*गझल*
*वृत्त :- भुजंगप्रयात*
*लगावली :* लगागा लगागा लगागा लगागा
नको वागणे आज झाडाप्रमाणे
तया लोटते जग कवाडाप्रमाणे
धनाचेच लोभी ,महाराज काही
किती वागती ते ,लबाडाप्रमाणे
सगेसोयरे फार लाडावले तू
तरी वार त्यांचेच भ्याडाप्रमाणे
तुझे दु:ख आहे, जरी फार मोठे
नको वागवू ते , बिऱ्हाडाप्रमाणे
कशाला कुणाशी ,अबोला धरावा
नसे जिंदगी जर, पहाडाप्रमाणे
तुला कर्ण कोणी, उगा का म्हणावे
तुझे दान आहे ,चिपाडाप्रमाणे
जरा खर्च कर तू ,जगी संयमाने
जगा भासतो तू ,घबाडाप्रमाणे
© जयवंत वानखडे,कोरपना