅचमधे १४-१५ मुली आल्या होत्या. आता सारं चित्रच बदलून गेलंय आणि वर्गातील जवळ जवळ निम्या किंवा थोडया अधिकच मुली विद्यार्थिनी म्हणून असतात.

पशुवैद्यकीय महाविद्यालयात मित्र मिळाले ते शहरी तसेच ग्रामीण भागातले. त्यातला १५-२० जणांचा जिगरी दोस्तांचा ग्रूप तर आयुष्यभरासाठीचं मित्र मंडळ देऊन गेला. त्यांच्यातल्या बर्‍याच जणांमुळे ग्रामीण महाराष्ट्राची आणखी ओळख होत गेली. पुढे ६ महिने इंटर्नशिपसाठी ग्रामीण भागातच विविध ठिकाणी जाऊन काम केलं. वेगवेगळ्या NSS Camps आणि extension work निमित्ताने खेडयापाडयातून फिरुन ग्रामीण भागाशी अधिक जवळीक निर्माण झाली. आमच्या बॅचमधले बरेच जण पदवी घेऊन, महाराष्ट्र सरकारच्या सेवेत दाखल होऊन, महाराष्ट्रातल्या गावांत आणि खेडोपाडी पांगले.
आपल्याकडे पशुवैद्यकीय पेशाला अजूनही म्हणावा तसा मान नाही. गावाकडे तर गाई म्हशींचा डॉक्टर म्हटला की “ढोर डॉक्टर” म्हणूनच संभावना व्हायची. नाटकं सिनेमामधे देखील माणसांच्या डॉक्टर ऐवजी ‘ढोर डॉक्टराला’ आणून एक हमखास हशा मिळवण्याची सोय केलेली असायची. यातून सुटका व्हायचा मार्ग म्हणजे पाळीव प्राण्यांचा, ‘कुत्र्या मांजरांचा’ डॉक्टर व्हायचं. त्यामुळे शहरात प्रॅक्टीस करता येते आणि समाजात थोडा अधिक मान मिळतो. माझ्या बहुतेक सार्‍या शहरी मित्रांनी सूज्ञपणे एकतर हा मार्ग पत्करला किंवा मार्केटींग सारखे पांढरपेशी क्षेत्र निवडले. मी मात्र पशुप्रजनन या विषयामधे पदव्युत्तर शिक्षणाचा मार्ग पत्करून गाई, म्हशी, घोडयांसारख्या मोठया जनावरांच्या जगामधे प्रवेश केला. त्या निर्णयाबरोबरच माझं पुढचं बरचसं आयुष्य गाई घोडयांच्या फार्मसवर आणि ग्रामीण वातावरणात जाणार हे देखील नक्की झालं.

पुढे नोकरीच्या निमित्ताने पुण्याजवळ तळेगावला घोडयांच्या फार्मवर दीड वर्षे आणि गुजराथमधे आणंद जवळ गाई म्हशींच्या फार्मवर साडे सहा वर्षे घालवली. फार्मवरचे कामगार म्हणजे आसपासच्या खेडयांतले गरीब खेडूत. त्यांच्याबरोबर एक होऊन दिवस रात्र काम केलं. रात्री बेरात्री त्यांच्या खांद्याला खांदा लावून गाई म्हशींची आणि घोडयांची बाळंतपणं केली. उन्हातान्हात त्यांच्याबरोबर जीपमधून फिरलो. त्यांच्या खोपटांमधे, झोपडयांमधे बसून त्यांनी प्रेमाने दिलेला गुळाचा चहा आणि चटणी भाकरी खाल्ली. भुकेच्या वेळेला जीप थांबवून रस्त्याकडेच्या टपर्यांमधे त्यांच्याबरोबर जे मिळेल ते खाणं खाल्लं. महाराष्ट्र, गुजराथ आणि पंजाबमधे कामानिमित्त खेडयापाडयांत खूप भटकलो. खेडयातलं जीवन जवळून पाहिलं, अनुभवलं.

या सगळ्या पार्श्वभूमीमुळे सर्वसाधारण शहरी माणसापेक्षा मला ग्रामीण भागाची अधिक जान पेहचान झाली. कदाचित याच पार्श्वभूमीमुळे अमेरिकेच्या ग्रामीण भागाशी माझी तार लवकर जुळली असावी. अमेरिकेतलं ग्रामीण जीवन मी भारतातल्या ग्रामीण जीवनाच्या चष्म्यातून पाहू शकलो, समजू शकलो. कदाचित भारतीय आणि अमेरिकन ग्रामीण जीवनात काही समान धागा दिसल्यामुळे, मी तो पकडायचा प्रयत्न केला. हा प्रयत्न कितपत यशस्वी झालाय हे वाचकांनी ठरवायचं आहे. अर्थात मी कितीही ग्रामीण भागाशी जवळीक दाखवायचा आव आणला तरी शेवटी मी एक जातीवंत मुंबईकर आहे. माझ्याजागी जर एखादा खराखुरा गावकरी किंवा हाडाचा शेतकरी असता, तर कदाचित त्याच्या लेखणीतून ही ‘गावाकडची अमेरिका’ अधिक अस्सल उतरली असती.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..