टिव्ही वर एक जाहिरात आहे निवडून.वाचवून सांभाळून. सजवून बरोबर आहे ना? तर ही आहे एक तांदळाची जाहिरात. तर मंडळी भात आणि भारत यांचा फार निकटचा संबंध आहे अगदी फोडणीचा भात ते बरेच काही प्रकार आहेत. जे कोणी खेड्यात राहिले असतील त्यांनाच गावजेवण आणि भाताची रुची कळेल. पूर्वी गावात एक दोन तरी धार्मिक कार्यक्रम आयोजित करुन गावजेवण करत. आता एवढ्या मोठ्या संख्येने लोक येणार म्हणजे भात हे एकमेव उत्तम पर्याय आहे.
गावातील पुरुष मंडळी चुलाणावर भाताचे हंडे किंवा मोठ्या पातेल्यात भात शिजवत असत तेव्हा तांदूळ वेचून. निवडून. सांभाळून वापरत फक्त सजवणे हे मात्र नव्हते. तिथे जागा मिळेल तिथे बसायचे. आणि तेही जमिनीवर. पाण्याचे शुद्ध पाणी वगैरे प्रकार नव्हता. त्यामुळे तिचे सोय केली जायचे फक्त आपण जाताना पाण्यासाठी ग्लास किंवा तांब्या न्यावा लागत असे.
पंगत बसली की पत्रावळी मांडल्या जायच्या. मोठ्या परातीत भात काढून एका झाकणीने भाताचे ढिग वाढले की आपण त्यात आळं करायचे. मग आंबट वरण वाढले जायचे. पण ते ओघळून जाता कामा नये असे. श्लोक म्हणून झाला की मोठ्या आवाजात जय जय रघुवीर समर्थ असा गजर करीत जेवायला सुरवात. आणि वरण दांडीच्या पातेले. सारपात्र. किंवा बादलीतून डोंगा आणि वगराळ यांनी वाढले जायचे. फार फार तर एखाद्या गोड पदार्थ म्हणजे गव्हाची खीर असे काही तरी. चटणी भाजी क्वचितच. पण शेवटी भात आणि ताक मात्र हमखास.आणि सगळे पदार्थ परत परत वाढायला आणले जायचे असे जेवण करणे ही एक कलाच आहे शिवाय रुचकर लागते. पोटभर जेवायचे आणि तृप्त होऊन जायचे. अहाहा काय रुची होती म्हणून सांगू तांदूळ हलकाच असायचा पण चव मात्र भारीच….
रोजचे जेवण सुद्धा असेच होते. अगोदर भात तूपाशिवाय नाही पण ते तामल्यातून एवढ्याशा चमच्यातून नाही तर धार असायची. हव का हव का ही भाषाही नाही. चमचे हा प्रकारच नव्हता मुळी. दुपारच्या वेळी पोहे. चुरमुरे. लाह्या साधे तेल तिखट मीठ लावून एका मोठ्या भांड्यात कालवून वर्तमान पत्राच्या तुकड्यावर दिला जायचा वरुन खाण्यासाठी एक कांदा दिला जायचा. हाताने फोडून खाणे काय असते हे सांगता येत नाही अनुभवीच जाणू शकतात. जर उप्पीट. शिरा पोहे असतील तर मोठे वाडगे. द्रोण किंवा पत्रावळीचे चतकोर तुकडे. कर्दळीच्या पानावर दिले जायचे. ते प्लेट. बाउल आणि चमचे असले काही नाही. आठवण झाली ती म्हणजे आजकाल आइस्क्रीमच्या सोबत एक इवलासा चमचा देतात. त्यामुळे कितीवेळा खावा लागतो ना त्याची चव येते ना समाधान. त्यामुळे आपला हात जगन्नाथ हे केव्हाही उत्तम. चार बोटाचे द्रोण करुन खीर. बासुंदी आमरस किंवा कटाची आमटी मोठ्या वाटीतून भुरका मारणे हे काय आहे ते एकदा अनुभव घेउन बघाचतसेच दोसा हाताने खाल्ला तरच मजा येते. आणि मोकळे पणाने कुणी निंदा किंवा वंदा हाताने खाणे हाच फंडा. आता तुम्ही कसे करता याच्याशी मला काही देणे घेणे नाही.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply